Battle between traditional art and brand ambition. Who win who loss? | पारंपरिक कलांची चोरी आणि मोठ्याला ब्रॅण्डची मुजोरी. यात हार-जीत कोणाची?

पारंपरिक कलांची चोरी आणि मोठ्याला ब्रॅण्डची मुजोरी. यात हार-जीत कोणाची?

-नीरजा पटवर्धन

भरतकामाच्या ओढण्या केवढय़ा स्वस्त आहेत त्या अमुक साइटवर. ते हातमाग प्रदर्शनवाले पाचपट महाग विकत होते. तिथे मला आवडली होती ना सेम तश्शीच मिळाली साइटवर. लगेच घेतली.’ - मकू म्हणाली. मकूच्या ओढणीचे रंग सोडले तर हातमाग प्रदर्शनातल्या ओढणीची सर नव्हती त्या ओढणीला. 

‘‘हेच झालं होतं ना त्या बिहोरच्या जाकिटांचं? बघितलं मी फेसबुकवर त्या व्हिडीओमध्ये.’ ठकूला मकूबद्दल अपार दया दाटून आली. ‘ते वेगळं आणि हे वेगळं!’ - ठकू सांगू लागली. 

बिहोर हा रोमानिया या देशातला एक तालुका. तिथल्या पारंपरिक जामानिम्यात ठरावीक प्रकारे भरतकाम केलेले शर्ट, चामड्याची भरतकाम केलेली जॅकेट्स आणि त्या भरतकामाशी मेळ खाणारे बारीक मण्यांचे विणलेले दागिने यांचा समावेश होतो. या सगळ्या वस्तू एकत्न आणि ठरावीक प्रकारे वापरल्या तर त्यांच्या पारंपरिक वेशभूषेला अर्थ प्राप्त होतो; पण त्या वेगवेगळ्याही इतक्या सुंदर आहेत की आपला वेश सजवायला एखादीच वस्तूही आपण वापरू शकतो.   डियोरनं तेच केलं. 

बिहोरच्या जामानिम्यातले फक्त जॅकेट्स आणि कोट उचलले. तसेच्या तसे आपल्या कारागिरांकडून बनवून घेतले आणि डियोर हे लेबल लावून आपलीच नवीन कलाकृती असल्याच्या थाटात बाजारात आणले. आणि अर्थातच त्यांच्या लेबलच्या इतर वस्तूंप्रमाणेच अव्वाच्या सव्वा किंमत लावून विकायला ठेवले. या सगळ्यामध्ये ना बिहोरचा कुठे उल्लेख ना कलेच्या मूळ स्त्रोताची कदर. 

बहुतेक सर्व पारंपरिक कलाकृतींची डिझाइन्स ही अतिशय सुंदर आणि  परिपूर्ण म्हणावी अशी असतात. सगळे घटक अगदी योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात असतात त्यात. याचं कारण म्हणजे एकाच प्रकारच्या रचनेवर, वस्तूवर अनेक पिढय़ांनी काम केलेलं असतं. एकेक बारीक बारीक तपशील अनेक पर्यायांतून जाऊन शेवटी चपखल तेवढाच उरलेला असतो. 

कलाकृतीमध्ये वर्षोनुवर्षं आपली भर घालत गेलेल्या असंख्य अनाम कलाकारांचे हात, डोकं त्या वस्तूच्या मागे असतात. यामुळे अशा कलाकृती प्रचंड लोकप्रिय होतात. तेच झालं. तब्बल तीस हजार पौंड अशी दणदणीत किंमत असूनही डियोर लेबल लावलेलं हे जॅकेट लोकप्रिय झालं. त्याबद्दल चर्चाही सुरू झाली. 

होता होता ही चर्चा पोहोचली  हे सुंदर काम करणा-या बिहोरमधल्या अशा असंख्य कलाकार मावश्या, आज्यांपर्यंत. तिथे हे असं भरतकाम करून करून आता अनेक हात आणि डोळे थकलेले होते. या वस्तूंना मागणी नाही म्हणून त्या बनवून उदरनिर्वाह चालत नाही हे स्वीकारलेले हात आणि डोळे. मरू घातलेली ही पारंपरिक कला. हे एकीकडे आणि दुसरीकडे डियोरचं नाव. 

