Mumbai Rain Updates : धुव्वाधार पावसाने मुंबईची 'हालत खराब'; फोटो सांगतील 'रेन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 02:41 PM2019-09-04T14:41:12+5:302019-09-04T15:50:36+5:30

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे

पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाचा फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच विक्रोळी-कांजुरमार्गदरम्यान पाणी साचल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ठाणे ते कसारा, कर्जत वाहतूक सुरू आहे. हार्बर मार्गावरील वाशी त सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.

नालासोपारा स्टेशनवर रुळावर पाणी साचलं आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर बसला आहे. सायन पनवेल महामार्गावरील सानपाडा नेरुळ येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याहून एनडीआरएफच्या 2 टीम पनवेल आणि रायगडसाठी खबरदारी म्हणून रवाना झाल्या आहेत.

गणेश मंडळाच्या वीज मंडपात वीज प्रवाहित होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व गणेश मंडाळांनी वीज प्रवाह खंडीत करावा असं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलं आहे.

नवी मुंबईतील कोकण भवनला मिनी मंत्रालय म्हटले जाते. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण भवन इमारतीच्या आवारात सुमारे तीन फूट पाणी साचल आहे.

अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. शहरात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनारी तसेच साचलेल्या पाण्यातून चालू नये असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळख असलेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांपासून मुंबई, ठाणे, नवी आणि रायगडमध्ये मान्सूनने तुफान फटकेबाजी केली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस झाला असून, पुढील 24 तासांतही कोकण आणि गोव्यातील काही भागांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. 24 तासांत रत्नागिरी, मुंबई, डहाणू, हर्णे, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.