मुंबईवर दुहेरी संकट; वैज्ञानिकांच्या रिपोर्टमुळे BMC अधिकाऱ्यांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:28 PM2022-06-13T17:28:27+5:302022-06-13T17:30:54+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराबद्दल आलेल्या नवीन रिपोर्टमुळे चिंता वाढली आहे. मुंबई शहर दरवर्षी २ मिमी वेगाने बुडत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामागे भूगर्भीय घटना कारणीभूत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

ज्याला लँड सब्सिडेंस म्हणजेच जमीनीचा भाग कमी होणे असं म्हणतात. यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचंही वैज्ञानिकांनी सांगितले आहे.

मार्चमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात ९९ देशांमधील जमीन कमी होण्याबाबत आढावा घेण्यात आला आहे. अभ्यासानुसार, चीनमधील टियांजिन शहर सर्वात वेगाने बुडत आहे. त्याची बुडण्याची गती वार्षिक ५.२ सेमी आहे.

जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, जगातील ९९ देशांमधील २०१६ ते २०२० या कालावधीतील उपग्रह डेटाचा InSAR पद्धतीने अभ्यास करून हा निकाल प्रकाशित करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांचा इशारा - अमेरिकेतील रॉड आयलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, मुंबईतील समुद्र सपाटीपासून १० मीटर उंचीवर असलेल्या सुमारे ४६ चौरस किमी क्षेत्रापैकी १९ चौरस किमी क्षेत्रफळ असे आहे जे वार्षिक ८.४५ मिमी वेगाने बुडत आहे.

मुंबईचा बुडण्याचा वेग जगातील इतर शहरांच्या तुलनेत कमी असू शकतो, मात्र समुद्राची पातळी वाढल्याने आणि कालांतराने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे हा वेग वाढेल, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

अरबी समुद्रात पाण्याच्या पातळीत वाढ - अरबी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत दरवर्षी ०.५ ते ३ मिमी वाढ होत असल्याचे अलीकडील अभ्यासातून दिसून आले आहे. याचा अर्थ मुंबईतील काही भाग समुद्राची पातळी वाढण्यामुळे वेगाने बुडत आहेत.

समोर आलेल्या वैज्ञानिकांच्या रिपोर्टमुळे मुंबई शहराचे नगररचनाकार आणि पालिकेतील धोरणकर्त्यांना दुहेरी धोका निर्माण झाला आहे. कारण मुंबईत आजही अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणीस्त्रोत संपवण्याचं काम सुरू आहे.

मुंबई का बुडतेय? - मुंबई सतत बुडण्याचे कारण म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग खालच्या दिशेने जात आहे. भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा, खाणकाम, नैसर्गिक पाणथळ जमीनी, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि पर्यावरणीय नुकसान यामुळे हे घडते.

या क्षणी याचा वेग कमी करण्याबाबत यावर कोणताही उपाय नाही. वैज्ञानिकांनी बीएमसी अधिकार्‍यांना वैज्ञानिक आणि सामाजिक आर्थिक समस्या म्हणून जमीन कमी होण्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. जमीन बुडण्याची शक्यता असलेल्या भागात पुराचे वाईट परिणाम होऊ शकतात याबाबत वैज्ञानिकांनी सावध केले आहे.