Actress Tejaswini Pandit took the form of a goddess to express on social issues | सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होण्यासाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी घेतले देवीचे रूप
सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होण्यासाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी घेतले देवीचे रूप

 

आम्ही कलाकार अभिनय करतो. आमच्यातली कला त्याद्वारे व्यक्त करतो. पण आमचं व्यक्त होणं हे इतकं आणि केवळ त्या भूमिकेपुरतंच मर्यादित असतं का?

त्याच्यापलीकडे आम्ही काही बोललो तर?

हल्ली कलाकार काही बोलले रे बोलले की लगेच त्यांना ट्रोल केलं जातं. पण आम्हाला  समाज माध्यमांवर ट्रोल केलं जातं म्हणून आम्ही काही बोलायचंच नाही का? स्वत:ला व्यक्तच करायचं नाही का?
माझ्या मनात या प्रश्नांचं वादळ असच घोंघावत होतं. मला माझं मत नोंदवायचं होतं. 
मी नवरात्रीचं निमित्त शोधलं.
नवरात्रीत अनेकजण अनेक पद्धतीनं व्यक्त होत असतात. मलाही व्यक्त व्हायचं होतं. पण यातून नाही. माझ्याच कलेतून. अभिनयातून.

मी तेव्हा ब्लॅक अँण्ड व्हाइट फोटोतून समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर माझं मत नोंदवलं होतं. एकीकडे पोर्नस्टारला सेलिब्रिटी म्हणून आपण सहज स्वीकारतो. पण बलात्कार पीडितेचा मात्र सर्वसामान्य व्यक्ती म्हणून स्वीकार होत नाही. मुलगी नको म्हणून पोटातच तिची हत्या आणि नवरात्रीत कुमारिका पूजनासाठी मात्र शेजारच्या मुलींना बोलावून पूजा करतो. हे असं का, असे प्रश्न मी माझ्या ब्लॅक अँण्ड व्हाइट फोटोंच्या माध्यमातून विचारले होते.

तेव्हा उत्तरं काही मिळाली नाहीत. मात्र मला मोठय़ा प्रमाणात ट्रोल केलं गेलं. पण याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. मला कोणी लाइक करावं, वा वा . छान छान म्हणावं असं वाटतंच नव्हतं. आपण नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो. पण ती फक्त रूपाची नसते, ती असते तिच्यातल्या गुणांची पूजा. मात्र तिच्या मूर्तीची पूजा करताना तिच्यातल्या गुणांकडे मात्र पाहिलंच जात नाही. म्हणून 2018 मध्ये मी नऊ देवींचे रूप घेऊन त्या प्रत्येक देवीतल्या गुणांना अधोरेखित केलं.

यावर्षी मी समाजातल्या, जगातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर वेगवेगळ्या देवींचं रूप घेऊन भाष्य केलं.  मला देवीच्या माध्यमातून समाजातल्या आणि जगातल्या काही महत्त्वांच्या मुद्दय़ांकडे,  एक माणूस म्हणून आपण करत असलेल्या चुकांकडे लक्ष वेधायचं होतं. यावर्षी  कोल्हापूरमध्ये महापूर आला. त्यात मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. विकास, कारखाने आणि इमारतींसाठी झालेल्या नैसर्गिक हानीमुळे आलेल्या या महापुरावर भाष्य करण्यासाठी मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप घेतलं.

आपल्या देशात अगदी दुधाचे दातही न पडलेल्या मुली या वासनेच्या बळी ठरतात. यावरचा राग मी कामाख्या देवीच्या रूपातून व्यक्त केला. नदीची मानवानं केलेली हानी, त्यामुळे बाधित आणि व्यथित झालेल्या नद्यांचं आत्मकथन मी जरीमरी आईचं रूप घेऊन कथन केलं. पैशासाठी समाजाची बदलेली मानसिकता, पैशांप्रतिचं हावरेपण आणि त्याचा माणसातल्या माणूसपणावर होणारा परिणाम मी महालक्ष्मीच्या रूपातून सांगितला.
पाचव्या दिवशी आपल्या देशात होणा-या वाघमृत्यूवरची चिंता मी शेरावाली मातेच्या रूपातून व्यक्त केली. सोलापूर, तुळजापूरसारख्या शहरांचा दुष्काळमुळे रखरखाट झाला. या रखरखाटीला जबाबदार कोण हा प्रश्न तुळजापूरच्या भवानी रूपातून विचारला. मुंबईत मेट्रो कार शेडसाठी आरेच्या जंगलातील वृक्षतोडीवरचा निषेध मी गाव देवीचं रूप घेऊन नोंदवला. मुंब्रा देवीचं रूप घेऊन मी मुंबईच्या ट्रॅफिकवर बोलले आणि नवव्या दिवशी पृथ्वी माता बनून पृथ्वी विनाशाकडे हळूहळू मार्गक्रमण करत असल्याचं, अँमेझॉन जंगलातला वणवा ही त्याची चाहुल असल्याचं मला या पृथ्वी मातेच्या रूपातून सांगायचं होतं.

मी खूप काही मोठं केलं असं मुळीच नाही. मला समाजाचं प्रबोधन करायचं नव्हतं. मला फक्त व्यक्त व्हायचं होतं. मी मनातली खदखद माझ्या कलेतून व्यक्त करायचं ठरवलं. हीच माझी व्यक्त होण्याची पद्धत आहे. आपल्या आजूबाजूच्या संवेदनशील गोष्टी कलाकाराच्याही मनाला भिडतात. आणि जे भिडतं ते आपण आपल्या पद्धतीनं व्यक्त करतो. मीही तेवढंच केलं !

(मुलाखत आणि शब्दांकन : माधुरी पेठकर)
madhuripethkar29@gmail.com

Web Title: Actress Tejaswini Pandit took the form of a goddess to express on social issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.