PHOTOS: झूक झूक झूक.. अगीनगाडी, नॅशनल पार्कात धावे ‘वनराणी’!; नवा लूक पाहिला का? तिकीट किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:52 IST2026-03-17T07:37:04+5:302026-03-17T07:52:04+5:30

National Park Mumbai Van Rani Train News: ‘वनराणी’ मिनी टॉय ट्रेनमुळे मुंबईतील नॅशनल पार्कचे वैभव पुन्हा एकदा परत आले आहे.

National Park Mumbai Van Rani Train News: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क मुंबईकरांचे खास आवडते ठिकाण. हजारो मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी दररोज नॅशनल पार्कसाठी जात असतात. पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी येथे आवर्जून येत असतात. पावसाळ्यात तर नॅशनल पार्कमध्ये फेरफटका मारणे ही मोठी पर्वणीच असते.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहानमोठ्या सर्वांना सर्वांना मोहित करणारी ‘वनराणी’ ही टॉय ट्रेन काही वर्षांपूर्वी कार्यान्वित होती. परंतु, २०२१ मध्ये ती बंद झाली होती. परंतु, आता हीच मुंबईची आवडती वनराणी म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॉय ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या वनराणी ट्रेनचे उद्घाटन केले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर मान्यवर उपस्थित होते. (छाया- दत्ता खेडेकर)

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाल्यानंतर २०२१ मध्ये बंद करण्यात आलेली ‘वनराणी’ टॉय ट्रेन पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धावण्यास सुरुवात झाली आहे. ‘जंगलाची राणी’ म्हणून तिची ओळख आहे. या ट्रेनमुळे पर्यटकांना सर्वात मोठ्या हिरवळीच्या पट्ट्यातील अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

नवीन वनराणी मिनी टॉय ट्रेन बॅटरीवर चालणारी आणि पर्यावरणपूरक आहे. पाहुण्यांना राष्ट्रीय उद्यानात अविस्मरणीय प्रवास अनुभवता येईल. ट्रेनमध्ये हेरिटेज आणि व्हिस्टा डोम डबे असून प्रवाशांना निसर्गरम्य दृश्ये अनुभवता येतील.

‘वनराणी’ टॉय ट्रेनमध्ये आधुनिक डबे, सुधारित सुरक्षा व्यवस्था आणि उन्नत स्थानके आहेत. ट्रेनमध्ये हेरिटेज आणि व्हिस्टा डोम डबे असून ते प्रवाशांना निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव देतात. येथे पर्यटकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी ई-बग्गी, ई-बस, सायकलिंग उपक्रम, थीमॅटिक गार्डन्स आणि सुधारित सफारी पायाभूत सुविधा यांसारखे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.

‘वनराणी’ या मिनी ट्रेनमुळे संजय गांधी नॅशनल पार्कचे वैभव पुन्हा एकदा परत आले आहे. ‘व्हिस्टाडोम‘ मिनी ट्रेन आणि वन राणी विंटेज ट्रेन अशा दोन ट्रेन या ठिकाणी धावणार असून, त्या बॅटरी वर चालणाऱ्या असल्यामुळे पर्यावरणपूरक आहेत. (छाया- दत्ता खेडेकर)

निसर्गरम्य वातावरण, हिरवाईने नटलेला परिसर आणि वन्यजीवांची समृद्ध जैवविविधता अनुभवण्याची अनोखी संधी या मिनी ट्रेनच्या माध्यमातून पर्यटकांना मिळणार आहे. पर्यावरण संवर्धन, निसर्ग पर्यटनाला चालना आणि उद्यानातील समृद्ध वनसंपदेची ओळख करून देण्याच्या दृष्टीने ‘वनराणी’ मिनी ट्रेन पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण ठरणार आहे. (छाया- दत्ता खेडेकर)

‘वनराणी’ टॉय ट्रेन २.७ किमी धावते; कृष्णगिरी येथून सुरू होऊन, त्रिमूर्ती स्थानकावर थांबून ती पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परत येते. या प्रवासाला साधारणपणे १५ ते २५ मिनिटे लागतात. या प्रवासादरम्यान जैवविविधतेने नटलेली ठिकाणे, एक छोटे प्राणीसंग्रहालय आणि कृत्रिम बोगदे पाहायला मिळतात. (छाया- दत्ता खेडेकर)

ही 'टॉय ट्रेन' साधारणपणे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत धावते; यामध्ये दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत बंद असू शकते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्यातील विविध उपक्रम (टॉय ट्रेनसह) सोमवारी बंद असतात. (छाया- दत्ता खेडेकर)

‘वनराणी’ या मिनी ट्रेनचे तिकीट मोठ्यांसाठी ८५ ते १०० रुपये तर मुलांसाठी (५ वर्षांवरील) ४५ ते ५० रुपये इतके शुल्क असू शकते, असे म्हटले जात आहे. याची तिकिटे नॅशनल पार्क आवारातील स्वतंत्र तिकीट खिडक्यांवर उपलब्ध होऊ शकतात.

गेल्या वर्षी वनराणीचे काम सुरू झाले होते. पूर्वी डिझेलवर चालणारी गाडी आता विजेवर धावणार आहे. त्यात चार डबे असतील. मार्गावरील स्थानकांचे, तसेच कृत्रिम बोगद्याचेही नूतणीकरण करण्यात आले आहे. तसेच रुळही नवीन बसविण्यात आले आहेत.

नवीन व्हिस्टाडोम ‘वन राणी’ ही बॅटरीवर चालणारी आहे व चार डबे आहेत. या डब्यांवर SGNP मधील प्राणी आणि निसर्गचित्रे रंगवलेली आहेत. पारदर्शक छत व मोठ्या काचांच्या खिडक्यांमुळे संपूर्ण परिसराचा विहंगम अनुभव घेता येईल. या डब्यांची आसनरचना मेट्रोसारखी असून प्रवास अधिक आरामदायक ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रीय उद्यानात १९७४ मध्ये वनराणी सुरू झाली. वनराणीच्या माध्यमातून उद्यानास दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये महसूल मिळत होता. आकर्षक, छोटेखानी इंजिन आणि त्यात जोडलेले चार खुले डबे अशी रचना असलेली वनराणी उद्यानाच्या झाडीतून धावताना जंगलाचे सौंदर्य न्याहाळता येत होते.

एका वेळी गाडीच्या प्रत्येक डब्यात १६ प्रमाणे ६४ प्रवाशांना सैर करता येत होती. ही फेरी साधारण ३० मिनिटांची होती. आता नव्याने वि‍जेवर धावणारी वनराणी सज्ज होत आहे.