रोमानिया देशाच्या एका फॅशनला वाहिलेल्या मासिकानं मात्न बिहोरच्या बरोबर राहायचं ठरवलं. आयुष्यभर भरतकाम करणा-या हातांनी आपल्या सुया, कात्र्यांनीशी लढायचं ठरवलं. बिहोरचे लोक अणि हे मासिक यांनी एकत्न येऊन बिहोर फॅशनचा एक ब्रॅण्ड तयार केला आणि आपल्या हातांनी बनवलेल्या सगळ्या पारंपरिक वस्तू योग्य नफा आकारून पण तरीही सामान्य माणसाला परवडेल अशा  किमतीत ऑनलाइन विकायला सुरुवात केली. 

‘हे आमचे पारंपरिक कपडे आहेत. कुणा लेबलची जहागीर नाही.’ हे ही त्यांनी ठणकावून सांगितलं. थोड्याच दिवसात दणदणीत विक्रीचा एक उच्चांक गाठला गेला. एवढंच नव्हे तर डियोरच्या अंगणात म्हणजे पॅरिसमध्ये या ब्रॅण्डला ओळखही मिळाली. आजघडीला पुढच्या साडेचार वर्षांचा खर्च निघेल एवढं प्री-बुकिंग त्यांच्याकडे झालेलं आहे. 
एखाद्या हिंदी सिनेमाची कथा वाटावी अशी ही गोष्ट. बलाढय़ दुष्ट शत्रूचा पराजय. या गोष्टीला टाळ्या वाजवून झाल्यानंतर यातल्या अजून महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे पारंपरिक कला आणि ती साकार करणारा कलाकार जगायला हवा असेल तर व्यापारीकरणाला पर्याय नाही, हा मुद्दा इथेही अधोरेखित होताना दिसतो. योग्य त्या व्यक्तीला, समाजगटाला योग्य तो मोबदला मिळत असेल तर त्याचे व्यापारीकरण स्वागतार्हही आहे. 

तसेच व्यापारीकरण करताना कलेच्या मूळ स्वरुपाबद्दल, उद्देश्याबद्दल आडमुठे राहूनही उपयोग नाही. परिपूर्ण जामानिम्यासाठी जॅकेट, शर्ट, मण्यांचे दागिने हे सर्व पाहिजे, त्यातल्या प्रत्येक रूपचिन्हाला एक अर्थ आहे. संपूर्ण नक्षी म्हणजे एक सांकेतिक भाषा आहे. याची माहिती नोंदवली जाणं महत्त्वाचंच, पण त्या वस्तू वेगळ्या प्रकारे वापरल्या जाणं हा बदल इथे स्वीकारला गेला हे ही तितकंच महत्त्वाचं. कलेचा प्रवाह असा पुढे जात राहातो. 
या पार्श्वभूमीवर आता भारतीय गोष्टींकडे बघायचं झाल्यास काही प्रमाणात याच मुद्दय़ांना दुजोरा मिळतो.

आपल्याकडचे राजस्थानी आरसेकाम, कच्छी कशिदाकारी, वारली चित्रकला, कापड रंगवण्याची अजरख पद्धती या सगळ्यांचा इतिहास आणि आजचं स्वरूप बघितलं तर व्यापारीकरणाला पर्याय नाही हे लक्षात येतं. अशा प्रकारच्या विक्री व्यवस्थेची अपरिहार्यता आपल्या देशात एक धोरण म्हणून पूर्वीच स्वीकारलेली आहे हे लक्षात येतं. याचं मूळ भारताच्या इतिहासात आहे. 

आपण पेसलीबद्दल मागे बोललो. मसाल्याच्या पदार्थांच्या खालोखाल भारतातील कापडकलेतले वैविध्य, मुबलकता या अभिमानास्पद गोष्टींनी आपल्याला पारतंत्र्याच्या दाराशी नेलं त्याची गोष्टही आपण बघितली आहे. इथून कच्चा माल नेऊन इंग्लंडमधल्या मागांवर कापड बनवून दामदुपटीनं आपल्यालाच विकणं आणि त्यांच्यासाठी हा बाजार खुला राहावा म्हणून इथले हातमाग आणि पारंपरिक विणकरांवर बंदी आणणं अशा गोष्टी इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत केल्या. त्याच्याविरूद्ध उठावही झाले. त्याला उत्तर म्हणून चरखा आणि खादी अस्तित्वात आले. 

