1000 days in prison |  तुरुंगातले १००० दिवस

 तुरुंगातले १००० दिवस

- कलीम अजीम

सौदी अरेबियातील लुजैन अल हथलौल. वय वर्षे ३१. एक हजार दिवसांच्या कैदेतून तिची नुकतीच सुटका झाली. तिच्यासाठी तुरुंगवास ही नवीन गोष्ट नाही. २०१४ पासून आंदोलन आणि तुरुंगवास हेच तिचं आयुष्य आहे.

लुजैन अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात शिकली. तिथे असताना मनसोक्त ड्रायव्हिंग करणारी लुजैन सौदीमध्ये महिलांना गाडी चालवायला बंदी का, या प्रश्नाशी भिडलेली होती. २०१३ मध्ये सौदीतील ‘विमेन टू ड्राइव्ह’ हे आंदोलन चर्चेत यायला लागलं. त्यावर्षी पहिल्यांदा लुजैनही चर्चेत आली. तिच्या वडिलांनी विमानतळ ते घर असा तिचा गाडी चालवण्याचा एक व्हिडीओ चित्रित केला होता. वुमेन टू ड्राइव्ह या आंदोलनाचाच तो भाग होता, पण पोलिसांनी त्वरित यावर कारवाई करून तिला तुरुंगात टाकलं. २०१९ मध्ये संयुक्त अरब अमिरातीतून सौदी अरेबियापर्यंत लुजैनने गाडी चालवत आणल्याचं सौदी राजाला कळलं. तिचं तिथूनच अपहरण करुन तिला कैदेत टाकण्यात आलं. सुरुवातीला तीन दिवसांसाठी तिला ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. परत रियाध येथील तिच्या घरातून तिला पकडण्यात आलं. डोळ्यांवर पट्टी बांधून , गाडीच्या डिक्कीत कोंबून तिला अज्ञातस्थळी नेण्यात आलं. या जागेला लुजैननं ‘वेदनांचा महाल’म्हटलं आहे. या ठिकाणी तिचा अतोनात छळ करण्यात आला. दर रविवारी लुजैनला तिच्या कुटुंबाला फोन करण्याची परवानगी देण्यात आली होती. तिचे कुटुंबीय फोनवर तिचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेले असत. फोनवर आवाज ऐकला की लुजैन अजून तरी जिवंत असल्याची त्यांची खात्री पटायची, पण तुरुंगात असताना एवढे अत्याचार सहन करत असतानाही तिला तुरुंगाबाहेरील आपल्या देशातल्या महिलांच्या स्थितीचीच काळजी होती.

२०१० मध्य पूर्वेकडील देशात ‘जॅस्मिन क्रांती’ झाली. इजिप्त, लिबिया, ट्युनिशिया इत्यादी देशांमध्ये हुकूमशाही सरकारांना जनतेनं खुर्चीवरून खाली खेचलं. वर्षानुवर्षांपासून सत्तेला चिटकून असलेल्या हुकूमशहांना रस्त्यावर आणलं. या चळवळीचं लोण हळूहळू संपूर्ण अरब राष्ट्रात पोहोचलं. त्यातून सौदी अरेबियात महिलांनी अधिकारांची मागणी करत चळवळी सुरू केल्या. महिलांना ड्रायिव्हंगची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यात प्रामुख्याने होती.

यापूर्वी सौदीत महिला गाडी चालवत होत्या, पण १९९० साली महिलांच्या गाडी चालविण्यावर निर्बंध लादले गेले. त्या काळात शाही परिवाराविरोधात उघड बंड करणं अशक्य होतं, कारण बंडखोरांना थेट तुरुंगात टाकण्यात येई, तरीही परिणामांची पर्वा न करता तब्बल ४७ महिलांनी शाही परिवाराच्या निर्णयाचा बहिष्कार करत रियाधच्या रस्त्यावर गाड्या चालवल्या.

