Ahmednagar's YouTube star grandmother | अहमदनगरची यु ट्यूब स्टार आजी

अहमदनगरची यु ट्यूब स्टार आजी

 -साहेबराव नरसाळे

सारं आयुष्य खेड्यात गेलेलं. शाळेची पायरीही चढलेली नाही. क म्हणून वाचता येत नाही. वयाची पासष्ठी ओलांडलेली आणि महिन्याकाठी कमाई बख्खळ ! तेही आठवड्यातून फक्त एक ते दीड तास काम. विश्वास बसत नाही ना?- तर भेटा या यु ट्यूब स्टार ‘आपली आजीला.’

- अहमदनगर तालुक्यातील सारोळा कासार हे या आजीचं गाव. अहमदनगरपासून १५ किलोमीटर अंतरावर. सुमन गोरक्षनाथ धामणे असं या आजीचं नाव. आजीचे पती गोरक्षनाथ धामणे हे पोलीस सेवेत होते. ते निवृत्त झालेले आहेत. त्यांचे वय ७० च्या आसपास असावे. सुमन धामणे या सारं आयुष्य गृहिणी म्हणून जगलेल्या. पण आता या आजी वयाची पासष्ठी ओलांडल्यानंतर कमावत्या झाल्या आहेत. तेही थोडेथोडके नव्हे तर तब्बल लाखांत. एव्हढेच नव्हे तर आजीचे लाखो चाहते आहेत. आजीसोबत सेल्फी घ्यायला, आजीला भेटायलाही अनेकजण लांबून लांबून येतात.

नेमकं काय करते ही आजीबाई, कशी करते लाखांत कमाई, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला मीही थेट सारोळा कासार गाठलं. आजी स्वयंपाकघरात होत्या. आजीचा नातू यश पाठक मला आजीचं स्वयंपाकघर दाखवत होता.

‘‘येथे कॅमेरा लावतो. येथून प्रकाशयोजना करतो. येथे आजी उभी राहते आणि रेसीपी बनवते. मी कॅमेरातून आजीच्या रेसीपीचा व्हिडिओ बनवितो आणि यु ट्यूबवर टाकतो. झालं’’- तास, दीड तासाचं हे कामं आजीला लाखो रुपये मिळवून देतं.

आम्ही गप्पा मारत मारत पुढच्या खोलीत येऊन बसलो. आजीही आल्या. मग आजी सांगू लागल्या,

‘‘मी जव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली तव्हा यकदम घाबरले. कॅमेराची लाईट चमकली की घापकन डोळे झाकायचे. तोंडातून शब्दही फुटत नसं. काय बोलायचं ते सारं इसरुन जायची. एकदम कोरी पाटी व्हायची!"

- या कोऱ्या पाटीला बोलतं केलं ते यश पाठक याने. यश पाठक हा सुमन धामणे आजीचा नातू. मुलीचा मुलगा. त्यानेच आजीला सारं शिकवलं. कॅमेऱ्यासमोर बोलायचं कसं, कोणतीही रेसीपी क्रमाक्रमाने लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगायची कशी, हे सांगताना ती रेसीपी लोकांना कॅमेऱ्यासमोर करुन कशी दाखवायची - असं सारं काही यशने आजीला शिकवलं.

यश हा इंग्रजी माध्यमातून अकरावीत शिकतोय. इंग्रजीवर त्यांची भली कमांड. तंत्रज्ञानाची आवड. या आवडीतूनच यशने त्याचं स्वत:चं यु ट्यूब चॅनल सुरू केलं, तेव्हा तो सातवीत होता. तो स्वत:च्या यु ट्यूब चॅनलवरुन टेक्निकल माहिती लोकांना सांगायचा. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याला ते सारं निरस वाटू लागलं. त्यानं व्हिडिओ अपलोड करायचं थांबवलं आणि अभ्यासात लक्ष दिलं.

आजीने बनवलेला स्वयंपाक त्याला फार आवडायचा. आजीला तो नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवायला लावायचा. एकदा त्याने आजीला पावभाजी बनवायला सांगितली. आजीने यापूर्वी कधीच पावभाजी बनवलेली नव्हती. त्याने आजीला यु ट्यूबवर पावभाजी कशी बनवितात, याचा व्हिडिओ दाखविला. ते पाहून आजीने पहिल्यांदा पावभाजी बनविली. ही पावभाजी एवढी चविष्ट झाली की यशला आजीची रेसीपी यु ट्यूबवर टाकण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने आजीला ही कल्पना सांगितली. पण आजी तयार नव्हती. आजीला हे सारं नवखं होतं. यु ट्यूब म्हणजे काय, त्यानं काय होतं, असे आजीचे प्रश्न. यशने आजीला सारं समजावून सांगितलं. आजीचा भाजी बनवतानाचा पहिला व्हिडिओ काढायचा ठरला. आजीने भाजीचं सर्व साहित्य घेतलं. यशने कॅमेरा सुरू केला. पण आजीचे डोळे झाकू लागले. आजी एकदम घाबरुन गेली. कॅमेऱ्यासमोर बोलताना आजीला शब्दही फुटेनात. कसाबसा पहिला व्हिडिओ तयार केला. त्यात आजींना पूर्णपणे दाखविलं नाही. फक्त भाजी करतानाचे आजीचे हात दिसत. हा व्हिडिओ यु ट्यूबवर अपलोड केला, तेव्हा या चॅनलचं नाव होतं, कल्पना रेसिपी.

कल्पना रेसिपी या यु ट्यूब चॅनलवर आजीच्या सुमारे ४० रेसिपी अपलोड झाल्या होत्या. लोकांच्या प्रतिक्रियांनी आजी आणि यशचा उत्साह वाढला. त्याने यु ट्यूबवरच या चॅनलला नाव काय असावं, असा प्रश्न केला. त्यावर अनेक कमेंट आल्या. त्यातलीच एक होती ‘आपली आजी.’ ठरलं. हेच नाव यु ट्यूब चॅनलसाठी यशने रजिस्टर केलं.

आतापर्यंत आजीही कॅमेऱ्यासमोर सराईतपणे बोलायला शिकली होती. पूर्वीसारखे ‘रिटेक पे रिटेक’ होत नव्हते. यशने नवीन कॅमेराही घेतला होता. व्हिडिओ शूटिंगचं इतर साहित्यही घेतलं. एडिटींगही चांगल्या पद्धतीने करायला लागला होता. यु ट्यूबकडून त्याला टूल किट मिळालं होतं.

यश सांगतो, ‘आपली आजी’ असं यु ट्यूब चॅनलचे नाव घेतल्यानंतर पहिला व्हिडिओ अपलोड केला त्याला आता वर्ष झालं. पहिला व्हिडिओ होता कारल्याची भाजी. हा व्हिडिओ तब्बल ६.३ मिलीयन लोकांना पाहिला. पहिलाच व्हिडिओ हीट ठरला. त्यानंतर त्यांनी सुमारे १७५ वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ तयार करुन यु ट्यूबवर अपलोड केले. ते लाखो लोकांनी पाहिले. आता लोकंच यु ट्यूबवर कमेंट करुन आजीला सांगतात की, ‘आजी आम्हाला ही रेसिपी करुन दाखव, ती रेसिपी सांग.’

लोकांच्या प्रतिक्रियांनुसार आजी रेसिपी करायला घेते. यश कॅमेरा सुरू करतो. आजी किचनजवळ उभी राहते आणि म्हणते- ‘नमस्कार बाळांनो.. चला आज आपण रेसिपीला सुरुवात करु या.. चवीनुसार हे घ्यायचं, ते घ्यायचं’ असं सांगत आजी रेसिपी बनवते. यश हे शूट करतो आणि नंतर काॅम्प्युुटरवर एडिटींग करुन यु ट्यूबवर अपलोड करतो.

आजी सांगत होती - ‘सुप्यातील पवार घराणं हे माझं माहेर. मला चार भाऊ. ते सर्व मोठे. त्यांची लग्न झाल्यानंतर भावजया स्वयंपाक बनवायच्या. मी ते पहायची. शिकायची. स्वयंपाकाची आवड लागली. सासरी आल्यानंतर सासू पार्वती यादेखील सुगरण. त्यांच्या हाताला मोठी चव होती. त्यांच्याकडून अधिक चांगल्या पद्धतीने स्वयंपाक करायला शिकले. तेव्हा चुलीवरच स्वयंपाक करायचे. गॅस आता घेतला. पाट्यावर वाटण वाटायचं. सारं काही गावरान असायचं. गावरान वाणांना चवपण अधिक असते. म्हणून मी देखील आता सर्व मसाले गावरान वाणांचे करते आणि लोकांनापण गावरानच खायला सांगते. आजपण जी रेसिपी मी लोकांना बनून दाखवते, त्यात गावरान वाणांचेच मसाले वापरतो, म्हणून चव अधिक येते.’

लोकांनाही आजीची रेसिपी आवडते. म्हणूनच ‘आपली आजी’ची यु ट्यूबवरची प्रेक्षक संख्या तब्बल ७ कोटी ६६ लाखावर पोहोचली आहे. यु ट्यूबनेही आजीला सिल्वर बटन देऊन गौरव केला आहे. एव्हढेच नव्हे तर आजीला यु ट्यूबकडून कमाईदेखील होते, अर्थात त्यासाठी मागच्या अनेक वर्षांची मेहनत आहे.

‘‘मेहनतीनं आणि निगुतीनं केलेलं चवदारच असणार. मग ते तुमचं आयुष्य असो की चुलीवरचं कारलं. त्यातला कडवटपणा आपोआप उडून जातो आणि मग उरतो तो फक्त गोडवा. बाळांनो, पैशाकडे पाहू नका आधी हा गोडवा कमवायला शिका. पैसा आपोआप खिशात येईल’’- असं ही आजी सांगते.

(लेखक अहमदनगरच्या लोकमत आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Web Title: Ahmednagar's YouTube star grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.