मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:12 IST2025-08-07T15:04:33+5:302025-08-07T15:12:53+5:30

Big Update on Mumbai Goa Vande Bharat Express Train: मुंबई-गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ही वंदे भारत ट्रेन २० कोचची करावी, अशी मागणी सातत्याने केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

आताच्या घडीला भारतीय रेल्वेची सर्वांत लोकप्रिय ट्रेन म्हणजे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस. देशातील अनेक मार्गांवर या ट्रेनची सेवा सुरू आहे. प्रवाशांचा या ट्रेनला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद पाहून काही मार्गांवरील ‘वंदे भारत’ ट्रेनच्या डब्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे.

पावसाळ्यात कोकणासह गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि गणपती उत्सवात गावी जाण्यासाठी वंदे भारत ट्रेनला प्रवासी अधिक पसंती देतात. आरामदायी, सुखद आणि जलद प्रवासाचा आनंद वंदे भारत ट्रेनमुळे प्रवाशांना मिळतो.

मुंबईहून नांदेड, सोलापूर या दोन्ही 'वंदे भारत' २० कोचच्या करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याची म्हटले जात आहे. दुसरीकडे, मुंबई-मडगाव 'वंदे भारत'चे आरक्षण १०० टक्क्यांहून अधिक असल्याने प्रवासी, संघटना आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी या गाडीचे डबे वाढवण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे लावून धरली होती.

वाढीव कोचच्या मडगाव 'वंदे भारत' मधून प्रवास करण्यासाठी कोकणवासीयांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेकडे २० कोचच्या 'वंदे भारत'च्या देखभालीची सुविधा नाही.

नवी सुविधा कार्यान्वित होण्यासाठी किमान एक वर्ष लागणार आहे. यामुळे आगामी गणेशोत्सवात वाढीव डब्यांच्या मडगाव 'वंदे भारत' मधून कोकणात जाण्याचे प्रवाशांचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.

२० कोचच्या 'वंदे भारत' ट्रेनची देखभाल करण्यासाठी वाडीबंदर येथे 'वंदे भारत' डेपो उभारण्यात येत आहे. हे काम पूर्ण होण्यास किमान एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे.

सद्यस्थितीत २० डब्यांच्या 'वंदे भारत'च्या देखभालीची कोणतीही सुविधा मध्य आणि कोकण रेल्वेकडे नाही. यामुळे वाडीबंदरचे काम पूर्ण झाल्यावरच वाढीव डब्यांसह मडगाव 'वंदे भारत' चालवण्याचा मार्ग खुला होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

मुंबई-कोकण रेल्वे अंतर वेगाने पार करणाऱ्या अगदी मोजक्या मेल-एक्सप्रेस आहेत. 'वंदे भारत'चा प्रवास आरामदायी आणि सुखद आहे.

या मार्गावर धावणाऱ्या मडगाव जनशताब्दी आणि मडगाव तेजस या रेल्वेगाड्यांना १६ डबे आहेत. केवळ मुंबई-मडगाव वंदे भारतला ८ डबे आहेत. डबे कमी असल्याने अल्पावधीतच या गाडीचे आरक्षण पूर्ण होते. यामुळे अन्य गाड्यांच्या तुलनेत 'वंदे भारत'ला प्रवाशांची मागणी अधिक आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच सीएसएमटी (CSMT Mumbai) स्थानकाहून गोव्यातील मडगाव (Madgaon Goa) स्थानकापर्यंत ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नियमितपणे चालवली जाते. परंतु, आता कोकण रेल्वे मार्गावरील मान्सून वेळापत्रकामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी असतात.

कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू आहे. आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता मान्सून वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावते.