Ashvini Bhave recalls what happend when she received a call from India asking if she would like to make a comeback. | ...अन् दहा वर्षांच्या दुराव्यानंतर मी पुन्हा कॅमेऱ्यासमोर परतले; सांगतेय अश्विनी भावे

...अन् दहा वर्षांच्या दुराव्यानंतर मी पुन्हा कॅमेऱ्यासमोर परतले; सांगतेय अश्विनी भावे

- अश्विनी भावे

मुलं तीन-चार वर्षांची असतील तेव्हा आम्ही डिस्नेलॅण्डला फिरायला गेलो होतो. दोन मुलांना बाजू बाजूला बसवलेला डबल स्ट्रोलर तिथल्या अचाट गर्दीतून ढकलत नेणं हे एक दिव्यच असायचं. पण त्या राइड्समध्ये बसायचा मलाच फार उत्साह ! ‘कप-सॉसर’ या चक्कर येईपर्यंत गोल-गोल फिरणाऱ्या राइडच्या लाइनमध्ये आम्ही चवथ्यांदा उभे होतो, नि माझा फोन वाजला. भारतातला नंबर होता.
‘अगं चंदू बोलतोय.’
चंदू म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. तसं चंदू आणि मी एकत्र कधीच काम केलं नव्हतं. पण आमच्या क्षेत्रातल्या त्याच्या कामाबद्दल मला खूप आदर होता. एखाद-दोनदा त्याच्या आॅफिसमध्ये नुसत्या गप्पा मारायला गेल्याचंही आठवतंय मला. पण उगीच हाय, हॅलो करायला फोन करू अशी घसरट नव्हती.
मी विचारलं, ‘काय रे का फोन केलास?’
मला चिंता की आता जास्त बोलायला लागलो तर लाइनमधला नंबर जाईल. पण गलक्यात काही ऐकूच आलं नसतं म्हणून बाजूला गेले. ‘हा, बोल रे.’
तो म्हणाला, ‘अगं, एका रोलसाठी तू हवी आहेस.’
मी पार धुडकावून लावलं. ‘अरे, छे ! मला कामबीम नाही करायचं आहे, मुळात मी स्वत:च कलाकार म्हणून स्वत:चा विचार करत नाही. आय अ‍ॅम अ हॅपी मॉम.’
तो म्हणाला, ‘अगं हो, माहीत आहे मला; पण कथा तर ऐकशील की नाही?’... तो बोलत राहिला... ‘बुद्धी चेहºयावर दिसणारी आणि ताठ मानेनं वावरणारी, अशा एका न्युरो सर्जनची भूमिका आहे आणि पंचविशीतली नाहीये तिला एक लहान मुलगीदेखील आहे.’
‘हं...’ - मी ऐकत होते.
‘तुला जर कळलं की आपण लहानपणी दिलेल्या जबानीमुळे एका व्यक्तीला न केलेल्या गुन्ह्याबद्दल २० वर्षांसाठी तुरुंगवास झालाय आणि जर ती व्यक्ती म्हणजे तुझे जन्मदाते वडील असतील तर?’
माझं कुतूहल चाळवलं.
‘सायकॉलॉजिकल थ्रिलर. पद्धतीनं करणार आहेत.’
- चंदू बोलायचा थांबला नि माझं विचारचक्र सुरू... सुशिक्षित अर्बन लूक, वय पस्तिशीतलं
लहान मुलगी आहे म्हणजे उगीच वय लपवते आहे वगैरेचा प्रश्न नाही तीनच महत्त्वाची पात्रं सायकॉलॉजिकल ड्रामा म्हणजे माझा आवडता जॉनर शिवाय जबरदस्त सेंट्रल आयडिया (प्रिमाइस) आणि ज्याच्यावर विश्वास टाकू शकेन असा माझा मित्रच दिग्दर्शक
आॅल बॉक्सेस चेक्ड !
पण... १० वर्षांची गॅप, जीवघेणी दरी वाटावी अशी, ती कशी पार करू? या दहा वर्षात माझा देश बदलला, वातावरण नि माझं भावविश्व बदललं... परत कॅमेºयासमोर जायचं नाही असा निर्णय समजून-उमजून घेतला ना आपण? आणि प्रत्यक्ष जीवनात ‘आई’ची भूमिका स्वीकारलीच आहे की आपण ! जगात असं दुसरं सुख नाही असं शंभरवेळा वाटतं की नाही आपल्याला... मग आता फालतूचं डिस्ट्रॅक्शन का?
