Join us
Daily Top 2Weekly Top 5

2026 Beauty Trends : नव्या वर्षात सुंदर दिसण्याचे ७ ट्रेंड्स, परफेक्टला नकार-मिसमॅच रंगाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2026 16:38 IST

2026 Beauty Trends :  प्रत्येक वर्षाचा एक रंग असतो, यंदा मात्र रंगापलिकडे आहेत नवे ब्यूटी ट्रेंड्स

ठळक मुद्देस्वत:ला बदलण्यासाठी नाही तर स्वत:वरच्या प्रेमापोटी अनेक गोष्टी स्वीकारल्या जातील. कपडे, मेकअप, दागिने या साऱ्यांत हा नवा मिनिमल पण सुंदर बदल दिसेल.

निकिता बॅनर्जी

नवीन वर्ष आलं की महिलांसाठीच्या कॉस्मेटिकच्या जगात नव्या ब्यूटी ट्रेंडची चर्चा होते. हे वर्ष पर्सनलाइज्ड, शाश्वत आणि समावेशक सौंदर्य उपायांचं असेल असं मानलं जात आहे. त्यात एका विशेष रंगाचीही चर्चा होतेय. २०२६ च्या रंगाचं नाव आहे क्लाऊड डान्सर. पांढराच रंग पण हलक्या कापूस पिंजलेल्या ढगासारखा. तो रंग आत्मविश्वास, स्वच्छ ठाम दृष्टीचं प्रतीक मानलं गेलं. त्यामुळे सौंदर्यजगातही यंदा चर्चा आहे ती मेकअपच्या नव्या छटांची आणि मेकअपसह येणाऱ्या आत्मविश्वासाची. ठाम जगण्यासह स्व-स्वीकाराचीही. मिनिमलझिमची चर्चा असताना मिनिमल मेकअपचीही चर्चा आहे. नव्या जगात लाऊड-भडक गोष्टी मागे पडून व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून मेकअपची आणि नो मेकअप लूकचीही चर्चा होईल असे आता दिसते आहे. त्यामुळे नव्या वर्षात स्वत:च्या मेकओव्हरचाच काय एकूण व्यक्तिमत्त्वाचा कायापालट करण्याचा विचार करत असाल तर नवे ब्यूटी आणि पर्सनॅलिटी ट्रेंड फार रंजक आहेत. मुख्य म्हणजे ते असं म्हणतात की कमीतकमी पण नेमका मेकअप करून वावरणाऱ्या, स्मार्ट आणि कॉन्फिडंट महिलांसाठीचं हे वर्ष आहे.

 

स्व-स्वीकारनवा ट्रेंड असं सांगतो की हल्ली बिझी जगण्यात अनेकजणी फार मेकअप करणंच टाळतात. एखादं काजळ, एखादं आयलायनर, एखादी लिपस्टिक, हलकंसं फाऊंडेशन असं काहीतरी एकच वापरतात. ५ मिनिटांत मेकअप करून आपण सुंदर दिसू असं नेमकं काहीतरी वापरतात. काहीजणी केवळ एक लीपबाम लावून घराबाहेर पडतात. लिपस्टिकही नको म्हणतात. आपण इतकं कमीतकमी वापरूनही सुंदरच दिसतो यामागे त्यांची भावना असते स्व-स्वीकाराची. त्या आरशात पाहून स्वत:तल्या चुका शोधत नाही तर आपण जशा आहोत तशाच सुंदर आहोत असं त्यांनी स्वत:ला स्वीकारलेलं असतं. बॉडी फिल्टर वापरून सोशल मीडियात झळकण्याच्या काळात हा स्व-स्वीकार आणि स्वत:वर प्रेम करणं अत्यंत महत्त्वाचं. त्यामुळे शो शा भडक सगळं मागे पडून मिनिमल, एकच एक गोष्ट वापरण्याचा नवा विचार आहे.

अप्रूव्हल कुणाला हवं?ऑफिस मीटिंगपूर्वी किंवा ऑफिसात जाताच पुन्हा सगळा मेकअप करण्याचा एक ट्रेंड कार्पोरेट जगात आहेच. पण नव्या प्रोफेशनल काळात आता अनेकजणी बाथरूममध्ये असा वेळ घालवणं टाळतात. आपलं काम हीच आपली गुणवत्ता असं म्हणत सुंदर दिसण्याचा आटापिटा टाळून अत्यंत प्रोफेशनली काम करतात. उत्तम कम्युनिकेशन, उत्तम काम आणि उत्तम पोषाख, आत्मविश्वास हे त्यांना पुरतं. गबाळं राहत नाहीत, पण मिनिमल मेकअप ही नवी ओळख आहे.

 

इनसिक्युअर कोण?स्पर्धा कुठं नाही. आपल्या सहकाऱ्यांशीही अनेकजण स्पर्धा करतात. ऑफिस पॉलिटिक्स ते किचन पॉलिटिक्स. आपण उठून दिसण्यासाठी अनेकजणी पूर्वी जरा ठसठशीत मेकअप करत. पण स्वत:वर विश्वास ठेवून अजिबात इनसिक्युअर न वाटणाऱ्या आणि फक्त कामावर फोकस ठेवून नो नॉनसेन्स ॲटिट्यूड ठेवणाऱ्या अनेकजणी आता दिसतात. त्यामुळे कामावर फोकस, त्यामुळे टापटीपपणा आणि कमी वेळात उत्तम लूक हे नवं सूत्र आहे.

सुपरवूमन विसरा..आपण परफेक्ट नाही, सुपरवूमन नाही. आपल्याला सगळंच जमणार नाही. जे जमेल ते छान करू, जे चुकेल ते मान्य करू असं आता नव्या काळात स्त्रिया मान्य करू लागल्या आहेत. सुपरवूमन होण्यासाठीची धावपळ त्यांनी सोडून द्यायचं ठरवलं. आणि त्यामुळे आपलं सौंदर्यही परफेक्ट नसेल, आपण अमुकतमुकसारखं प्रचंड सुंदर नाही दिसणार हे मान्य करण्याचा मोकळेपणाही वाढला आहे. आपल्याला जे शोभेल तेच कपडे घालायचे, कंफर्ट पाहायचा आणि स्मार्ट दिसायचं असं आता मानलं जातं.

 

सोशल मीडियातलं चित्रआपण सोशल मीडियात कसे फोटो टाकतो, त्याला किती फिल्टर, त्यावर किती लाइक्स, कमेंट, त्यातून वाटणारा आनंद किंवा वैताग यातला फोलपणाही आता लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे २०२६ मध्ये चर्चा आहे ती समाजमाध्यमातल्या हेल्दी प्रेझेन्सची. म्हणजे आपण जसे आहोत तसेच दिसण्याची, तिथला वावर सीमित आणि संयमित ठेवण्याची. त्यामुळे फोटो शॉप, फिल्टर केलेले, खोटा मेकअप असलेले फोटोही समाजमाध्यमात न टाकता केवळ संवाद माध्यम म्हणून त्याकडे पाहण्याचा आणि बॉडी शेमिंग टाळण्याचाही प्रयत्न आता केला जातो आहे.

डाएट-वजन भीतीहा एक अत्यंत अवघड विषय. म्हणजे काय तर सतत डाएटची चर्चा, वाढत्या वजनाची, व्यायामाची आणि कपड्यांच्या साईजची चर्चा. सुंदर दिसणारे उपाय सांगणारे काही सेकंदांचे रिल. त्यातलाही फोलपणा बाजूला पडून आपलं वजन, दिसणं, वागणं हे सारं स्वीकारून त्याला अनुरूप मेकअप, कपडे निवडण्याचा कल आणि स्वीकार या वर्षात दिसेल. उत्तम जीवनशैली, पोषण याची चर्चा तर होईल, पण त्याकडे अनेकजणी वळतील आणि क्रॅश डाएट मेकअप मागे पडेल अशीही चिन्हं आहे.

 

स्वत:वर प्रेमसुंदर दिसणं, मेकअप करणं, चांगले कपडे याचं अप्रूप असतंच. पण ते करताना आपण स्वत: जसे आहोत तसे स्वीकारून स्वत:वरच्या प्रेमातून स्वत:साठी काही खरेदी करण्याचा ट्रेंड वाढेल. स्वत:ला बदलण्यासाठी नाही तर स्वत:वरच्या प्रेमापोटी अनेक गोष्टी स्वीकारल्या जातील. कपडे, मेकअप, दागिने या साऱ्यांत हा नवा मिनिमल पण सुंदर बदल दिसेल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : 2026 Beauty Trends: Embrace self-acceptance, minimal makeup, and confident style.

Web Summary : 2026 beauty trends emphasize self-acceptance, minimal makeup, and confident style over perfection. Focus shifts to inner confidence, comfortable fashion, and a healthy social media presence, prioritizing self-love and rejecting unrealistic beauty standards. Embrace your true self!
टॅग्स :ब्यूटी टिप्सस्टायलिंग टिप्समेकअप टिप्सलाइफस्टाइल