..And people started living in the house! What does this poem from 1869 give us today? | ..आणि लोक घरात राहू लागले! 1869 मधली ही कविता आपल्याला आज काय देते?

..आणि लोक घरात राहू लागले! 1869 मधली ही कविता आपल्याला आज काय देते?

-डॉ. प्रज्ञा कुलकर्णी

किटी ओ मेअरा. अमेरिकेतील मॅडिसन शहरात राहतात. आयरिश अमेरिकन शिक्षिका असलेल्या किटी यांनी धर्मोपदेशक म्हणूनही काम केलं. सध्या कोरोनामुळे इतरांसारख्याच त्याही घरात बंदिस्त आहेत. घरात राहून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनं त्याही भयग्रस्त झाल्या होत्या. बाहेर डॉक्टर, पोलीस, प्रशासन कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी न घाबरता दोन हात करत आहेत. किटीला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती आणि आपण घरात बसण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही याची खंत वाटत होती.  किटीला असं काहीच न करता बसून राहणं त्रासदायक वाटत होतं. त्यांना होणारा हा त्रास बघून त्यांच्या पतीनं त्यांना काहीतरी लिही असं सुचवलं. त्यांनाही ही कल्पना आवडली. या भयंकर परिस्थितीत आशावाद गमावलेल्या प्रत्येकाला काहीतरी आशा मिळेल असं काय लिहायचं या शोधात त्यांना एक कविता सापडली जी आजच्या काळाला अगदीच योग्य असल्याची त्यांना खात्री पटली. ‘अँण्ड पीपल स्टेड होम’ ही ती कविता. ही कविता फक्त घरात राहण्याची अपरिहार्यताच दाखवत नाही तर घरात राहून सहज शक्य असलेल्या शक्यतांचाही उल्लेख करते. कोरोना व्हायरसच्या या कठीण काळात स्वत:ला घराच्या चार भिंतीत बंदिस्त करून घेतलेल्या जगाला ही कविता शक्यतांच्या अनेक खिडक्या दाखवते. 
कॅथलिन ओ मेअरा या मूळ लेखिकेची ही कविता.  1869मध्ये कॅथलिन यांनी ‘इझाज स्टोरी’ या आपल्या कादंबरीत ही कविता लिहिली. रशियापासून  स्वतंत्र होण्यासाठी पोलंड लढत होता. त्या लढय़ाची गोष्ट त्यांनी आपल्या या कादंबरीत सांगितली आहे. तो काळ यातनांचा होता. वेदनांचा होता. पुढे काय होणार या अनिश्चिततेचा होता. एक वेळ अशी आली की आपला जीव वाचवण्यासाठी त्या देशातल्या लोकांनी स्वत:ला घरात बंद करून घेतलं. जगण्याची आशा गमावलेल्या या लोकांना स्वत:ला घरात बंद करून घेतल्यानंतर आनंदानं एकत्र जगण्याची अनेक किरणं दिसू लागली. हे सांगणारी ही कविता. आजच्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीशी जुळणारी आहे.
काय म्हणतेय ही कविता
लोक मग घरीच राहिले.. आपलं रोजचं जगणं थांबवून त्यांनी खूप वाचलं, खूप ऐकलं, आराम केला, व्यायाम केला, कलाकृती निर्माण केल्या.. खेळले, त्यांच्या असण्यामुळे निर्माण होणा:या विविध शक्यता आजमावल्या. (जे रोजच करतात ते नाहीच केलं तर काय करता येईल याच्या शक्यता).
जरा थांबले आणि खूप आतून खोलवरून येणारा आपलाच आवाज ऐकला.. कोणी ध्यान केलं, कोणी प्रार्थना तर कोणी नृत्य ! कुणी आपापल्या सावलीला कडकडून भेटले.. आणि मग लोक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागले..
जगण्याच्या ओघातले सारे ओरखडे भरून निघाले. इकडे तिकडे वावरणा-या अज्ञानी, भयंकर, अर्थशून्य, जाणीव-नेणीव नसणा:या लोकांचा वावर थांबल्याने.. भवतालाच्या जखमाही मग भरून यायला लागल्या..
आणि मग जेव्हा सगळा धोका टळला, नुकत्याच मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी शोक करत लोक जेव्हा परत भेटले, तेव्हा त्यांनी जगण्याच्या नवनवीन शक्यता निवडल्या. नवी स्वप्नं पाहिली. जगायचे नवे नवे मार्ग चोखाळले. पृथ्वीला आणि भवतालाला रोगमुक्त करून नवजीवन दिलं.. त्यांनाही तेच तर मिळालं होतं ! जे रोजच करता येतं ते नाहीच केलं तर काय करता येईल याच्या शक्यता आपण कधी आजमावतच नाही. शक्यता ही मोठी गंमतशीर गोष्ट आहे.. ती असूनही कधी तिचा विचारच आपण करत नाही.
शक्यता निर्माण करणं आपणच करत असतो आणि त्या कधी कधी झापडे लावून मर्यादित ही आपणच करतो. संपूर्ण जग हादरून टाकणा-या या कोरोना साथीच्या रोगाची लाट आज आपल्याला जरा थांबून विचार करायला लावते आहे.  माणूस म्हणून आपल्या क्षमतांचा विचार करायला लावतेय. शक्यतांचा विचार करायला लावतेय. हे वादळ शमल्यावरच्या नव्या जगात पाऊल ठेवताना आपल्या हाती या मंथनातून लाभलेलं शहाणपणाच अमृतही असेल आणि  संहाराच्या रौद्ररूपाचं पाहिलेलं वास्तव आणि गमावलेल्या सहृदयांच्या मृत्यूचं कडवट हलाहलही.शक्यता माणसाच्या मनाची उलथापालथ घडवून आणणारी, माणसाला कार्यप्रवण करणारी, प्रसंगी गोंधळात लोटणारीही ! काहीतरी वेगळं होण्याची शक्यता वाटते म्हणून माणसं अस्वस्थ होतात. कधी ते घडावं म्हणून धडपडतात तर कधी ते घडू नये म्हणून वेडेपिसे होतात. धावता धावता इतर शक्यतांचा विचार थांबवतात.  आज या कोरोनामुळे झापडं काढले आहेत तर करूयात ना विचार या नव्या शक्यतांचा.

(लेखिका भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक आहेत)

pradnya_kulkarni@hotmail.com

 

 

Web Title: ..And people started living in the house! What does this poem from 1869 give us today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.