Anushka Shankar says I want to talk about myself! What does she have to say? | अनुष्का शंकर म्हणते मला माझ्याबद्दल बोलायचंय! काय सांगायचंय तिला?
अनुष्का शंकर म्हणते मला माझ्याबद्दल बोलायचंय! काय सांगायचंय तिला?

-अनुष्का शंकर

अनुष्का शंकर. प्रसिध्द सतारवादक आणि संगीतकार. पंडित रविशंकर यांची मुलगी. पण यापलीकडेही त्यांची ओळख आहे.ती म्हणजे 
 संवेदनशील आणि विचारी स्त्री. 
आपल्या बाईपणाच्या वेदनेबद्दल ट्विटर या समाजमाध्यमावर त्यांनी खुलेपणाने लिहिलं आहे. नुकतंच त्यांचं गर्भाशय एका शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आलं. त्यानिमित्तानं आपल्या पहिल्या पाळीपासून ते गर्भाशय काढून टाकण्याच्या अवस्थेपर्यंत मूकपणे सहन केलेल्या वेदना खुलेपणाने मांडणारं हे अनुष्काचं मनोगत.

गेल्या महिन्यापासून माझ्या शरीरात माझं गर्भाशय नाही. मला दोन शस्त्रक्रियांतून जावं लागलं. माझ्या गर्भाशयात खरबुजाएवढय़ा गाठी झाल्या होत्या. त्यामुळे सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेसारखं माझं गर्भाशय वाढलं होतं. माझ्या ओटीपोटातून अनेक ट्यूमर काढले गेले. आणि नंतर माझं गर्भाशयच काढून टाकण्यात आलं.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की, माझं गर्भाशय काढावं लागणार आहे तेव्हा मी हादरलेच. प्रचंड नैराश्य आलं होतं मला. मी जवळ जवळ एक महिना डिप्रेशनमध्ये गेले होते. किती प्रश्न पडले होते मला.
माझं गर्भाशयच काढून टाकलं तर माझ्यात बाईपण म्हणून काय शिल्लक राहील?  गर्भाशय काढून टाकलं तर मला पुन्हा मूल होण्याच्या शक्यता दुरावतील. शिवाय, शस्त्रक्रिया करताना माझा मृत्यू झाला तर माझ्या मुलांकडे कोण बघणार? आईविना पोरकं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं तर? माझं आणि माझ्या नव-याचं वैवाहिक आयुष्य उरेल का? .. एक ना अनेक प्रश्न पडले होते मला.

मी माझ्या मैत्रिणींशी, माझ्या घरातल्यांशी माझ्या त्रासाबद्दल, माझ्या मनातल्या प्रश्नांबद्दल बोलले तेव्हा मला जे कळलं ते तर फारच धक्कादायक होतं. माझ्यासारख्या अनेक बायकांना असा त्रास होतो आणि झाला आहे. अनकींना आपलं गर्भाशय काढून टाकावं लागलं आहे. मला खरोखर धक्का बसला. आश्चर्यच वाटलं मला. कारण मी असं कोणत्याच बाईला आपल्या या त्रासाबद्दल बोलताना बघितलं किंवा ऐकलेलं नव्हतं. एका ओळखीच्या स्त्रीला 
मी याविषयी विचारलं तर  ती म्हणाली, ‘आपल्या या बायकांच्या त्रासाबद्दल असं चारचौघांत कोणी बोलतं का? सर्वांना सांगण्यासारखा असतो का आपला त्रास?

हे काय आहे? काय बोलते आहे ही असं वाटलं मला! 

नंतर मी जरा माझ्याच भूतकाळात डोकावले. तरुण होते तेव्हासुद्धा किती शांतपणे मी मला होणारा त्रास सहन करत होते. मी तेव्हा कोणाशीच याबद्दल मोकळेपणानं बोलले नाही. कदाचित माझ्या आत असलेला संकोच, लैंगिक आरोग्याला चिकटलेली लाज मला अडवत होती. पाळीबद्दल काय बोलायचं म्हणून गप्प राहात होते मी !

मी अकरा वर्षांची होते तेव्हा पहिल्यांदा मला पाळी आली. पुढे कित्येक वर्षं मला पाळीच्या दिवसात खूपच रक्त स्त्राव व्हायचा. 20-25 दिवसांनी पाळी यायची आणि सलग दहा दिवस रक्त स्त्राव व्हायचा. डॉक्टर गोळ्या द्यायचे. पुढे मला यातूनच अर्धशिशीचा त्रास उद्भवला. भयानक दुखायचं डोकं. त्या वेदनांनी अक्षरश: मी गडाबडा लोळत असे; पण याबाबत कोणाशी काही बोलायची नाही. 

जेव्हा मी 26 वर्षांचे होते तेव्हा माझ्या गर्भाशयात पहिल्यांदा फायब्रॉइड आढळले. डॉक्टरांनी मायमोक्टोमी करून गाठी काढल्या आणि माझं गर्भाशय काढलं. जिवात जीव आला माझा. त्यानंतर मला दोन गोंडस मुलं झाली. 
माझी पहिली प्रसूती सिझेरिअन शस्रक्रियेद्वारे झाली. गर्भाशय फाटण्याची भीती होती म्हणून तातडीनं सिझर करावं लागलं. पण त्यानंतर मला मोठा जंतुसंसर्ग झाला. मला रोज दवाखान्यात जावं लागायचं. नर्स माझे टाके उघडून जखम साफ करायची. 

शरीरात रक्तच राहिलं नव्हतं माझ्या. अशक्त झाले होते मी. बाळाला अंगावर पाजत होते. दरम्यान, दौरे चालू होते. अल्बमच काम चालू होतं. जास्तीत जास्त दोन तीन तास झोप मिळायची मला. माझ्या दुसर्‍या बाळाच्या वेळेस मी गरोदर होते तेव्हा मला आतून काहीतरी खातंय असा भास व्हायचा मला. अर्धशिशीचा त्रास तर खूपच वाढला होता. महिन्यातून दोन-तीन वेळा अर्धशिशीच्या वेदनांनी मी तळमळायची. 

 

मला आठवतं की या अवघड काळातही मी माझ्या बाळाचे हसरे फोटो शेअर केले होते. माझ्या वेदनांबद्दल बोलावं, कोणाला काही सांगावं असं वाटलं नव्हतं. असं काही टाकलं असतं तर लोकं काय म्हणाले असते? मी काहीच बोलले नाही.

महिनोन्महिने मनावर ताण आला होता. सतत रक्तस्त्राव होत होता. पाठ भयंकर दुखत होती आणि अर्धशिशी तर होतीच. डॉक्टरांनी माझं गर्भाशय काढावं लागणार हे सांगितलं. .आता मी घरी आहे. बरी होते आहे. 
तेव्हा मी याबद्दल काहीच बोलले नाही. पण आता बोलते आहे. कारण माझं मन म्हणतंय की, आता तुला बोलावंच लागेल. स्वत:साठी.. माझ्यासारख्या इतर अनेक बायकांसाठी.

पण मी माझ्याबद्दल जे सर्व सांगितलं ते कोणाला माझ्याबद्दल सहानुभूती वाटावी, दया वाटावी, माझ्या आधाराला कोणीतरी धावून यावं म्हणून मी हे सांगितलं नाही. मला माहितीये की, असा त्रास सहन करणारी जगातली मी एकमेव स्त्री नाही. 
माझ्यासारख्या खूपजणी आहेत ज्या अशाप्रकारच्या टोकाच्या वेदनेतून जातात. मी यासाठी हे सांगितलं की, कोणीच याबद्दल काही बोलत नाही. मी हे सांगितलं कारण कोणीही आता आपल्या या वेदनेबद्दल शांत राहू नये. त्यांनी मोकळेपणानं बोलावं, वेळच्यावेळी आपल्या त्रासाबद्दल सांगावं यासाठी मी हे सांगितलं.
आणि आतून वाटलं की का शांत बसायचं? का नाही सांगायचं? यात संकोचण्यासारखं, लाजण्यासारखं काय आहे? बायका आपल्याला होणारा त्रास कायम लपूनच ठेवतात. पण त्यांनी बोललं पाहिजे.  
बोललं की मन मोकळं होतं. आणि पुढे होऊ शकणारी गुंतागुंत टाळता येते. आणि खरंच यात न बोलण्यासारखं काय आहे?’

Web Title: Anushka Shankar says I want to talk about myself! What does she have to say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.