Ashvini Bhave writes about her live wire friend sherry Hebbar | ला ब्लास्ट- शेरी नावाचं एक ‘नि:संकोच बेट’

ला ब्लास्ट- शेरी नावाचं एक ‘नि:संकोच बेट’

 - अश्विनी भावे


सकाळी दहाचा सुमार. फोन खणखणला. पलीकडे धीमा, मंजुळ नि अनोळखी आवाज.
   ‘मी नॉर्थ स्कूलच्या वतीने फोन करते आहे. तुझं आणि तुझ्या मुलांचं स्वागत करायला!’
मी तेव्हा नुकतीच सॅनफ्रॅन्सिस्को शहराबाहेर पाच हिरव्यागार डोंगरांवर वसलेल्या गावात माझ्या नव्या घरी राहायला गेले होते. त्या गावात प्राथमिकच्या तीन शाळा होत्या. परक्या शाळेत समीर मोठ्या शिशुत जाणार होता, तेही शालेय वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटल्यावर!

झालं असं होतं की, मी  ‘कदाचित’ या चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले होते तेव्हा सहा-सात महिने मी मुलांना भारतातल्या शाळेत घातलं होतं आणि मुलं रूळायला लागली तोवर अमेरिकेत परतायची वेळ आली. असं मधूनच नव्या शाळेत रुजू होणं त्यालाही जड जाणार होतं आणि मलाही!
  ‘हॅलो, अँश्विनी, .. मी बरोबर उच्चारलं ना नाव?’
- मी हो म्हटलं.
  ‘मी शेरी हेबर, स्वागत समितीची प्रमुख.तुला काही शंका असेल, अडचण असेल तर बेशक फोन कर मला. नाहीतर घरी चहाला येतेस का?’
- बापरे, माझ्या मनातली घालमेल हिला कशी कळली असेल? इतक्या खुलेपणाने बोलणारी भेटल्यावर मीही जरा मोकळी झाले,
  ‘एक विचारू का? माझ्या मुलाला खूप फूड ऐलर्जीज आहेत, अस्थमा आहे, तो बुजरा..’
मला मध्येच तोडत ती म्हणाली,  ‘बेनला म्हणजे माझ्या मुलाला पण खूप अँलर्जीज आहेत आणि तोही बुजरा आहे.’
आमचा पहिला फोन 45 मिनिटं चालला. त्या संभाषणात तिच्या मुलासाठी दर आठवड्याला ओ. टी. (ऑक्यूपेशनल थेरपीस्ट) ला घरी बोलावते,  बेनला माणसात, सभोवतालच्या वातावरणात रूळायला मदत करते आहे, हे तिनं मला मोकळेपणाने सांगीतलं.   जाता जाता जवळचे अँलर्जीस्ट, दातांचे- मुलांचे डॉक्टर्स सगळ्याची माहिती दिली. त्या पहिल्या फोनमध्येच शेरी माझी मैत्रीण झाली ती जन्मभराची!
शेरी.. दिसायला म्हणाल तर उठून दिसेल असं तिच्यात फारसं काही नाही. जाड काळेभोर केस, अगदी चिंचोळं कपाळ नि तेदेखील  ‘फिन्ज’ हेअर स्टाईलने झाकलेलं. छान मध्यम बांधा. पण ढगळ कपड्यात उगाच लपवते त्याला. तिच्या चेहर्यावर मेकअप फारसा कधी पाहिलाच नाही, न कधी तिच्या गळ्यातल्या- कानातल्याकडे माझं लक्ष गेलं. पण तिच्या सौम्य स्वभावाकडे नि उत्साहाच्या उधाणाकडे मात्र मी नक्कीच आकृष्ठ झाले. तिच्या उत्साहाच्या  उधाणात लोकांचा अहंभाव, स्वार्थ, नाहक ताठा त्यांच्याही नकळत वाहून जाताना पाहिलाय मी!

हवाईच्या होनुलुलू बेटावरचा तिचा जन्म. खुल्या मनाने आलिंगन देणा-या  ‘आओ जाओ घर तुम्हारा’ संस्कृतीत वाढली ती. तिथल्या विख्यात  ‘पूनहू’ शाळेची ती विद्यार्थिनी. ही बराक ओबामाची शाळा! तो तिच्या जवळच्या मित्रांमध्ये नव्हता. पण तिच्या बास्केटबॉल खेळणा-या  मित्रांचा तो बडी (सवंगडी) होता.
सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणारी, दांडगा उत्साह असणारी शेरी मला माझ्या लहानपणाची आठवण करून देते. व्यावसायिक झाल्यानंतर  ‘परफेक्शन’चं  भूत माझ्या डोक्यावर चढलं आणि निकालाची पर्वा न करता धडक गोष्टी करण्याचा माझा स्वभाव थोडा मागे पडला होता. पण स्वेच्छेने सामान्य पालकांचं आयुष्य जगताना मला शेरी भेटली नि माझ्यातल्या  ‘खुल्या मनाच्या’ अश्विनीला जागं करून गेली.

गप्पा मारताना एकदा शेरी सांगत होती,  ‘अख्ख्या बेटानंच वाढवलं मला माझ्या अस्थिर बालपणात. ..माझ्या आई-वडिलांत बेबनाव झाला. मुलांकडे दुर्लक्ष करून त्यांनी वैयक्तिक शौकीन आयुष्याला प्राधान्य दिलं. विभक्त कुटुंबात इथल्या नि तिथल्या सावत्र भावंडांत मी वाढले. बरं, त्या छोट्या बेटावर कोणतीच गोष्ट लपली नाही. त्यामुळे लपवणं, हातचं राखून ठेवणं जमतच नाही मला. लोकांची दु:खं पटकन कळतात नि समजून घेता येतात.’
तिचं ऐकताना एका गोष्टीचा खुलासा मात्र झाला.. आमच्या पहिल्या फोनवरच्या संभाषणात माझ्यासारख्या अनोळखी नि परक्या व्यक्तीकडे आपल्या मुलातल्या उणिवा आणि स्ट्रगल्सबद्दल शेरी मोकळेपणानं बोलली होती. ते मला दिलासा देणारं असलं तरी  विनाकारण नि थोडंफार अस्वाभाविकच वाटलं होतं. कारण ते मला नवीन होतं. आपल्याकडे समाजात, आपल्या संसाराचं चित्र  ‘आहे त्यापेक्षा अधिक मनोहर’  रंगवण्याकडे, दिखाऊपणाकडे झुकाव असतो असं आता जाणवतं. 

शेरी बोलत राहिली आणि दु:ख शेअर करण्यामागचे तिचे विचार पारदर्शकपणे समोर आले. ती सांगत होती,  ‘बेटावरच्या माणसांनी मला माझ्या दु:खासकट आपलंसं केलं नसतं, तर सावरणं जड गेलं असतं मला.’
हे असं आपलं दु:ख शेअर करत, माणसातली दरी कमी करून सुसंवाद साधणं मला महत्त्वाचं वाटतं. तिच्या या नि:संकोच बेटावर कितीजणांची मनं निर्वस्त्र होऊन मोकळी झाली असतील, हे एक शेरीच जाणे!पण शेरीने त्या विश्वासाचा गैरफायदा घेतला नाही, गॉसीप केलं नाही.

