Shivleela Patil : 'मी पाकिस्तानात गेले तरी, मुखात विठुरायाचंच नाव अन् छत्रपतींचेच विचार असणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 07:01 PM2021-10-12T19:01:02+5:302021-10-12T19:38:14+5:30

Shivleela Patil : माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच शुद्ध हेतू होता. मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी उद्देश प्रामाणिक होता,’ असे त्या म्हणाल्या.

‘बिग बॉस मराठी3’मध्ये (Bigg Boss Marathi 3) एन्ट्री घेतलेल्या एका स्पर्धकाने जाताक्षणीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते नाव म्हणजे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील (Shivlila Patil).

बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्या चर्चेत होत्या. कारण त्यांचं बिग बॉस सारख्या शोमध्ये जाणं अनेकांना रूचलं नव्हतं. यावरून शिवलीला ट्रोलही झाल्या होत्या.

आजारी असल्याचं कारण देत त्या शोमधून काहीच दिवसांत बाहेर पडल्या. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता त्यांनी तमाम लोकांची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सर्वांची जाहीर माफी मागितली. ‘माझ्या ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये जाण्याच्या निर्णयाने वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते.

माझा मार्ग चुकला असेलही. पण हेतू शुद्ध होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही,’ असं त्या म्हणाल्या.

‘माझ्या बिग बॉसमध्ये जाण्याच्या निर्णयाने माझा वारकरी संप्रदाय आणि माझे ज्येष्ठ माझ्यावर नाराज आहेत. मी दोन्ही हात जोडून आणि नतमस्तक होत माफी मागते.

माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच शुद्ध हेतू होता. मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी उद्देश प्रामाणिक होता,’ असे त्या म्हणाल्या.

मी माझी मर्यादा पाळून माझी भूमिका मांडली, मी इंदुरीकर महाराजांच्याच बाजूने होते आणि असणार, असे मी तृप्ती देसाईंना सांगितले. मी माझ्या संप्रदायाच्याच बाजुने असल्याचे पाटील यांनी म्हटलं.

मी पाकिस्तानात जरी गेले तरी, माझ्या मुखात विठुरायाचंच नाव अन् छत्रपतींचेच विचार असणार, असेही शिवलीला पाटील यांनी म्हटलं आहे.

वारकरी संप्रदाय फार मोठ्या मनाचा आहे, मी जी काही थोडीफार आहे, ती संप्रदायाच्याच जीवावर आहे. म्हणून, मी दोन हात आणि एक मस्तक जोडून संप्रदायाची माफी मागते, असे पाटील यांनी म्हटलं आहे.