मुंबईकरांनो, शिस्त कधी पाळणार? ४४ लाख वाहनधारकांकडून ३६९ कोटींचा दंड वसून करणे बाकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:53 IST2025-03-26T15:30:07+5:302025-03-26T15:53:37+5:30
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी प्रशासनाकडून कठोरातील कठोर प्रयत्न करण्यात येत असतात. मात्र मुंबईत वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लघन केलं जातय. महत्त्वाची बाब म्हणजे नियम मोडणाऱ्यांकडून कोट्यवधींची दंडाची रक्कमही भरली गेली नसल्याचे समोर आलं आहे.

मुंबईत वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहन चालकांना दंडही आकारला जातो. मात्र नियम मोडणाऱ्या लाखो वाहन चालकांनी कोट्यवधींचा दंड भरला नसल्याचे समोर आलं आहे.
गेल्या १३ महिन्यांत (१ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५) मुंबईत वाहतूक पोलिसांनी विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५,१२,८४६ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यावरून मुंबईतील वाहन चालकांमध्ये शिस्तीचा किती अभाव आहे याचा अंदाज लावता येतो.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गोळा केलेल्या माहितीनुसार, या वाहनधारकांना एकूण ५२६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यापैकी केवळ १५७ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर ३६९ कोटी रुपये अद्याप थकीत आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ६५,१२,८४६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी केवळ २०,९९,३९६ उल्लंघन करणाऱ्यांनी दंड भरला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ४४,१३,४५० वाहनधारकांनी अद्याप दंड भरलेला नाही. त्यामुळे थकित दंडाची रक्कम ३६९ कोटी झाली आहे.
ब्लिंकिंग आणि एम्बर लाइट्सच्या बेकायदेशीर वापर करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूण ४७ चालकांना २३,५०० दंड ठोठावला. मात्र त्यापैकी केवळ सात जणांनीच दंडाची रक्कम भरली आहे.
मरीन ड्राईव्ह परिसरात सर्वाधिक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात ३२ वाहनांना दंड ठोठावण्यात आला आहे, मात्र केवळ दोन वाहनचालकांनीच दंड भरला आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी समाधानकारक काम केले आहे, पण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ते अधिक प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. दंड वसूल करण्यासाठी विशेष वसुली मोहीम आवश्यक आहे, असा सल्ला आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलाय.