Asvini Bhave explores the art of giving | देण्याची कला 

देण्याची कला 


-अश्विनी भावे


चंदेरी दुनियेतली कलाकार म्हणून मी आजवर कैक मुलाखती दिल्या असतील. पत्रकारांच्या बहुतेक प्रश्नांना मोकळेपणी दिलखुलास जबाब देत असे मी: काही तिरकस नि फॅशनेबल प्रश्नांना थेट उत्तर असे माझं! त्यातलाच एक हमखास  प्रश्न  ‘सामाजिक बांधीलकी’चा !  ‘समाज तुमच्यावर अलोट प्रेम करतो आहे, तर तुम्ही समाजासाठी काय करता ? तुमची सामाजिक बांधिलकी तुम्ही कशी निभावता?’’- या प्रश्नाला माझं थेट  उत्तर असे,  ‘माझं काम चोख निभावून!’
- समाजातल्या प्रत्येक घटकानं उत्तम नागरिकत्वाची जबाबदारी बजावली, म्हणजेच चांगला समाज उभारायला हातभार लावला असं मी मानते! कलाकारांना असं वेगळं काढणं मला मुळीच मान्य नव्हतं. मुळात चंदेरी दुनियेतलं आयुष्य जितकं भपकेबाज दिसे तितकी माझी मिळकतही नव्हती त्यावेळी! माझी परिस्थितीही तशी बेताची, त्यामुळे आलेले मेहनतीचे पैसे राहणीमान सुधारण्यात नि स्टारडम जपण्यातच खर्ची होत असत. मग सोशन वर्कला कुठून येणार पैसे ?
आता बरीच वर्ष उलटल्यावर आणि सारं अलबेल असतांना त्या प्रश्नाकडे वेगळ्या नजरेनं पाहू शकते आहे मी! प्रत्येकानंच उत्तम नागरीक होऊन हातभार लावायला हवा हे खरंच आहे. पण समाजात असेही बरेच असतात ज्यांना व्यक्तिविकासाची संधी मिळालेली नसते. मग समाजाच्या उभारणीला हातभार लावण्याची अपेक्षा कशी करावी त्यांच्याकडून?
ब-याच वेळा मदत देताना मी साशंक असते. याचं कारण माझा स्वभाव असेल, किंवा  ‘समाजसेवा’ या क्षेत्राची सर्वसाधारण अनुभवाला येणारी अवस्थाही असेल पण द्यायचं ते दान सत्पात्री पडावं, मग दोनशे रूपये असोत, की दोन लाख ही माफक अपेक्षा असते माझी!

मधल्या काळात महाराष्ट्रात पावसानंतर मशरूमच्या छत्र्या उगवाव्यात तशा एनजीओ संस्था उघडल्या गेल्या. डोनेशनच्या नावाखाली स्वत:ची तुमडी भरण्याचे प्रकार चालू झाले. मुलींना सुरक्षित, सुशिक्षित,स्वावलंबी बनवण्याच्या नावाखाली त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावणार्‍या ही ब-याच संस्था त्यात होत्या. छापले दोन-चार फ्लेक्स उभे केले दोन चार मोक्याच्या ठिकाणी.. अशानं का कुठे संस्था उभ्या होतात? अशानं फक्त देणा-याचा विश्वास उडतो. आणि परिणामी दानत असलेले सुध्दा आपला हात आखडता घेतात. उगाच नाही सरकारनं 70 टक्के संस्थांना टाळं ठोकलं. 
माझी मुलं जेव्हा अमेरिकेतल्या शाळेत जाऊ लागली तेव्हा ‘गीव्हिंग’ च्या संज्ञेशी माझा जवळून संबंध आला. शासनाकडून येणारं अनुदान शाळा अद्ययावत करायला पुरेसं नाही म्हणून मग फंड उभारण्यात येतो. एक मोठी यंत्रणाच उभी असते त्यामागे! लोकांच्या दानशूरतेला आवाहन करणं ही एक कलाच आहे. The western society has perfected this art! 

