Anganwadi Tai becomes the caretaker mother of children. | अंगणवाडी ताई जेव्हा मुलांच्या काळजीवाहू आई बनतात..
अंगणवाडी ताई जेव्हा मुलांच्या काळजीवाहू आई बनतात..

मनीषा काटेकर, प्रतिभा शिंदे, सुजाता पोगूरवार

स्थळ : जिल्हा यवतमाळ

अंगणवाडीत मुलं असतातच किती वेळ? फक्त दोन-तीन तास. त्यानंतरचा अख्खा दिवस ते ज्या माता-पित्यांच्या सहवासात घालवतात, ते सकस आहाराबाबत पूर्णत: अनभिज्ञ आहेत. मुलांची काळजी प्रत्येकच आईबाबाला असते. पण खेड्यातले हे आईबाबा रोज मजुरीतच गुरफटलेले आहेत. अशावेळी त्यांच्या मुलांच्या ख-या काळजीवाहू आई बनतात अंगणवाडीसेविका. यवतमाळ जिल्ह्यातील अशाच काही अंगणवाडीताईंचे हे  अनुभव..
 

मनीषा काटेकर

राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील अंगणवाडीची जबाबदारी मनीषा काटेकर गेल्या दोन वर्षांपासून पाहातात. गेल्यावर्षी 32, तर यंदा 23 मुलं आहेत. मनीषाताई सांगतात, केंद्र उघडण्याच्या आधीच मुलं हजर होतात. त्यांना प्रसन्न वाटावं म्हणून मी आधीच संपूर्ण केंद्राची स्वच्छता करून घेते. मुलं आल्यावर प्रथम प्रार्थना घेतली जाते. मग प्रत्येकाच्या नखांची तपासणी करते. ज्यांची नखं अस्वच्छ आहेत, वाढलेली आहेत, त्यांची नखं कापून देते. मग सुरू होतो व्यायाम. कंबर, खांदे, पाय हलवून मुलांना व्यायाम दिला जातो. शरीराने आणि मनाने मुलं प्रसन्न झाली की, मनीषाताई गाणी-गोष्टी या माध्यमातून त्यांना हसत-खेळत शिक्षणात गुंतवून ठेवतात. मटकी आणि चवळीचा नास्ता मिळाल्यावर मुलांचे चेहरे खुलतात. नंतर दुपारी दीड वाजता खिचडीचं पोटभर जेवण मिळतं.

काही मुलांची उंची वाढते, मात्र वजन वाढत नाही, असा प्रकार लक्षात आल्यावर मनीषाताईंनी विशेष उपाय सुरू केले. त्यांची तब्येत नियमित तपासून घेणे सुरू केले. नियमित औषधोपचार तर सुरू केलाच; पण सोबतच त्या मुलांच्या घरी वारंवार भेटी देऊन आईवडिलांनाही जागृत केलं. त्याचा परिणाम म्हणजे, पूर्वी 7 किलो 700 ग्राम वजन असलेल्या या मुलांचे वजत वाढून 9 किलो 700 ग्रामपर्यंत आले आहे.
 

सुजाता पोगूरवार

पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरीत तब्बल नऊ अंगणवाडी केंद्रं आहेत. त्यातील पहिल्या क्रमांकाच्या केंद्रात सुजाता सुधाकरराव पोगूरवार काम करतात. त्या म्हणतात, नुसत्या खिचडीवर मुलांचं पोषण होत नाही.  त्यासाठी मी मुलांच्या घरी जाऊन पालकांना विविध प्रकारच्या सकस आहाराची माहिती देते. परिसरात उपलब्ध असलेली फळं मुलांना द्या, गूळ-दाणे द्या असं आग्रहाने सांगते. शिवाय दर महिन्याला प्रत्येक आईवडिलाला त्यांच्या मुलाचं वजन करून घेण्यास केंद्रात बोलावून घेते.

6 महिने ते 3 वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी  घरपोच आहार पुरवला जातो. गर्भवती महिला, स्तनदा मातांसाठीही आहार योजना आहेत. पूर्वी टीएचआर पावडर यायची आता गहू, हळद, दाळ, पीठ असे साहित्य येते. या साहित्याचे आरोग्यदायी उपयुक्त पदार्थ करून मुलांना खाऊ घालण्याविषयी पालकांना घरी जाऊन माहिती दिली जाते.
लसीकरण, आरोग्य तपासणीसाठी दिवस ठरवून घेतले आहेत. 
 

प्रतिभा शिंदे

बाभूळगाव तालुक्यातील आसेगाव देवी या गावातील अंगणवाडीमध्ये प्रतिभा शिंदे यांनी कुपोषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या धडपडीमुळे अंगणवाडीबाबत पालकांमध्येही इतकं सकारात्मक चित्र आहे, की अनेक मुलं गावातील इंग्रजी शाळेत न जाता अंगणवाडीत येतात.
या केंद्रात 57 मुलं आहेत. पारधी समाजाची अधिकांश वस्ती असल्याने आहाराबाबत फारशी जागृती नाही. मात्र कुपोषणाबाबत प्रतिभाताईंचे निरीक्षण फार वेगळे आहे. त्या म्हणतात, 

‘मुलांच्या पोषणाविषयी आपल्यापेक्षा (अंगणवाडीपेक्षा) आईवडिलांनाच खूप काळजी असते. त्यामुळे सध्या अंगणवाडीतून जो आहार मुलांना दिला जातो, त्याहीपेक्षा आहाराबाबत मुलांच्या आईबाबांनीच जागृत होणं आवश्यक आहेत. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीताईने पालकांशी संपर्क वाढविला पाहिजे. त्यांच्याशी अत्यंत आपुलकीचे संबंध निर्माण केले पाहिजेत. तेव्हाच हे गोरगरीब पालक आपण सांगत असलेली माहिती समजून घेतील आणि त्यावर अमलही करतील.

अन्यथा सरकारी प्रयत्न व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, पालकांना आहाराबाबत सांगायला गेल्यास ते अत्यंत आस्थेने ऐकून घेतात. त्यातून माझ्या केंद्रातील मुलांचं वजन 9 किलो 700 ग्रामवरून वाढून आता 10 किलो 200 ग्राम झालं आहे.’

 - अविनाश साबापुरे
(उपसंपादक,  लोकमत : यवतमाळ)

Web Title: Anganwadi Tai becomes the caretaker mother of children.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.