...माझा स्वत:शीच संवाद तर कधी विसंवाद चालू होता. फक्त ५० टक्के आत्मविश्वास, २० टक्के चंदूवरचा विश्वास आणि ३० टक्के पोटात गोळा ! मी चंदूला म्हटलं ‘करते; पण फक्त तुलाच मी हवी आहे की, निर्मात्यांनाही? त्यांच्याशी माझं बोलणं करून दे.’
चंदू ‘हो’ म्हणाला. मी फोन ठेवला नि पुन्हा एकदा आईपणात गुरफटून गेले.
एक महिना गेला असेल, सकाळी चहा पिताना किशोरनं विचारलं, ‘त्या फिल्मचं पुढं काय झालं?’
मी म्हटलं, ‘काहीच नाही. प्रोड्यूसर बॅक आॅफ झाला असेल.
‘यू शूड्स फाइंड आउट’ - किशोर म्हणाला.
तुम्हाला सांगते, ‘फिल्म मेकिंग इज मॅजिक’ हे १५० टक्के खरं आहे. एक चांगली फिल्म बनण्याआधी १०-१५ तरी उत्तम कल्पना, कथासूत्रं मरून जातात. गर्भपाताचं जितकं दु:ख आईला असतं तितकंच दु:ख त्या क्रिएटिव्ह जिवांना असतं. चांगल्या संहिता/विषय का मरतात?
कधी क्रिएटिव्हिटी कमी पडते, कधी जॉनर चुकतो, विषयांच्या भाऊगर्दीत मुसंडी मारायचं बळ कमी पडतं, पैसेवाल्या निर्मात्यांचा निर्धार कमी पडतो, योग नसतो... कारणं अनेक !
या कथानकाच्या बाबतीत निर्मातींचा निर्धार कमी पडला आणि अनेक वर्षं पडद्याआड गेलेली अश्विनी हा रोल करू शकेल का? - या नाजूक विषयावर प्रोड्यूसर तुटला. आता चंदूनं हे सांगितलं नाही तरी ते समजून सोडून देण्याइतकी मी अनुभवी होतेच.
किशोर तसा मितभाषी; पण मला म्हणाला, ‘पण मग तू का करत नाहीयेस? मग यूएसमधली फिल्मची डिग्री काय वाया घालवणार? जस्ट डू इट. प्रोड्यूसर इट. विचार करू नको !!’
हे असं का?
दहा वर्षांच्या गॅप नंतर मी एक अवॉर्ड विनिंग भूमिका पार पाडेन असा विश्वास चंदूला का वाटावा? निर्मातीच्या भूमिकेत जाण्याची धमक माझ्यात आहे हे किशोरला का वाटावं? अचानक मी भूतकाळातल्या टप्प्यांचा आढावा घेऊ लागले.
डॉ. अरुण टिकेकरांनी कसं ताडलं की मी लेखणी हातात घेऊ शकेन? बाळबोध घरातली अननुभवी मी, ‘गगनभेदी’सारख्या नाटकात व्हॅम्पची महत्त्वाकांक्षी आणि ग्लॅमरस भूमिका करू शकेन हा विश्वास मोहन काकांना (मोहन वाघ) का वाटावा? जिला तालसुद्धा धरता येत नाही अशी मी, ‘आजा वे माही’तल्या नृत्यामुळे लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होणार आहे हे डब्बूला (रणधीर कपूर) कसं ठाऊक होतं? वरणभात तूप संस्कारातली मी; पण मनोरंजनाच्या बिग, बैड वर्ल्डमध्ये माझं नाव आदरानंच घेतील हा विश्वास माझ्या आईला तरी कसा आणि का वाटला असेल?? की नुसता विश्वास टाकल्यानंच ५० टक्के बाजी मारता येते? मग आपण फक्त २५ टक्के जबाबदारी घ्यावी आणि उरलेले २५ टक्के नाहीतरी नशिबावर निर्भर असतातच !
- हुश्श्य! मनातलं युद्ध संपवलं आणि मी कामाला लागले.
बघता बघता फिल्म बनवण्याची लगीनघाई सुरू झाली. मी कळत-नकळत कामात ओढली जाऊ लागले.
चंदूशी सतत फोनवरून चर्चा सुरू झाल्या.
आॅगस्टमध्ये शूट करायचं पक्क केलं. मग पहिल्यांदा पूर्ण स्क्रिप्ट वाचलं. मूळ एकांकिकेवरून बेतलेल्या नाटकाचं ते बोजड आणि जरा भडक स्क्रिप्ट होतं, त्याला सिनेमायोग्य बनवणं हे एक कामच होतं. गिरीश जोशी ते काम पाहात होता. संवाद प्रशांत दळवी आणि यांचा मॉनिटर चंद्रकांत कुलकर्णी. वेळेचा पाबंद आणि व्यक्तिरेखा समजण्यात मास्टर ! असे तिघे वॉज अ परफेक्ट कॉम्बिनेशन !
इकडे मी आणि किशोर स्वत:चं घर घेण्याच्या शोधात होतो, ते आम्हाला सापडलं. विचार केला, नवीन वस्तीत स्थिरस्थावर होऊ आणि मग आॅगस्टमध्ये शूट, म्हणजे वेळेचं गणित बरोबर होईल, तर चंदूचा फोन,
‘शूटिंग मे महिन्यात करूया. पावसाळ्याच्या आत’.
‘अरे ! पण कसं शक्य आहे?’ - माझा जीव कंठाशी आला; पण ठरलेल्या तारखांवर अडून राहण्याची शक्ती तेव्हा माझ्यात नव्हती.
माझ्या मनात एक वेगळीच भीती. मागे पुढे मोठं अंगण असेल असं घर घेऊया, हा माझाच अट्टाहास, किशोरला खूपसं आवडलं नाही तरी तेच घर घेऊया हा माझाच निर्णय!
- आणि किशोरला नव्याचं वावडं ! तो तर फाटलेलं असलं तरी गेली २० वर्षं तेच पाकीट वापरतो. का?- तर बदल आवडत नाही.
नव्या घरात त्याला एकट्याला सोडून भारतात कशी पळू? तसं झालं तर या नव्या घरी तो कायम नाखूशच राहील का?
आई म्हणाली, ‘अग काही नाही, मनाशी धर फक्त, मग गोष्टी आपोआप सुटतील !’
- मग माझी गाडीच सुटली.
दोन आठवड्यात सॅन फ्रान्सिसकोमधल्या मोठ्या अपार्टमेण्टचं सामान पॅक केलं, नवीन घरात अनपॅक केलं. किशोर रुळावा म्हणून निदान आमची बेडरूम, त्याचं आॅफिस आणि बुक केस लावली. मग माझ्या आणि मुलांच्या सहा महिन्यांच्या बॅगा पॅक केल्या. त्यात समीरला दमा, बºयाच फूड अ‍ॅलर्जीज. मग डॉक्टरांच्या आॅफिसमध्ये खेट्या, इन्श्युरन्स कंपनीला सारखे फोन करून सहा महिन्यांची त्याची औषधं मिळवली. आईला त्रास पडू नये म्हणून त्याच्या डाएटचे पदार्थ पॅक केले. तिकडे भारतात मुलांची शाळा, एक मुलांचा उत्तम डॉक्टर, इमर्जन्सीसाठी जवळचं हॉस्पिटल, मुलांना सांभाळायला आया ही सगळी तयारी मी आईच्या मदतीनं आधीच केली होती. म्हणजे एकाच वेळी दोन टीम्स मी बांधत होते. एक फळी चित्रपटाची आणि एक फळी मुलांच्या संगोपनाची.
- शेवटी झाले मी युद्धाला तयार !
१० वर्षांच्या गॅपनंतर, दोन मुलांची आई झाल्यावर, आणि वयाची चाळिशी गाठल्यानंतर हिअर आय गो टू रीइन्व्हेण्ट मायसेल्फ !

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत)

Web Title: Ashvini Bhave recalls what happend when she received a call from India asking if she would like to make a comeback.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.