Join us  

चेहऱ्यावर डाग, मुरुम आहेत? त्वचा विकार झालेत? - मग मानसोपचारतज्ज्ञाकडे जा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 2:19 PM

त्वचाविकारांसाठी कोणी मानसोपचारतज्ज्ञांकडे गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण ब्रिटिश स्कीन फाऊण्डेशननं (बीएसएफ) नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध केलं आहे, की त्वचाविकारांसाठी इतर योग्य उपचारांसह मानसोपचारतज्ज्ञाचेही उपचार घेतले तर त्वचेवर चांगला आणि सकारात्मक परिणाम लवकरात लवकर दिसून येऊ शकतो.

ठळक मुद्देतुम्हालाही एखादा त्वचाविकार झाला असल्यास, चेहेऱ्यावर मुरुम, डाग पडले असल्यास, त्याची तुम्हाला लाज वाटत असल्यास त्वचाविकारतज्ज्ञाबरोबरच मानसोपचारतज्ज्ञाचाही सल्ला घेण्यास हरकत नाही.

चेहऱ्यावर डाग पडले, मुरुम आलेत, त्वचेची कांती हरवली, त्यावर अकालीच सुरकुत्या पडल्यासारख्या वाटायला लागल्या, तर आपण काय करतो? यावर बऱ्याचदा घरगुती काहीतरी उपचार केले जातात किंवा कोणीतरी, कधीतरी सांगितलेल्या, सुचवलेल्या किंवा ती व्यक्ती स्वत:च वापरत असलेल्या क्रीम्सचा मारा आपणही आपल्या त्वचेवर करायला लागतो. अशा सांगोवांगी उपचारांनी गुण येत नाहीच, पण बऱ्याचदा आपली त्वचा आणखी खराब होते. अशावेळी आपल्याला डॉक्टरांची आठवण होते, मग आपण एखाद्या स्कीन स्पेशालिस्टची अपॉइंटमेण्ट घेतो. बऱ्याचदा त्याने फरक पडतो, पण तोवर बरेच पैसेही खर्च झालेले असतात.पण त्वचाविकारांसाठी कोणी मानसोपचारतज्ञांकडे गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या पडल्या म्हणून मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइन्टमेन्ट घेतली, असं कधी होत नाही. तसं कोणी केलं तर त्याला वेड्यातही काढलं जाईल, पण ब्रिटिश स्कीन फाऊण्डेशननं (बीएसएफ) नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध केलं आहे, की त्वचा विकारांसाठी इतर योग्य उपचारांसह मानसोपचारतज्ञाचेही उपचार घेतले तर त्वचेवर चांगला आणि सकारात्मक परिणाम लवकरात लवकर दिसून येऊ शकतो.

बीएसएफचे प्रवक्ते आणि कार्डिफ युनिव्हर्सिटीमधील क्लिनिकल सायकोलॉजीचे प्राध्यापक ॲण्ड्रयू थॉम्पसन म्हणतात, त्यचा खराब होण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यातलं एक कारण आपली मानसिक स्थिती हेदेखील आहे. तुम्ही मनानं समाधानी नसाल, सतत टेन्शनमध्ये असाल, कौटुंबिक आणि कार्यालयीन कामांनी तुम्ही त्रस्त असाल, तर तुमच्या मनोवस्थेबरोबरच तुमच्या त्वचेवरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे त्वचा विकारात मानसोपचारही तिततकाच फायद्याचा आहे. अशा व्यक्तींना मानसोपचार मिळाले, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना मदत केली, पूर्वी ज्या क्रिया, कामं त्यांनी टाळली होती, ती कामं प्रोत्साहन, प्रेरणा देऊन त्यांच्याकडून जर करवून घेतली, त्यांच्यासमोर सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अशा व्यक्तींची मानसिकता तर आशावादी होतेच, पण त्यांच्या त्वचेवरही त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वच एकदम खुलून उठतं.जर तुम्हाला एखादा त्वचाविकार झाला असल्यास, दीर्घ काळापासून तो सुरू असल्यास त्यावर केवळ त्वचाविकारतज्ञ पुरेसे नाहीत, त्याच्या जोडीला मानसोपचारही तुम्ही घेतले पाहिजेत हे थॉम्पसन यांनी आपल्या निष्कर्षातून सिद्ध करून दाखवलं आहे.त्यांचा हा निष्कर्ष सध्या बराच गाजतो आहे आणि त्यानुसार त्वचाविकारासाठी मानसोपचाराची मदत घेणंही अनेक ठिकाणी सुरू झालं आहे.त्यामुळे तुम्हालाही एखादा त्वचाविकार झाला असल्यास, चेहेऱ्यावर मुरुम, डाग पडले असल्यास, त्याची तुम्हाला लाज वाटत असल्यास त्वचाविकारतज्ज्ञाबरोबरच मानसोपचारतज्ज्ञाचाही सल्ला घेण्यास हरकत नाही.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी