Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:52 IST

1 / 12
Dadar Ratnagiri Passenger Train News: गेल्या काही दिवसांपासून कोकणात जाणाऱ्या दादर रत्नागिरी पॅसेंजरबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. प्रवाशांच्या पसंतीची आणि मोठी मागणी असलेली रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकात थांबवण्यात येत असल्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
2 / 12
कोकणात जाणाऱ्यासाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५-२० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देणार नाही, असा थेट मनसेने दिला. पूर्वी दादर ते रत्नागिरी अशी पॅसेंजर ट्रेन दिव्यावरून सोडण्यात येत असल्याने मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत आहे.
3 / 12
दादर रत्नागिरी ही गाडी कोरोनानंतर जेव्हा चालू झाली तेव्हा २०२१ मध्ये दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट केली गेली होती. याचे मुख्य कारण दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्यावेळेस देवस्थानकामध्ये क्रॉसिंग करते त्यावेळेस साधारणपणे सात ते आठ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते त्यातून लोकलच्या वक्तशीरपणावरती दुष्परिणाम होत होता.
4 / 12
यानंतर लोकल ट्रेनच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. दिव्यावरून रत्नागिरीला जाणाऱ्या ट्रेनचा वक्तशीरपणा सुधारला आहे. मध्य रेल्वे होऊन कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण २१ गाड्या प्रतिदिवशी चालवल्या जातात. पैकी ६ गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून, ८ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस वरून, एक गाडी दादर स्थानकावरून, ४ गाड्या या कल्याणवरून व २ गाड्या या दिवा स्थानकावरून चालवल्या जातात.
5 / 12
याशिवाय २५ गाड्या या वसई रोड वरून पनवेल मार्गे कोंकण रेल्वेसाठी चालवल्या जातात. अशा एकूण ४६ गाड्या प्रत्येक दिवशी प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी उपलब्ध आहेत. या सर्व गाड्यांच्या शिवाय वेळोवेळी आवश्यकतेनुसार विशेष गाड्या कोकण रेल्वेसाठी चालविल्या जातात.
6 / 12
असे असले तरी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दादर रत्नागिरी पॅसेंजर ही ट्रेन खूपच सोयीस्कर होती. यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्य रेल्वेकडे दाद मागितली जात आहे. मुंबईतील खासदार रविंद्र वायकर यांनीही दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, याबाबत विचारणा केली होती.
7 / 12
कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन सध्या दिवा स्थानकातूनच सुरू राहणार आहे; सध्या दादरकडे परत शिफ्ट होणार नाही, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी सांगितले की, कुर्ला-सीएएसएमटी दरम्यान पाचवी व सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा दादरकडे शिफ्ट करण्याचा विचार केला जाऊ शकतो. तसेच, ही निर्णय प्रक्रिया पूर्णपणे रेल्वे बोर्डच्या अधिकारात येते आणि बोर्डच अंतिम निर्णय घेईल.
8 / 12
सध्या ही ट्रेन दिवा स्थानकातूनच धावणार असल्याने सुट्टयांच्या हंगामात प्रवाशांना परवडणारी सेवा मिळावी म्हणून त्यांना दिवा स्टेशन गाठावे लागणार आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशांना या बदलाची पूर्वसूचना दिली आहे.
9 / 12
रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन दिवा स्टेशनच्या उपनगरी मार्गावरून मुख्य मार्गावर जाताना चार रूळांचे क्रॉसिंग करावे लागत होते. परिणामी साधारणतः सात ते आठ लोकल थांबवाव्या लागत होत्या. लोकलच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होत असल्याने ही ट्रेन दिवा स्थानकावरून चालवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान दादर - गोरखपूर ट्रेन इगतपुरी मार्गे जात असल्याने दिव्यावरून या मार्गे जाणाऱ्या ट्रेनचा इतर कोणत्याही ट्रेनवर परिणाम होत नाही.
10 / 12
मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांच्या म्हणण्यानुसार, सध्या ४० पेक्षा जास्त ट्रेन सुरू असून आणखी गाड्या चालू केल्या तरी त्या सामावून घेण्याची क्षमता कोकण रेल्वेकडे उरलेली नाही.
11 / 12
दादर – रत्नागिरी रेल्वेगाडीमुळे सहा ते सात लोकल थांबवाव्या लागतात. लोकलचा वक्तशीरपणा कमी होतो. त्यामुळे कुर्ला – परळ दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी सोडण्याचा विचार केला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
12 / 12
सध्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे भूसंपादनाचे काम सुरू असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवाशांना या रेल्वेगाडीची सेवा मिळेल, असे मत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. परंतु, प्रकल्प कधी पूर्ण होईल, त्यानंतर रेल्वेगाडी कधी सुरू होईल, याबाबत कोणतीही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली नाही.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेkonkanकोकणrailwayरेल्वेpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सRatnagiriरत्नागिरी