ऐनवेळी अजितदादांच्या विमानाचा पायलट का बदलला? सीएम देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:59 IST2026-03-25T18:44:02+5:302026-03-25T18:59:10+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी निवेदन दिले.

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात होऊन दोन महिने होत आले. पण, विमान अपघाताचा तपास अजूनही सुरूच आहे. आमदार रोहित पवार यांनी अनेक वेळा यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विधिमंडळातही यावर चर्चा होण्या संदर्भात अनेकांनी मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधिमंडळात निवेदन दिले. विमान अपघातावर उपस्थित प्रश्नावर त्यांनी उत्तर दिली.

विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले होते. यावरही आज फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. विधानसभेत आज अंतीम आठवडा फडणवीस यांनी उत्तर दिले.

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतून विमानाने बारामतीला निघाले होते. हा अपघात २८ जानेवारी रोजी झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. यानंतर हा अपघात नसून घातपात असू शकतो असा दावा करण्यात आला.

"बारामती विमानतळावर विमान लँड होण्यापूर्वीच दुर्घटना झाली आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. पायलटची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आल्याचे तपासात समोर आले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटची नेमणूक २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी केली होती. यावेळी तात्पुरत्या स्वरुपात विमानाचे क्रू डिटेल्समध्ये साहिल मदान आणि यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्टला करण्यात आला होता. अशा प्रकारे स्लॉट निश्चित करण्याची पद्धत असते.. त्यानंतर पायलट आणि को पायलटची नेमणूक करण्यात येते असे VSR कंपनीकडून सांगण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सीएम फडणवीस म्हणाले, व्हीएसआर कंपनीच्या ऑपरशेन टीमने शेड्युल दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंह को पायलट म्हणून १० वाजून ४२ मिनिटांनी नेमले, पण पायलट ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांनी सकाळच्या फ्लाईटऐवजी संध्याकाळी लातूरला जाणाऱ्या प्लाईटवर ड्युटी द्यावी अशी विनंती केली.

त्यानंतर लगेच व्हीएसआरच्या टीमने त्यांच्याऐवजी सुमीत कपूर आणि को पायलट शांभवी पाठक यांची नेमणूक केली. त्यानंतर कंपनीने हे शिफ्ट रोस्टर व्हॉट्सअॅप ग्रुपवर रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी पाठवले. त्यामुळे ऐनवेळी नेमणूक करण्यात आली असे नाही, असेही फडणवीस म्हणाले.