Anganwadi tai is struggling to deal with malnutrition with help of mother's | कुपोषणाशी दोन हात करण्याची आई ताईची धडपड
कुपोषणाशी दोन हात करण्याची आई ताईची धडपड

मंगल भिसे, 
अनिता अंभोर

स्थळ : करंजाळा, जि. हिंगोली

करंजाळा हे आदिवासीबहुल गाव. गावची लोकसंख्या अकराशेच्या घरात. शेती हाच मुख्य व्यवसाय. त्यातही अल्पभूधारक शेतक-याची संख्या अधिक. अंगणवाडीतील तीन मुलं तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आणि गावावर ‘कुपोषणा’चा बट्टा लागला.

या तिन्ही मुलांना अंगणवाडीतील ग्राम बालविकास केंद्रात ठेवण्यात आलं. स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयातच अंगणवाडी भरते. अंगणवाडीताई मंगल भिसे आणि मदतनीस अनिता अंभोर यांची खरी परीक्षा सुरू झाली. त्यांनी या मुलांना वेळोवेळी सकस आहार देण्यासोबतच त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतली. बालकांचे आई-वडील व त्यांच्या नातेवाइकांचीही मदत घेतली.
पालक त्यांच्या मुलांना बाहेरगावी तर घेऊन जाणार नाहीत, यावरही लक्ष ठेवण्यात आलं. गाव न सोडण्याची विनंती पालकांना केली. त्यानुसार तिन्ही पालकांनी या काळात गाव सोडलं नाही. त्यामुळेच अतितीव्र कुपोषित तीन मुलांची काळजी नीट घेणं सुकर झालं. सकाळी 8 वाजता ही मुलं अंगणवाडीत येत, त्यानंतर दिवसभर एका तासाच्या फरकाने मुलांना मटकी, लापशी, खिचडी, शिरा असा आहार दिला जाई. थोडावेळ घरी गेल्यावर पुन्हा दुपारी 4 ते 6 पयर्ंत ताई या मुलांना अंगणवाडीत घेऊन येत. संध्याकाळी घरी गेल्यावरही मुलांना तुरीचं वरण, भात आणि पोळी तसेच अंगणवाडीतील शिरा मिळेल याकडे ताईंनी लक्ष ठेवलं.

मुलांच्या आया सण-वारासाठी माहेरी जाण्याची घाई करत. मूल अंगणवाडीत न आल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होईल, या चिंतेतून अंगणवाडीताई आणि मदतनीस या दोघी सणवारापेक्षा मुलाची काळजी महत्त्वाची आहे, हे पटवून सांगत असत.   स्वत:ही या कालावधीत या दोघींनी ना कुठला सण केला, ना कुठली रजा घेतली. या बालकांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास अंगणवाडीताई त्यांना तात्काळ औषध देत. शिवाय याबाबत आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना कळविलं जाई. 

अंगणवाडी परिसर स्वच्छ ठेवणं, बालकांची निगा राखणं, वेळोवेळी स्वच्छ हात धुवायला सांगणं, स्वच्छतेबाबत पालकांना माहिती अशा बर्‍याचशा गोष्टींची विशेष काळजी या दोघींनी घेतली.

------------------------------------------------------------

दोन महिन्यांनंतर..
*  केंद्रात दाखल करण्यापूर्वी वेदिका गजानन पुरी या 3 वर्ष 11 महिन्यांच्या मुलीचे वजन 10 किलो 200 ग्रॅम होते, ते आता 12 किलोवर पोहचले आहे.
 * 8 किलो 200 ग्रॅम वजनाचा विजय संजय सोनुळे हा 23 महिन्यांचा मुलगा आता 11 किलो 200 ग्रामचा झाला आहे.
*  20 महिन्यांच्या दुर्गा जगन धनवे हिचे वजन 7 किलो 400ग्रॅमवरून  10 किलोवर गेले आहे.

- दयाशील इंगोले
(वार्ताहर, लोकमत : हिंगोली )


Web Title: Anganwadi tai is struggling to deal with malnutrition with help of mother's
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.