Sachin Vaze: ...तर हा होता सचिन वाझेंचा मास्टर प्लॅन; अखेर NIAच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 05:36 PM2021-04-03T17:36:34+5:302021-04-03T17:44:44+5:30

Sachin Vaze: मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मिठी नदीतून मिळालेला सीसीटीव्ही डेटा आणि वाझेंच्या पासपोर्टची चौकशी करायची असल्याने वाझेंची कोठडी वाढवून देण्याची मागणी एनआयएने विशेष कोर्टात केली होती. त्यामुळे कोर्टाने वाझेंच्या कोठडीत वाढ केली आहे.

सचिन वाझे यांची कोठडी आज संपल्याने त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी वाझेंचे वकील आणि एनआयएच्या वकिलांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने एनआयएच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आणि प्रकरणाचं गांभीर्य पाहून वाझेंच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी (Mukesh Ambani Bomb Scare) भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता, या संपूर्ण प्रकरणानं राज्याच्या वातावरण ढवळून निघालं आहे, मुख्यत: या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते, कट रचणाऱ्यांसोबत सचिन वाझे मोबाईलवरून संपर्कात होते. हे षडयंत्र कोणी रचलं आणि हत्येमागे काय हेतू होता इथपर्यंत NIA चा तपास पोहचला आहे असं त्यांनी सांगितलं. NIA कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. याचदरम्यान पुन्हा एक महत्वाची माहिती एनाआयएच्या हाती लागली आहे.

स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण दाबण्यासाठी सचिन वाझे फेक एन्काऊंटर करण्याच्या तयारीत होते, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे.

कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी ठेवण्यात आली होती. सचिन वाझे या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीची केस रफा दफा करण्यासाठी २ जणांचा एन्काऊंटर करुन सर्व आरोप त्या दोन जणांवर टाकून या प्रकरणाला दहशतवादी रंग देणार होता, असा खुलासा तपासात झाला आहे.

या करता एक इको कार चोरण्यात आली होती आणि त्या गाडीतूनच सचिन वाझे हे 4 मार्चला रात्री 7 च्या सुमारास भायखळा येथून ठाण्याला गेला होता. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांना फोन करुन घोडबंदर रोडवर बोलावले होते तिथून त्याने एकूण ८ जणांना मनसुख यांचा ताबा ठाण्यातील माजीवडा सर्कल येथे दिला.

वाझे पुन्हा मुंबईला गेले तेथे जिप्सीबार वर सचिन वाझे यांनी रेड केली आणि पंचनामा करण्याचा अधिकार नसताना ही सचिन वाझेनी रेडमध्ये काहीच सापडले नाही, असा पंचनामा केला. हे याकरता की, मनसुख यांच्या हत्येच्या वेळेस सचिन वाझे मुंबईतच होता हे वाझेला दाखवायचे होते, अशी माहिती एनआयएला मिळाली आहे.

तत्पूर्वी, मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या इमारतीजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओसह आतापर्यंत ७ वाहने जप्त केल्यानंतर एनआयए आता आणखी एका लक्झरी वाहनाच्या मागावर आहे. जिलेटीनच्या कांड्यांबरोबर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उद्देशून लिहिलेली धमकीची चिठ्ठी स्कॉर्पिओ गाडीत ठेवणे राहून गेल्याने मुख्य आरोपी सचिन वाझे २५ फेब्रुवारीला पहाटे पुन्हा घटनास्थळी आले, अशी माहिती मिळाली असून त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला कारमायकल मार्गावर बेवारस स्कॉर्पिओ आढळली. त्यात सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या सुट्या कांड्या आणि ‘मुंबई इंडियन्स’चा शिक्का असलेल्या बॅगमध्ये खोवलेली चिठ्ठी आढळली होती. एटीएस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणांनी संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम जुळवणारे, आरोपींचा सहभाग स्पष्ट करणारे सीसीटीव्ही चित्रण गोळा केले आहे. या चित्रणावरून स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाड्या मध्यरात्री कारमायकल मार्गावर थांबल्या.

स्कॉर्पिओ गाडी तेथेच सोडून चालक इनोव्हा गाडीत बसून निघून गेला. काही तासांनी संशयित आरोपी पुन्हा तेथे आले. स्कॉर्पिओ गाडी न्याहाळली आणि माघारी फिरले, असे या चित्रणावरून आढळले आहे. या वाहनांचा मुंबई, ठाण्यातील प्रवास स्पष्ट करणारे चित्रणही यंत्रणांनी मिळवले आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीएस(Maharashtra ATS) करत होती, परंतु त्यानंतर हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला. NIA मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्हीचा तपास करत आहे, NIA ने कोर्टात हे दोन्ही प्रकरण एकमेकांनी जोडले आहेत असं सांगितलं आहे.