Uddhav Thackeray: सप्टेंबर 1994 चा तो दिवस, एका तरुणाने उद्धव ठाकरेंपुढे व्यक्त केली इच्छा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:15 PM2021-07-27T20:15:57+5:302021-07-27T20:29:04+5:30

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना आज दिग्गज राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा येत आहेत. बॉलिवूडपासून पंतप्रधान आणि गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीपर्यंत अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र राज्यातील कोरोनाची आणि पुराची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील अनेक नेते मंडळींनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विशेष म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.

ठाणे दौऱ्यावर एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाबाबत राज ठाकरेंना आठवण करुन दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, देशाच नेतृत्व करावं, असं म्हटलं आहे. त्यावर फडणवीस यांनी चिमटा घेतला आहे.

'उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, असं वाटत असेल तर चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, राष्ट्रीय नेता व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

तसेच, मुख्यमंत्र्यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आणि खास विश्वासू माणूस असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनीही जुन्या आठवणी जागवल्या आहेत.

सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस... एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, "शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?"

उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला. तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत.

त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली. आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा, असे ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंना आज दिग्गज राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा येत आहेत. बॉलिवूडपासून पंतप्रधान आणि गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीपर्यंत अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत.