Anganwadi Tai- A woman from village who takes hard effort for children and women's | गावखेड्यात मुलांसाठी कंबर कसून काम करणारी अंगणवाडी ताई !
गावखेड्यात मुलांसाठी कंबर कसून काम करणारी अंगणवाडी ताई !

-साहेबराव नरसाळे


गरोदर मातांना लसीकरणाची माहिती देणे, आरोग्य तपासणीचे सल्ले देणे, स्तनदा मातांना विविध लसींची व तपासण्यांची माहिती देणे, बाळाचा व मातेचा आहार पुरविणे, बाळाचे वजन-उंची प्रत्येक महिन्याला तपासणे, किशोरवयीन मुलींना आहार पुरविणे, सॅनिटरी नॅपकिन पुरविणे, स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे, सहा महिने ते तीन वर्षाच्या बाळांना आहार पुरविणे, लसीकरण करून घेणे, वजन-उंची तपासून ते बाळ कुपोषित असेल तर त्याला कुपोषणातून बाहेर काढणे, कौटुंबिक-आरोग्य - शौचालय - लसीकरण -दारिद्रय़रेषेखालील व कुटुंबनियोजन अशा वेगवेगळ्या सर्व्हेची कामे, त्याशिवाय रोज सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत अंगणवाडीची कामे, त्यानंतर गृहभेटी व त्याचे अहवाल तयार करणे, पर्यवेक्षिका - प्रकल्प अधिकारी आणि महिला व बालकल्याण अधिकार्‍यांचे रिपोर्ट, सव्र्हेच्या नोंदी, कुपोषणाचे वेगवेगळे रिपोर्ट पाठविणे.

- ही आहे अंगणवाडीताईंच्या कामाची जंत्री़ ती वाचता वाचता माणूस थकतो; पण अंगणवाडीताई हे काम करताना कधी थकत नाही़ त्या जे काम करतात ते सगळे सरकारी़; पण सरकार त्यांना आपले कर्मचारी म्हणायला तयार नाही़ त्यांनी सेविका म्हणूनच काम करावे, जगावे आणि मरावेही, असे सरकारचे म्हणणे आह़े

सरकारचे धोरण ज्या अंगणवाडीसेविकांनी केलेल्या सर्व्हेच्या आधारे ठरते, त्या अंगणवाडीसेविका मात्र सरकारी धोरणांत कोठेच नसतात़ त्यांच्यासाठी सरकारने पगाराऐवजी स्वतंत्र मानधनाची कुबडी तयार केली आह़े अंगणवाडीताईंचे काम सरकारच्या लेखी अतिमहत्त्वाचे आह़े, म्हणूनच अंगणवाडी-ताईंना मेस्मा कायद्यांतर्गत आणण्यात आल़े त्यामुळे त्यांना कोणतीही सुट्टी नाही़ रजा नाही़ आजारी असल्या तरीही काम चुकत नाही़. फक्त एवढेच, की या अतिमहत्त्वाच्या कामाचा पगार त्यांना नाही.
गावातला सरपंच या ताईला काम सांगतो, ग्रामसेवक माहिती मागतो, आरोग्य विभाग सर्व्हे -लसीकरणाला बोलावतो, महिला व बालकल्याण विभागाकडून महिला-बालकांशी निगडित जे काही असेल ते अंगणवाडीताईलाच सांगितले जात़े या सार्‍या धबडग्यात तिला घर असते, संसार असतो, पती व मुले असतात हे सोयीस्करपणे सर्वजण विसरतात़ त्यातून या तायांना रोज बाहेर फिरावे लागते. हे बाहेर फिरणे अनेकींच्या कुटुंबांना चालत नाही. हिला रोज-रोज कोणत्या मिटिंगा असतात म्हणून छळणारे सासर अनेकींच्या नशिबी येते. त्याबद्दल सांगणार कोणाला? एवढे करून वर तिला तिच्या हक्कांसाठी थाळी बडवावी लागते, आंदोलने करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात़

वर्षात केवळ 17 सुट्टय़ा़ त्या संपल्या की बिनपगारी सुट्टी़ घरात पती आजारी असला तरी सुश्रुषा करायला ती घरी नसत़े मुल आजारी पडले तरी दवाखान्यात न्यायला ती नसत़े ती मोडून पडली तरी तिला उठवायला कोणी धावत नाही़ अशा अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आपले काम अत्यंत जबाबदारीने निभावणार्‍या,  पोटच्या मुलाला घरी एकटे सोडून अंगणवाडीतल्या मुलांच्या भुकेला घास रांधणार्‍या अशा अनेक अंगणवाडीसेविका राज्यभरात कोणत्याही गावात भेटतील़ 
‘देशातले कुपोषण संपवायचे काम केवळ अंगणवाडीसेविकाच करू शकतात़ त्यांचे काम हे अतिमहत्त्वाचे आहे’, असे ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या़ 
.. ही भावना सरकारने आता प्रत्यक्ष कृतीमधूनही अधोरेखित केली पाहिजे.

-------------------------------------------------------------

पदरमोड करून सेवेची सक्ती

*  अंगणवाडी सेविकांना 7 हजार 30 रुपये, तर मिनी अंगणवाडीसेविकांना 4 हजार 500 रुपये मानधन मिळत़े .

*  हे तुटपुंजे मानधन वेळेवर मिळेलच याची खात्री नाही.

* घरोघर पाय मोडीत हिंडावे लागत़े त्यासाठी त्यांना प्रवासभत्ताही मिळत नाही़
*  अनेक सर्व्हेचे मानधनही दिले जात नाही़ लसीकरणाचे मानधन देण्याची आश्वासने अनेकदा सरकारी यंत्रांनी दिली़ पण मानधन काही मिळाले नाही़ 
 पदरमोड करून सरकारची सेवा करायची, असा उफराटा न्याय (?) या तायांच्या नशिबी सरकारने वाढून ठेवलाय़
----------------------------------------------------------

फक्त काम करा, ‘कुरकुर’ नको !!
 

बचतगटांमार्फत अंगणवाडीत पोषण आहार पुरविण्याचा निर्णय झाला़ त्यासाठी बचतगट स्थापन करायचे, महिलांना प्रोत्साहित करायचे हे 
कामही सरकारने    अंगणवाडीसेविकांवर लादल़े   महिला तयार होत नाहीत, हे पाहून अनेक अंगणवाडीसेविका स्वत: त्या बचतगटात सामील झाल्या़ बचतगट चांगल्या प्रकारे चालविल़े.   ज्यावेळी अंगणवाड्यांना आहार पुरविण्याचा ठेका बचतगटांना देण्याची वेळ आली, त्यावेळी अंगणवाडी-सेविकांना खड्यासारखे निवडून बाजूला काढण्यात आल़े बचतगट सोडायचे 
आदेश सरकारने दिल़े.  सध्या जे बचतगट आहार पुरवितात, ते बहुतांशी राजकीय आहेत़ त्यामुळे हे बचतगट पुरवतील तो आहार अंगणवाडीताईंना शिजवून मुलांना खाऊ घालावा लागतो़ तो निकृष्ट आहे, 
कमी मिळतो, अशी कुरकुर 
करायची नाही़ 

(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

sahebraonarasale@gmail.com

Web Title: Anganwadi Tai- A woman from village who takes hard effort for children and women's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.