आपल्याकडे का कुणास ठाऊक; ‘देण्या’च्या संज्ञेला करूणेची झालर असते.त्यागाचं अस्तर असतं. इथे पश्चिमी समाजानं ‘देण्या’चाही उत्सव करण्याची कला मोठया युक्तीनं साधली आहे.
इथे फंडरेझींगच्या कार्यक्रमांना एक थीम असते.  त्या थीमनुसार जागेची सजावट करायला विद्यार्थी शिक्षक पालक सगळे सहभागी होतात. फंडरेझींगचा एक भाग असतो ‘पे टू प्ले’ (पैसे भरा आणि नाव नोंदवा). म्हणजे खाद्य पदार्थ बनवण्याचे क्लासेस, ऑस्कर पहाण्याची पार्टी, योगासनाचा क्लास. याची ज्यांना आवड असते ते पैसे भरून नाव नोंदवतात. क्लास घेणारे विनामुल्य शिकवतात आणि नाव नोंदणीतून जमलेले पैसे शाळेच्या फंडात जातात. मी दरवर्षी भारतीय स्वयंपाकाचा क्लास शिकवते नि बॉलीवूड थीम पार्टीत सर्वांना सामील करते.
दुसरा प्रकार ‘लाइव्ह ऑक्शन’ म्हणजे  ‘बोली’चा ! समजा, कुणाचा महाबळेश्वरसारख्या ठिकाणी रिकामा बंगला आहे. तो त्यांनी स्वयंपाक्यासह शनिवार-रविवारी फुकट उपलब्ध करून द्यायचा. कार्यक्रमात त्यावर बोली लावली जाते. त्यात चढाओढ झाली की बहुतेकदा दुप्पट पैसे देऊन लोक तो  बंगला वीकेंडसाठी घेतात नी पैसा शाळेला जातो. पदरमोड करून देणारे कमी असतात पण त्या बदल्यात थोडं का होईना काहीतरी मिळतंय म्हटल्यावर एरवी न देणारे बरेच लोक  दिलदारपणे पाकिटाला हात घालतात.
- या प्रकारच्या युक्त्या आपल्याकडे भारतात अंमलात आणता येऊ शकतील का? लोक  ‘देण्या’साठी आपसूक उद्युक्त व्हावेत; यासाठी  ‘देणं’ आणि करमणूक यांची काही सांगड घालता येईल का? असं म्हणतात की चांगली सवय जडवायची असेल तर जुन्या सवयीवरच  ‘पीगीबॅक’ करावं! म्हणजे समजा सकाळी उठल्यावर दोन ग्लास पाणी पिण्याची सवय लावायची असेल, तर दात घासण्याबरोबर तिला जोडावं. पाणी प्यायल्याशिवाय टूथ पेस्ट जाग्यावर ठेवायची नाही ठरवलं, की लागेल सवय नक्की. - तसं केलं तर?
गणपतीच्या वर्गणीबरोबरच शंभर रूपये आपल्याला पटेल अशा समाजकामाला द्यायचे, असं ठरवलं तर? आणि त्याहूनही मोठं.. समजा राजकीय पक्ष सार्वजनिक उत्सवांकरता तुमच्या गल्लयांवर आक्रमण करतात, त्यांनी ‘कार्पोरेट मॅचिग ’ सारखी ती वर्गणी दान-मॅच केली तर ?..किती पैसा उभा राहिल! मला वाटतं, किती देतो हे महत्त्वाचं नाही, पण सातत्यानं देतो हे महत्त्वाचं. त्यातून देण्याची वृत्ती अंगी बाणते आणि पुढे तो स्वभावाचा एक भाग बनून जातो.
आजकालच्या जगात नुसतं देण्यानं आपलं कर्तव्य संपत नाही. एक पाऊल पुढे टाकून दिलेल्या पैशाचा विनीयोग उचित पध्दतीनं होतो की नाही ते ही आपल्याला पहायला हवं. ज्यांच्या हाताशी वेळ आहे, त्यांनी या संस्थांना न कळवता भेट देऊन लक्ष ठेवलं, तर ते ही समाजासाठी योगदानच की !
ब-याचदा देणारे आणि घेणारे यांचा योग घडवून आणावा लागतो. थोडक्यात ‘मॅचमेकींग’ करणा-या मावशी, काकूची गरज असते. ते पण मोठंच काम आहे. प्रत्येक वेळी खिशातून देण्याची गरज असतेच असं नाही. ‘देण्याच्या प्रक्रिये’त आपण कुठे चपखल बसतो हे पहावं आणि ते काम हाती घ्यावं.. नाही का ?
काही माणसं कामकरी माशीसारखी असतात. स्वत: श्रमदान केल्याशिवाय त्यांन देण्यातलं समाधानच मिळत नाही. त्यांनी जर तरूण मुलांना सांगितलं, एक  दिवस श्रमदान कराल तर पोटभर पावभाजीची पार्टी देते. तर मुलांना एक वेगळा उत्साह येईल की नाही?
गेल्या दशकात मी बर्‍याच एनजीओंच्या संपर्कात आले. काहींच्या कामात सहभागी झाले. त्यातल्या फक्त दोन संस्थांबद्दल सांगते. 

