मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:21 IST
1 / 10 महाराष्ट्राची राजधानी आणि देशातीस सर्वात मोठी महानगरपालिका असेलल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं असून, एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर कब्जा करण्यासाठी राज्यातील प्रमुख सत्ताधारी भाजपा, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर सत्ता असलेली उद्धवसेना, काँग्रेसह इतर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 2 / 10 मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसे यांनी एकत्र येत मुंबईतील मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणला आहे. तर भाजपाकडून मराठी मतांसह उत्तर भारतीय, गुजराती आणि इतर परप्रांतिय मतदारांनी आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुंबईमध्ये मराठी आणि परप्रांतिय मतदारांसह मुस्लिम मतदारही निर्णायक स्थितीत आहेत. तसेच अनेक प्रभागांमध्ये मुस्लिम मतांमुळेच जय पराजयाचं गणित ठरतं अशी परिस्थिती आहे. 3 / 10मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे २० टक्क्यांच्या आसपास असून, त्यामुळे मुंबईतील राजकारणामध्ये मुस्लिमांचा मोठ्या प्रमाणावर दबदबा दिसून येतो. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्याशिवाय विजय मिळणं कठीण आहे. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतांवर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आहे. 4 / 10मुंबई महानगरपालिकेमधील २२७ जागांपैकी सुमारे ४५ जागांवर मुस्लिम मतदार उमेदवारांचा जय-पराजय निश्चित करतात. त्यापैकी ३० ठिकाणी मुस्लिम मतदार हे निर्णायक स्थितीत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मुस्लिम मतांशिवाय जिंकणं कुठल्याही उमेदवारासाठी अशक्य आहे. 5 / 10याआधीची आकडेवारी पाहिल्यास २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३१ मुस्लिम नगरसेवक विविध पक्षांकडून निवडून आले होते. त्यापैकी ११ नगरसेवक हे काँग्रेसकडून, ६ समाजवादी पार्टीकडून, ४ राष्ट्रवादीकडून, ३ एमआयएमकडून, २ शिवसेनेकडून आणि ५ उमेदवार हे अपक्ष निवडून आले होते. यावरून मुंबई मनपा निवडणुकीत मुस्लिम मतदार किती महत्त्वाचे आहेत हे दिसून येतं. 6 / 10मुंबईतील मुस्लिम मतदारांचं वैशिष्ट्य म्हणजे यापैकी सुमारे ७० टक्के मतदार हे उत्तर भारतीय आहेत. तर मराठी, दक्षिण भारतीय, गुजराती आणि इतर राज्यांतील मिळून ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत. यापैकी मराठी मुस्लिम मतदारांचं मतदान हे परंपरागतरीत्या काही प्रमाणत शिवसेनेला मिळत आलेलं आहे. तर उर्वरित बिगरमराठी मुस्लिम मतांच काँग्रेस आणि समाजवादी पक्षांमध्येच विभाजन होत आलेलं आहे. 7 / 10मुंबईतील मुस्लिम मतदारांची ही निर्णायक स्थिती विचारात घेऊन मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांसह आता उद्धवसेनेचीही नजर एकगठ्ठा मिळणाऱ्या मुस्लिम मतांवर आहे. 8 / 10त्यात आतापर्यंतच्या इतिहासात मुंबईतील मुस्लिम मतदारांकडून नेहमीच काँग्रेसला साथ मिळत आलेली आहे. त्यामुळे यावेळी स्वबळावर लढत असलेल्या काँग्रेसकडून मुस्लिम मतदारांना आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुस्लिम जनाधार आपल्या हातून निसटू नये यासाठी काँग्रेसने उद्धवसेना आणि मनसे यांच्या आघाडीमध्ये जाणे टाळले आहे. 9 / 10दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे सोपवलं आहे. तसेच त्यामाध्यमातून काँग्रेसच्या मुस्लिम व्होटबँकेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुरू आहे. 10 / 10 २०२४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांनी भक्कम साथ दिली होती. त्यामुळे उद्धवसेनेला मुस्लिम वस्त्यांमधून चांगलं मतदान मिळून अनेक जागा निवडूनही आल्या होत्या. त्यामुळे आपल्याशी नव्याने जोडलेल्या गेलेल्या या मतदारांना सोबत ठेवण्यासाठी उद्धवसेनाही प्रयत्नशील असेल.