Aspects of Simplicity | साधेपणाच्या नोंदी

साधेपणाच्या नोंदी

-नीरजा पटवर्धन

 ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाहिलीस का तिची? कॉटनबिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाइन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात?’ ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रिणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूजकाकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता. मस्तपैकी हातमागावरची साधी कॉटन साडी नेसल्या होत्या. ठकूच्या मैत्रिणीची साडी चारशे रुपयांची आणि

कुजबूजकाकूंची साधी साडी हातमागाची म्हणजे हजार दीडहजाराच्या घरातली तरी असावीच. ठकूनं हसून खांदे उडवले. 
सुती कपडे, सुती साड्या, साडी आणि इतर भारतीय कपडे, मळखाऊ रंग, छोटे दागिने, कोल्हापुरी चपला या सगळ्या वस्तू साधेपणाचे मानक समजल्या जातात.  

तसेच आजच्या ताज्या ताज्या फॅशनला धरून राहणी नसणं, कपडे अंगभर असणं, चारचौघांच्यात मिसळून जाणारी राहणी, नजरेत न खुपणारे किंवा वेगळे उठून न दिसणारे असे रंग आणि आकार, शरीराचे आकार-उकार अधोरेखित न करणारे, जाम्यानिम्यावर फारसा खर्च न करणं, कष्ट न करणं किंवा केलेच तर केलेला खर्च आणि कष्ट कळू न देणारे कपडे व इतर वस्तू, पटकन आवरून होईल असा वेश आणि केस, मेकअप नाही किंवा असेल तर दिसत नाही अशा सगळ्या गोष्टींना साधेपणाचा शिक्का आहे. पैसे आणि  वेळेत काटकसर ज्या जामानिम्यात होते ते साधे असा याचा अर्थ. पण कार्यकर्त्या बाईचा असो वा घरगुती बाईचा साधेपणा हा हातमागाच्या सुती साडीतच असतो वगैरे गणितं नाटका-सिनेमांचे कपडे ठरवताना ठकूला सततच ऐकायला लागतात. ठरावीक प्रकारच्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या साधेपणाचे ठरावीक गणवेश याची कोष्टकं  आपल्याकडे पक्की आहेत. 

कशी ठरली असतील ही कोष्टकं? काहीच दशकांपूर्वीपर्यंत हातमाग आणि यंत्नमाग दोन्हींवर तयार होणारं कापड हे सुती, रेशमी किंवा लोकरीचं असे. रेशीम वा लोकर या दोन्हीचं नैसर्गिक उत्पादन कापसापेक्षा कमी. तेही ठरावीक प्रदेशांपुरतंच. त्यातून मिळणारं कापड अजूनच कमी. त्यामुळे अर्थातच रेशमी दुर्मीळ आणि म्हणून महागडं प्रकरण. लोकर रेशमापेक्षा सहज मिळणारी पण सगळ्या ऋतूंमध्ये चालण्यासारखी नाही. तस्मात तीही ठेवणीपुरतीच. त्यामुळे सामान्य माणसांसाठी रोजच्या वापरात सुती कपडेच असत. लग्नाकार्यापुरतं,  पूजेबिजेपुरतं एखाददुसरं ठेवणीतलं रेशमी वस्त्र  असे. क्वचित इतर कार्यक्रमांसाठी जायला लागलंच तर एखाद दुसरी जरा चांगल्यातली सुती आणि जरीच्या चार रेघा असलेली साडी असे. काठाच्या खणाच्या चारदोन चोळ्या त्यातली एखादी जरीची. असलेल्या साड्यांवर त्याच आलटून पालटून घातल्या जात. चोळ्या जाऊन ब्लाऊजेस आली तरी प्रकार तोच. 

 

कापडांसाठीचा नैसर्गिक कच्चा माल अगदी कापूस म्हणलं तरी एका र्मयादेबाहेर उपलब्ध होत नाहीच. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांकडे असलेली कपड्यांची संख्याही र्मयादित असे. सुती कपडे म्हणजे साधेपणा हे प्रकरण तेव्हापासूनचे. यात नंतर खादीचा काळ आला. मग काय रंगवलेले काठ, जरीकाठी अजिबात नाही अशी जाडीभरडी साडी ही साधेपणाची परिसीमाच झाली. या वातावरणात नायलॉन, पॉलिस्टर वगैरेंनी प्रवेश केला. वेगळं कापड आणि त्यात रंग, छपाई इत्यादींमध्ये नावीन्य, दिसायला रेशमी पण रेशमाची किंमत नाही अशा विविध चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेली साडी ही भलतीच फॅशनेबल मानली जाऊ लागली आणि सुती किंवा खादी साड्यांना साधेपणाबरोबर जुनाटपणाचा, पोक्तपणाचा शिक्का मिळाला.