 

   होम ऑफ होप या संस्थेच्या डॉ. नीलिमा सभरवाल एका लाभार्थी तरुणासमवेत.
 

‘होम ऑफ होप’ च्या संस्थापक डॉ निलीमा सभरवाल. बनारस जवळ राजपूत घरात जन्मल्या. ठाकूरकी सोडून वडील एअर्फोर्समधे गेले. त्यामुळे मान-सन्मान खूप मिळाला पण चार मुली नि एकत्र कुटुंबाचा गोतवळा पोसताना वडिलांची तारांबळ तिनं पाहिली! पुढे ती डॉक्टर झाली नि एका हुशार डॉक्टरशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली. तिची दोन्ही मुलं सुबत्तेत जन्माला आली. आपल्याला सगळं चांदीच्या चमच्यात मिळालंय, याची त्यांना जाण असावी म्हणून तीनं रेफ्रिजरेटरवर भुकेल्या दिनवाण्या मुलाचा फोटो लावला होता. तिची कायझर सारख्या कंपनीतली नोकरी, नव-याची प्रॅक्टस जोरात चालली होती. सारं आलबेल त्यामुळे कृतज्ञतेनं तिचं मन भरून येई. त्यातूनच या संस्थेचा जन्म झाला. तिची मैत्रिण एका अनाथालयाकरता पैसे उभे करत होती हे निमित्त झालं. तिथल्याच एका कम्युनिटी सेंटरमधे निलीमानं जेवणाचा बेत आखला. घरूनच पदार्थ बनवून नेले. मित्र परिवाराला अपील केलं आणि सर्वांनी सहजपणे पैसे दिले. निलिमा सांगते, या उपक्रमातून माझ्या कृतज्ञतेला प्रयत्नाची जोड मिळाली! वीस वर्षापूर्वी लावलेलं त्या बीजाचा वटवृक्ष झाला. निलिमाची संस्था उपेक्षिलेल्या मुलांना स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत करते. ज्या चांगल्या संस्थांचं गाडं पैशाअभावी अडतं, त्यांना मदत देऊन त्यांचे हात बळकट करते! मग स्वच्छ बाथरूम बांधून देण्यापासून ते फिरतं वाचनालय, गरीब मनोरूग्ण मुलांकरता काऊंसेलर आणणं, त्यांना व्यवसाय शिक्षण देणं अशा अनेक प्रकारच्या उपक्रमांना मदत करून त्या संस्थांचा कायापालट करून त्यांना आणिक काम करायला हुरूप दिला.  

याच संस्थेमार्फत कैफि आझमींच्या जन्मगावी, ‘मिजवान’ला बुज-या मुलींना आत्मविश्वास मिळावा म्हणून नाट्य शिक्षण नि खेळांचं रितसर शिक्षण दिलं जातं. त्यांतून त्या मुलींमधे झालेला सकारात्मक बदल खरोखर मनाला हुरूप देणारा आहे. या उपक्रमाची आर्थिक जबाबदारी मी गेली तीन वर्षं घेतली आहे आणि हे काम पाच वर्ष चालवण्याचा माझा करार आहे. 
या संस्थेच्या इतर उपक्रमांना नुसतं यशच नाही मिळालं तर या संस्थानी भारतीय कायद्यात अमुलाग्र बदल घडवून आणले. 1999 साली HOHने  उद्यान घर या मोठय़ा मानसिक आघाता मधून गेलेल्या अनाथ मुलींना सांभाळणा-या संस्थेला मुलींच्या ‘मेंटल हेल्य’ उपक्रमासाठी मोठी मदत दिली आणि सातत्यानं देत राहिली. त्यातून  मुलींमधला अनुलाग्र बदल इतका आशा दायक होता की त्यातूनच 2007 साली ‘जुवनाइल जस्टिस कायदा संमत झाला. आज अशा मुलांबरोबर काम करणा-या प्रत्येक संस्थेला मानसिक आरोग्याची काळजी घेणारा उपक्रम राबवणं नियमबद्ध आहे.
2000 साली  स्पेशल नीडस असलेल्या गरीब मुलांचं  डेकेअर चालवणा-या मनोविकार या संस्थेला Home of Hope ने मदत केली. त्यांना कॉम्प्युटरचं शिक्षण देऊन समाजात सामावण्यासाठी स्वत:च्या पायावर उभं केलं. या संस्थेच्या अथक प्रयत्यानंतर 2016 मधे सरकारनं डिसेबीलीटी कायदा संमत  केला. ज्या द्धारे नोकरीत 10टक्के  जागा अशा लोकांसाठी राखिव असतात.
या संस्थेच्या यशाची गाथा मोठी आहे. फक्त आमच्या बे एरिआतल्या लोकांनी केलेल्या मदतीवर आज या संस्थेनं किमान 1 लाख मुलांच्या मनात आशेचा दिवा पेटवला.
एकूणच माझ्या अनुभवात, परदेशात राहणारे भारतीय सढळ हातानं दान करणारे असतात. पण ब-याच वेळा भारतात राहणारे भारतीय, परदेशस्थ भारतीयांना ‘देशप्रेम कमी आहे म्हणून देश सोडून गेलात’ असं म्हणून हिणवण्याची घाई करतात. ‘मेरा भारत महान’ चे बिरूद स्वत:च्या शर्टावर मिरवून भारताबाहेरच्यांना उप-या सारखे संबोधतात.
मी पाहिलंय. परदेशस्थ भारतीयांच्या मनात भारताला आधिक महान बनवण्याची दुर्दम्य इच्छा असते आणि त्यासाठी ते डोळे उघडे ठेवून प्रयत्न/मदत करतात.

 


परदेशस्थ भारतीयांच्या मनास आलेली अशीच एक संस्था म्हणजे ‘अक्षय पात्र’ कळक  मधून एम टेक झालेल्या मधू पंडित दास यांनी, त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीला प्रभुदेवा यांच्या शिकवणीतून स्फुर्ती घेऊन सांर आयुष्य समाज कारणी लावण्याचं ठरवलं. मधू पंडित दास आणि मोहन दास पै (इन्फोसिसचे संस्थापक) यांच्या समवेत सरकारी शाळांमधे मधल्यावेळचं जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला. पोटाची भूक भागवण्याकरता मुलं कामाला लावली जातात आणि परिणामी शाळा सुटते. जेवायला अन्न नाही म्हणून कोणी शिक्षणाला मुकू नये हे एकमेव उदिष्ट आहे त्यांचं. गेली काही वर्ष मीही त्यांच्या कामात सहभागी आहे. अक्षयपात्रच्या कामाचा आवाका पाहून मी थक्कच होते. 12 राज्यात मिळून एकूण 51 स्वयंपाक घरं (सेंट्रलाइज्ड कीचन) मिळून 18,02517 विद्यार्थ्यांना ते अखंडित जेवण पुरवतात.  स्वच्छता, शिस्त आणि कार्यतत्परतेनं हि किचन चालवली जातात. एका मध्यवर्ती किचन मधून  फक्त पाच तासात 150000 मुलांचं जेवण तयार होऊन गाड्यांमधून रवाना होतंच, पण किचन देखिल धूवूून फुसून स्वस्छ होतं उद्याच्या दिवसा करता. या कामाच्या वेग वाढावा म्हणून एक अजस्त्र मशीनचा शोध लावला गेला. ते मशिन दर मिनीटाला टम्म फुगलेल्या एक हजार पोळ्या तयार करतं.
समाजसेवेला जेव्हा व्यावहारिकता आणि  व्यावसायिकतेची जोड मिळते तेव्हा माणसं डोंगरा  एवढं काम करू शकतात, याचं मुर्तिमंत उहाहरण म्हणजे ‘अक्षयपात्र’ संस्था !
अशा असंख्य संस्था कार्यरत झाल्या तर  देणा-याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी हे शब्द सार्थ ठरतील
संपर्क - https://hohinc.org/
www.akshayapatra.org/

 

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत.)  
ashvini.bhave19@gmail.com 

Web Title: Asvini Bhave explores the art of giving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.