या आंदोलनाची दखल घेत सरकारने एक कमिटी स्थापन केली. या समितीने महिलांना गाडी चालविण्याचे अधिकार कदापि देऊ नये, असा निर्वाळा दिला. सरकारी धोरणांच्या विरोधात ऑक्टोबर २०१३ ला पुन्हा महिलांनी आंदोलन तीव्र केलं. तब्बल ११ हजार महिलांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. पुरुषांनीही ‘वीमेन टू ड्राइव मूवमेण्ट’ला समर्थन दिलं. या आंदोलनात लुजैनची भूमिका, तिची परखड मतं यांनी मोठा प्रभाव पाडला. सौदी राजघराण्याला अस्वस्थ करणाऱ्या लुजैनला जगभरातून लोकप्रियता मिळाली आणि तिच्या भूमिकेला पाठिंबाही. २०१५ साली अरब देशातील ‘मोस्ट पॉवरफुल वीमेन"या यादीत तिला तिसरं मानांकन होतं. २०१८ मध्ये सौदी पोलिसांनी तिला पुन्हा अटक केली. तिच्यावर दहशतवादाचे गंभीर आरोप ठेवून तुरुंगात डांबलं.

२०१७ मध्ये सलमान बीन अब्दुल अजीज गादीवर आले. त्यांनी क्रांतिकारक निर्णय घेत सर्वात आधी महिलांना गाडी चालविण्याची मुभा दिली. २०१३ साली सुरू झालेल्या ‘वुमेन टू ड्राइव्ह’ या आंदोलनाला पाच वर्षांनी म्हणजे २०१८ साली यश मिळालं. सौदी सरकारने महिलांच्या गाडी चालविण्यावरचे निर्बंध उठविले. या निर्णयामुळे सौदी महिला आता कार, ट्रेलर व ट्रक चालवू शकतात. हा क्रांतिकारक निर्णय होता, पण लुजैन हे प्रत्यक्षात बघू शकली नाही. कारण ती होती तुरुंगात. तिनं आणि इतर महिला आंदोलनकर्त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला यश मिळालं, पण त्यांची जागा मात्र तुरुंगातच होती. हा मोठाच विरोधाभास!

गेल्या वर्षी २८ डिसेंबरला सौदीच्या रियाध कोर्टानं लुजैनला पाच वर्षे आठ महिन्यांची शिक्षा सुनावली. दहशतवादी कृत्य, राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहोचवणे, त्यासाठी इंटरनेटचा गैरवापर करणे, सौदी अरेबियातील व्यवस्था बिघडवण्यासाठी परदेशी अजेंडा चालवण्याप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं.

अनेक देशांतून लुजैनच्या अटकेचा निषेध झाला. अँमनेस्टी इंटरनेशनल, ह्यूमन राइट वॉच अशा मानवी अधिकार संघटनासह जगभरातील मानवी हक्क संघटना व कार्यकर्त्यांनी लुजैनच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मध्यस्थी केल्यानंतर सौदी सरकारने लुजैनच्या सुटकेचा निर्णय घेतला, असं सांगितलं जात आहे. जगभरातील वाढत्या दबावाचा परिणाम म्हणून अखेर १० फेब्रुवारीला लुजैनची सुटका करण्यात आली. अर्थात, काही अटीही आहेत. पाच वर्षे ती परदेशवारी करू शकत नाही, शिवाय तिच्या घरातून बाहेर पडण्यावरही निर्बंध आहेत.

लुजैनला आनंद आहे तो आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याचा. ती लहान असताना तिच्या आईनं एकदा महिलेचा फोटो कव्हरवर असलेलं नियतकालिक पाहिलं होतं. ते आंतरराष्ट्रीय नियतकालिक होतं. आणि फोटो एका प्रसिद्ध बिझनेस वुमनचा. तिच्या आईला त्या फोटोचं मोठं अप्रूप वाटलं होतं. आईनं लुजैन आणि तिच्या बहिणींना जवळ बोलावलं. हातातल्या नियतकालिकावरचा फोटो दाखवला आणि "या महिलेप्रमाणे तुम्हीही कधीतरी या कव्हरवर दिसा" अशी इच्छा व्यक्त केली. हे यश मिळविण्यासाठी आपला मार्ग आखताना घाबरू नका, पुढे व्हा आणि कृती करा असा मंत्रही दिला. हा मंत्र लुजैननं प्रत्यक्षात खरा करून दाखवला. लुजैनच्या सुटकेची बातमी जगभरातल्या वर्तमानपत्रात फोटोसह पहिल्या पानावर झाली.

( लेखक मुक्त पत्रकार आहेत)

kalimazim2@gmail.com

Web Title: 1000 days in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.