भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:05 IST2026-04-07T16:59:12+5:302026-04-07T17:05:53+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज ज्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. ती पॉड टॅक्सी नेमकी असणार तरी कशी? जाणून घ्या सविस्तर माहिती...

मुंबईतील कुर्ला आणि वांद्रे रेल्वे स्थानकांना जोडणारा पॉड टॅक्सीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प MMRDA प्रशासनाने हाती घेतला आहे. हा भारतातील पहिला पॉड टॅक्सी प्रकल्प ठरणार आहे.

कॉर्पोरेट हब असलेल्या बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलासाठी हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. बीकेसीमधील कर्मचाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पॉड टॅक्सी अतिशय उपयुक्त ठरू शकते.

पॉड टॅक्सी ही AI तंत्रज्ञानावर आधारित ड्रायव्हर लेस प्रकल्प असणार आहे. ज्या एका पॉडमध्ये सहा जण बसू शकतील अशी व्यवस्था असणार आहे. या मार्गावर प्रत्येक २०० मीटर अंतरावर वातानुकूलित स्थानकं असतील. ताशी ४० किमी वेगाने ही टॅक्सी धावणार आहे.

बीकेसीमध्ये कामासाठी येणाऱ्या लाखो लोकांना या सेवेचा फायदा होईल. यात एकूण २२ स्थानकं असणार आहेत. तर मार्गाची एकूण लांबी ८.८५ किमी इतकी असणार आहे.

पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्या ३.३ किमीचा समावेश आहे. ज्यात ८ स्थानकं असतील. कुर्ला, एलबीएस मार्ग, बीडीबी गेट ११, एमएमआरडीए पे अँड पार्क, वांद्रे टर्मिनल, कलानगर, ऑडिट भवन आणि एमएमआरडीए कार्यालय ही स्थानकं असतील.

पॉड टॅक्सी मार्गावर छोटे, वीजेवर चालणारे आणि Ai प्रणालीवर आधारित चालकरहित पॉड्स धावतील. कमी अंतर कापण्यासाठी रिक्षा-टॅक्सीवर अवलंबून राहावं लागणार नाही.

अत्यंत कमी अंतरावर स्थानकं उभारली जाणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी फार चालावे लागणार नाही. २०२२ मधील अंदाजानुसार प्रत्येक किलोमीटरवर २१ रुपये भाडं असण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी १,०१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पॉड प्रणालीचं काम प्रामुख्याने दुभाजकाच्या ठिकाणी केलं जाणार आहे. ज्यामुळे पदपथावर (फूटपाथ) कमीत कमी परिणाम होईल. पदपथ मोकळे राहतील.

पॉड टॅक्सीची मार्गिका व्यावसायिक भागात असल्याने दिवसा बांधकाम न करता रात्रीच्या वेळी काम केलं जाईल. जेणेकरुन बीकेसीमध्ये येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही.

दुबई आणि हिथ्रो सारख्या शहरांमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प याआधीच यशस्वीरित्या कार्यरत आहे. वेगवान, अखंड आणि पर्यावरणपूरक अशी पॉड टॅक्सीची ओळख आहे. मुंबईतील पॉड टॅक्सीचा पहिला टप्पा २०२७ च्या अखेरपर्यंत सुरू होईल.

