हातमागावरचे कपडे जवळपास दुर्मीळ झाले, पण तरी कॉटनची साडी म्हणजे साधी आणि पोक्त या संकल्पनेने आपली जागा अजून पूर्णपणे सोडलेली नाही. हातमागाची कॉटनची साडी स्वस्त नसते. तिचे शंभर चोचले असतात. रंग सांभाळण्यासाठी ड्रायक्लीनच करा नाहीतर धुवायची तर वेगळी धुवा, हातानं घुळुघुळु गोंजारतच धुवा आणि  सावलीतच सुकवा. मग स्टार्च करा. आणि हे एवढं सगळं फक्त एका दिवसाच्या वापरापुरतं. परत वापरायची तर सगळा लूप परत. अशी चारवेळा धुवा मग रंगांचं भूत होणं ठरलेलंच. तर एकीकडे सिन्थेटिक साडी स्वस्त, धुवायला सोपी, वाळते पटकन, इस्त्नीबिस्त्नी लागत नाही. कशीही धुतली तरी कल्पांतापर्यंत रंगाला, कापडाला ढिम्म काही होत नाही. 

साध्या राहणी या गोष्टीचे आयाम ज्याच्या त्याच्या आर्थिक, सामाजिक परिस्थिती, वय, व्यवसाय, प्रदेश याला धरून बदलत असतात; पण साधेपणाचा आग्रह असतोच. साधेपणाच का? कारण आपल्या देशाला साधेपणाचं किंवा साधेपणा या शब्दाचं विचित्न आकर्षण आहे. दिसणं, राहणी, कपडे आणि  माणसाच्या गाभ्याचा काही संबंध नाही हे संतपरंपरेनंही सतत सांगितलं आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी हा सुविचार पिढय़ानपिढय़ा आपल्या डोक्यात घट्ट ठोकून बसवलेला आहे. आणि याचे बरोब्बर चुकीचे अर्थ आपण घेतलेले आहेत. साधं राहिलं की उच्च विचारसरणी आपोआप येतेच अंगात अशी आपली खात्नी आहे. जसे चारचौघात शांत बसणारा माणूस खूप विचारी, ज्ञानी वगैरे समजला जातो तसा साधं राहणारा माणूस विश्वासार्ह असतो. साधं राहणार्‍या माणसाला विषयाचं गांभीर्य कळतं. अशी बरीच समीकरणं आपल्याकडे आहेत. आणि त्यामुळेच आपल्याकडे साधेपणाचा दंभ आहे. दंभ आला की प्रदर्शन आलं. ‘आम्ही किती साधे आहोत!’ हे जाहीर करत राहायची गरजही आली. साधेपणाचं हे असं अतोनात कौतुक आहे. खरं तर वेगवेगळ्या प्रकारे शरीर सजवणं ही मानवाची मूळ प्रवृत्ती आहे. वेगळ्या, नवीन वस्तू लेवून बघायला सगळ्यांनाच आवडतं शक्यतो. पण ते शक्य असतंच असं नाही. सामाजिक चौकटी ते खिशाची कुवत अशी अनेक कारणं असू शकतात. अशावेळेला साधेपणा उपयोगाला येतो. बहुतेकदा साधेपणा हे अभावग्रस्ततेवर घातलेलं पांघरूण असतं. क्वचित एखाद्या तत्त्वासाठी ठरवून गरजा कमी केल्यावर आलेला साधेपणा असतो. आणि खूप वेळेला साधेपणाचं प्रदर्शन असतं. 

या साधेपणाच्या प्रदर्शनात राहणी आधी विचार नंतर असा घोळ झालेला असल्यानं साधेपणा ही राखायची गोष्ट होते. या सगळ्यात त्या उच्च विचारसरणीचं अंमळ राहूनच जातं आणि आपल्या साधेपणाच्या व्याख्येबाहेरचा जामानिमा दिसला की नाकं मुरडायला सुरुवात होते. पण राहणीतला आपसूक साधेपणा, नाइलाजाचा साधेपणा आणि दाखवायचा साधेपणा वेगवेगळा जाणवतोच. 

यानंच माणसाच्या कातडीवरचं आवरण आणि त्याचा गाभा यांचं एकमेकांशी असलेले नातं अधोरेखित होतं.   या नात्याबद्दल पुढच्या वेळेला तपशिलात चर्चा करूया. आता दिवाळी तोंडावर आलीये. साधेपणाला ठेवा बाजूला. सणाचा आनंद गाभ्यापासून आवरणापर्यंत फुलू देत. मस्त हसा आणि मस्त दिसा. 

(लेखिका वेशभूषाकार असून, या विषयात ‘जॉजिर्या’ विद्यापीठातून  त्यांनी मास्टर्स केलेले आहे.)

needhapa@gmail.com

Web Title: Aspects of Simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.