दु:ख शेअर करण्यात  ‘सेल्फ हिलिंग पॉवर’’ असते,  याचा प्रत्यय तिच्याच बाबतीत पुन्हा एकदा आला मला, तो तीन वर्षांपूर्वी. सकाळी अचानक शेरीची ईमेल आली.   ‘एक चांगली नि वाईट बातमी’ या शीर्षकाची ईमेल.  ‘माझ्या मैतरांनो, ’ अशी सुरुवात करून तिने आपल्याला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झाल्याची बातमी कळवली होती. तिने पुढे लिहिलं होतं,
  ‘ रोग एकाच स्तनात पसरला, तरी दोनही काढून टाकून रिकन्स्ट्रक्शन करणार, म्हणजे एकाला एक मॅचिंग सेट मिरवता येईल मला! विनोद बाजूला, पण माझ्या सर्जरीचं हे वेळापत्रक आहे आणि एक सांगते, मला कर्करोग  झाला आहे याचा बाऊ मी करत नाही आणि तुम्हीही करू नका. सी यू सुन ऑन द अदर एण्ड!’
सोडवून टाकावा गुंता हा असा! 
मी तत्परतेने तिच्या घरी फुलं पाठवली. 

काही दिवसांनंतर विचारच करत होते मी भेटायला जाण्याचा आणि अचानक तीच भेटली मला. कशी भेटली असेल बरं? ती त्यावेळी माध्यमिकच्या बोर्डावर होती नि निधी गोळा करण्याच्या टिमची प्रमुख. त्या दिवशी ती गळ्यात रंगीत पिसांच्या माळा घालून मुलांना सोडायला आलेल्या प्रत्येक पालकाशी हस्तांदोलन करून आज  ‘गिव्हिंग च्युसडे’ (निधीदानाचा मंगळवार) आहे याची आठवण करून द्यायला उभी होती.
दु:ख वाटण्याच्या  ‘सेल्फ हिलिंग’ तंत्राची ताकद त्या दिवशी माझ्य समोर उभी होती!

शेरीची आई ज्युईश म्हणून केवळ जन्मानं ती ज्यू. पण बेटावरच्या तिच्या ब-याच मैत्रिणी चायनीज आणि जपानी. ख-या अर्थाने ती धर्माकडे, रितीरिवाजांकडे डोळसपणे पाहायला शिकली ती सिलिकॉन व्हॅलीच्या जगविख्यात स्टैनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. इंग्लिश भाषेत विशारदचे शिक्षण घेत असताना. दानशूर लोकांनी दिलेली मदत, शिष्यवृत्ती आणि कॉलेजात, खानावळीत, वाचनालयात केलेल्या नोकरीतून पैसे उभे करत शेरी शिकली आणि पदवी मिळाल्यावर एका भल्या मोठ्या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानात तळातून सुरुवात करून मॅनेजर झाली. उंची हॉटेलात राहाणं, मोठ्या एक्झिबिशन्सला जाऊन ट्रेन्डी दागिने निवडणं, दुकानाच्या सजावटीपासून ते सेल्स रेप्रेझेंटेटिव्ह ने ते कसे विकावे इथपर्यँत सारे सोपस्कार ती करत असे.
स्टॉटला, तिच्या 35 वर्षांच्या सोलमेटला शेरी ब्लाइंड डेटवर भेटली, तेव्ही ती 29 वर्षांची होती. तो कोरनेल विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर नि खूप पारंपारिक ज्यू कुटुंबातला. त्याच्याशी झालेल्या मैत्रीतून ती ज्युईश धर्माच्या समाजाभिमुख शिकवणींकडे आकृष्ठ झाली.  ‘मी खूप देव-देव करणार्यांमधली नाही. पण न्याय, दया आणि संवेदनांच्या मदतीने हे जग अधिक सुंदर बनवायची मला आतून ओढ आहे. पुस्तकी ज्ञानाचं महत्त्व आहेच, पण सहानुभूती आणि संवेदनशीलतेतून हे जग पाहणं आणि दुसर्याला समजून घेणं ही खरी ज्ञानप्राप्ती.’’-  हे सांगताना शेरीच्या डोळ्यात सेवाभाव तरळताना मी पाहिला.