इंग्रज निघून गेल्यावर भारतापुढे अनेक आव्हानं होती. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे आपली देश म्हणून ओळख निर्माण करणं हे होतं. आपलं म्हणावं असं बरंचसं मोडकळीला आलं होतं. त्याचं संवर्धन करणं, जतन करणं हे अतिशय गरजेचं होतं. विविध प्रकारचे पारंपरिक विणकर आणि कापडनिर्मितीचे कलाकार, हातमाग हे सगळे घटक जगविण्यासाठी, त्यांच्या कामाच्या नोंदी ठेवण्यासाठी, त्यांच्या कलेचे पुनरूज्जीवन व्हावं याचे प्रयत्न करण्यासाठी सरकारी पातळीवर काही महत्त्वाची धोरणं आखली गेली आणि प्रयत्नही केले गेले. या कलाकारांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली गेली. 

श्रीमती पुपुल जयकर यांचं या संपूर्ण कार्यात खूप मोठं योगदान आहे. खादीची सरकारी दुकानं, कॉटेज एम्पोरियम्स, विविध राज्यांची एम्पोरियम्स वगैरे सर्व या प्रयत्नांमधूनच आलेले आहेत. फॅब इंडिया आणि तत्सम अनेक खासगी ब्रॅण्ड्स हे ही याच तत्त्वावर चालवले जातात. 

भारतातले अनेक डिझायनर्स पारंपरिक कारागीर आणि विणकरांना बरोबर घेऊन आपली निर्मिती करतात. सध्या अनेक प्रकारच्या विणींचं पुनरूज्जीवन करणं हे बर्‍याच ठिकाणी दिसून येतं. एकेकाळी ज्या साड्यांना गरिबाच्या, जुनाट वगैरे लेखले गेले त्या साड्या नव्या रूपात आज काही वर्तुळात उच्च दर्जाची फॅशन म्हणून वापरल्या जाताहेत. याचं चपखल उदाहरण म्हणजे गोव्याच्या कुणबी साड्या किंवा उत्तरेतल्या गमछा साड्या. 
तरीही सर्व चित्र सुंदर आणि आशादायी आहेच हे म्हणता येणार नाही. ते तसं का? वगैरेचा ऊहापोह न करता पारंपरिक कलांना आर्शय मिळावा यासाठी काही प्रयत्न झाले होते इतकं लक्षात घेऊ.  

तरीही आपल्याला हस्तकलांचं महत्त्व पुरेसं कळालेलं नाही. एखादी ओढणी हातानं भरतकाम करून बनवण्यातलं सौंदर्य आणि मशीनवर केलेल्या भरतकामाचं ठोकळेबाज सौंदर्य यातला आपल्याला फरक कळत नाही. लोकसंख्या अमाप असल्यानं मानवी कष्टांची किंमत आपल्या लेखी नगण्य आहे. त्यामुळे पारंपरिकरीत्या हातानं बनवलेल्या वस्तूंना वेगळी किंमत देण्याची मानसिकता आपल्याकडे नाही. विकसनशील देश असल्यानं आपलं सरासरी दरडोई उत्पन्नही बेतासबात आहे. 

अशा पार्श्वभूमीवर खरोखरी हातानं भरलेल्या ओढणीची किंमत न परवडणं आणि मशीनवरच्या ओढणीवर खुश होणं हे आपसूकच होतं. त्यामुळे ठकूनं मकूला दोष देणं हे फारसं योग्य नाही. 

व्यापारीकरण होताना एक प्रकार असतो तो म्हणजे योग्य त्या कारागिरांना योग्य ते मूल्य मिळतं  आणि ग्राहकालाही अस्सल वस्तू मिळते. दुसरा प्रकार असतो तो मशीनवरच्या ओढणीचा. अस्सल वस्तूच्या स्वस्त नकला बाजारात उपलब्ध होत राहतात. 

अस्सल वस्तूचं महत्त्व, वेगळेपणा कमी करून टाकतात. तिसरं व्यापारीकरण म्हणजे चक्क डियोरसारख्या ब्रॅण्ड्सनी केलेली ढापाढापी. 

हे जगभरात भरपूरवेळा घडलं आहे. बिहोरचं उदाहरण हे अपवादात्मक म्हणूनच बघितलं पाहिजे. पारंपरिक कला आपलं डिझाइन म्हणून आणण्याची आणि ते खपून गेल्याची असंख्य उदाहरणं आहेतच. 

ब्रॅण्ड्स, लेबल्स आणि त्यांच्या नावावर एखादी गोष्ट होणं ही सगळी प्रक्रि या काय आणि कशी आहे, याबद्दल बघूया पुढच्या लेखात.

(लेखिका वेशभूषाकार असून, या विषयात ‘जॉजिर्या’ विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलेले आहे.) 

needhapa@gmail.com

Web Title: Battle between traditional art and brand ambition. Who win who loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.