हा सेवाभाव तिच्या प्रत्येक कृतीत मी अनुभवला आहे. काही माणसं  ‘मी’ हे केलं,  ‘मी’ त्यातला पहिला हे केवळ सांगण्याकरता गोष्टी करतात. पण फार थोडी माणसं निकड आहे हे जाणून नवे संकल्प, नवे प्रयोग राबवतात. नवी वाट काढतात आणि अहं बाजूला ठेवून मागून येणा-याचं त्या वाटेवर स्वागत करतात.
2008 मध्ये आर्थिक मंदी आली आणि आमच्या शाळेत पैशाअभावी चित्रकलेच्या क्लासवर गदा आली. त्यावेळी पुढाकार घेऊन शेरीने आर्ट इन अँक्शनचा नवा उपक्रम राबवला. पालकांनाच चित्रकलेचे धडे देण्याचं ट्रेनिंग देऊन तिने स्वयंसेवकांचे ताफे तयार केले. या उपक्रमात मी तिच्या हाताखाली हिरिरीने भाग घेतला. गंमत म्हणजे आर्थिक मंदी गेल्यावरही तो उपक्रम शाळांनी चालू ठेवला आहे अगदी आजपर्यँत.
शेरीच्या नेतृत्वाखाली मुला-मुलींचे स्काऊटचे संघ स्थापले गेले. त्यांच्या नियमांबरहुकुम सगळ्या अँक्टिव्हिटीज काटेकोरपणे पार पाडण्याचं दिव्य तिने सातत्याने 7 वर्ष  नेटानं केलं. अमेरिकेत त्याला फार महत्त्व. कारण 7 वर्षांनी मुलांना जो बिल्ला/बिरूद मिळतं त्याचा फायदा महाविद्यालयात अँडमिशन मिळवताना होतो.

शिक्षकांच्या वेळेअभावी  ‘नॉर्थ स्कूल’चा टॅलेन्ट शो बरीच वर्ष  बंद पडला होता. पण शेरी पालक संघाची प्रमुख झाली आणि सगळ्या मरगळलेल्या गोष्टींमध्ये जान येऊ लागली.
प्राथमिकच्या प्रत्येक पालकाला वाटे की, माझं मूल दोन मिनिटं का होईना स्टेजवर चमकू दे. पण चिमुरड्या पोरात धाडस असतंच असं नाही. मग शेरीने डान्स बसवायचा ठरवला. घरचाच स्टिरिओ-माईक सेट. मुलांना भुका लागतील म्हणून मोठ्या डब्यात स्नॅक्स घेऊन शाळा संपल्यावर आवारातच प्रॅक्टिस सुरू व्हायची. टिवल्या-बावल्या करणा-या मुलांकडून तालीम करून घ्यायला तिला चांगलं जमायचं. डोक्यावर बर्फाची लादी ठेवून संयमानं शिकवण्याचा दांडगा उत्साह तिला.

दुसरी-तिसरीमध्ये असेपर्यँत  मुलांना आई सतत शाळेत दिसणं आवडेल. पण पाचवीतली मुलं मित्रांच्या घोळक्यात असताना आईला शाळेत पाहून नक्कीच संकोचतात, याचा मला अनुभव आहे. मी तिला विचारलं, तुझ्याकडे नाही का असा एखादा मजेदार अनुभव? तिच्या चेह-यावर एकदम हसू पसरलं. म्हणाली,
  ‘पाचवीच्या मुलांचा नाच बसवा अशी सगळ्या आयांनी गळ घातली. मी उत्साहात हो म्हटलं खरं. पण बेनला त्याची बिलकुल आवड नव्हती आणि वकूबही! त्याच्याच वर्गातल्या 10 मुलांना आमच्या मागच्या अंगणात डान्स शिकवायची तेव्हा तो बिचारा पुरता अवघडून जायचा. रुसून बसला होता किती दिवस.इतक्या वर्षांच्या कामात मुलांनी, नव-याने खूप सहकार्य केलं मला. घरी हेळसांड झाली तरी दुर्लक्ष केलं. पण एकदा मोठी गंमत झाली’हाताने कपाळावरची बट सारखी करत शेरी सांगत होती,  ‘ शाळेकरता पैसे उभे करायला मी मेक्सिकन थीमची साल्सा पार्टी करायचं ठरलं. माणशी पन्नास डॉलर देऊन 20 जोडपी येतील, त्यांना साल्सा डान्स शिकवायला कोणाला तरी बोलवायचं आणि घरीच टाकोज आणि मार्गारिटा असं प्लानिंग बनवायचं. शाळेला 2000 डॉलर मिळतील आणि सर्वांना मजा येईल. पण निधी संकलन समितीला ती कल्पना इतकी आवडली की त्यांनी ती जाहीर लिलावात टाकली. पालकांनी बोली लावली आणि एका दाम्पत्याने ती पार्टी 3500 डॉलरला विकत घेतली. शाळेला जास्त पैसे मिळणार म्हणून सगळे खूष. पण पुढे काय वाढून ठेवलंय हे तिला कुठे माहित होतं? त्या कुटुंबाने पाटी स्वत:च्या घरी ठेवली आणि 100 माणसं बोलावली. त्या शंभरांना जेवण, मार्गारिटा, पाहुणचार आणि सारी आवराआवरी करताना तिच्या तोंडचं पाणी पळालं. नाइलाजाने जवळचे मित्र-मैत्रिणी, नव-याला कामाला लावलं तिने. पाटीर्ची मजा लुटून झाल्यावर त्या निर्लज्ज दाम्पत्याने दिवे बंद केले. मिट्ट काळोखात त्या सर्वांनी गाड्यांत सामान भरलं.. ’- शेरी बोलायची थांबली. मग तिचे बारीक डोळे अजून बारीक करत फक्त वरची दंतपंगती दाखवत निर्व्याज हसली. म्हणाली,  ‘त्या दिवशी स्कॉटने अशी फुकट हमाली परत न करण्याचं वचन द्यायला लावलं मला!’
शेरीच्या गेल्या 12 - 15 वर्षांतल्या या सेवेतले सारेच प्रयत्न प्रशंसनीय होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारख्या अनेकांच्या मनात तिने स्वयंसेवकाची बीजं रुजवली. आपल्यातल्या प्रत्येकालाच काम करायला वेळ नि उचलून द्यायला पैसे हाताशी असतातच असं नाही. पण जिथे जिथे समाजात शेरीसारख्या वल्ली भेटतील तिथे क्षणभर थांबून पाठ थोपटून किमानपक्षी त्यांच्या कामाची पोच तर आपण नक्कीच देऊ शकतो.

नुकतीच शेरीची दोनही मुलं युनिव्हर्सिटीत रवाना झाली. स्कॉटनेही रिटायरमेंट घेतली.   ‘एम्प्टी नेस्टर’च्या भूमिकेत शेरी कशी रूळेल असं माझ्या मनात येई. तो तिची ईमेल आलीच मला.
प्रिय अश्विनी,
वेलकम टू  ‘ला ब्लास्ट!’ नुकतीच मी डान्स-एक्सरसाइज क्लासची सर्टिफाइड शिक्षक झाले आहे. एकदा व्यायाम करायला ये शुक्रवारी सकाळी.
लव
शेरी
- जन्मजात असलेल्या नाचाच्या आवडीची सांगड  व्यायामाशी घालून शेरीने  स्वत:साठी आणि इतरांना स्वास्थ्याचा, आनंदाचा मार्ग मोकळा केला होता. मागच्या शुक्रवारी मी तिच्या क्लासमध्ये सहभागी झाले होते. खूप मजा आली. मी तिला कडकडून मिठी मारली!
तिच्या डान्स मुव्हमधली अदा, चपळाई पुन्हा एकदा आठवत आणि उर्वरित आयुष्यात अशा आणिक काय काय मुव्ह्जने ती मला चकित करेल या विचारात उल्हसित मनाने मी घरी परतले!

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत.)  

ashvini.bhave19@gmail.com 

Web Title: Ashvini Bhave writes about her live wire friend sherry Hebbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.