By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 20:43 IST
1 / 10राज्यात २९ महापालिका निवडणुकांचा निकाल लागला. त्यात मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये भाजपाने वर्चस्व सिद्ध केले. या संपूर्ण रणधुमाळीत सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागून होते. या निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असले तरी शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपाला महापौर करणे अवघड जाणार आहे. 2 / 10मुंबई महापालिकेच्या निकालात भाजपाला ८९ तर शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या. त्याशिवाय उद्धवसेनेला ६५, मनसे ६ आणि काँग्रेस २४ जागा मिळाल्या आहेत. या महापालिकेत एमआयएमचे ८ नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे २ नगरसेवकही निवडून आले आहेत. मुंबईत महायुतीचा महापौर होणार हे निश्चित असले तरी पडद्यामागे आणखी काही हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. 3 / 10मुंबई महापालिकेतील निवडून आलेल्या २९ नगरसेवकांना आज एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमध्ये बोलावले. याठिकाणी शिंदे या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेतच पण त्याशिवाय या नगरसेवकांना पुढचे काही दिवस मुक्काम हॉटेलमध्येच करावा लागणार आहे. शिंदेंच्या या खेळीने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत. आता महापौरपदी कोण विराजमान होणार अशी चर्चा आहे.4 / 10निवडणुकीपूर्वी भाजपा शिंदेसेनेच्या नेत्यांनी महायुतीचा महापौर होईल असं म्हटलं पण कुणीही महापौर आमच्याच पक्षाचा होईल असं विधान केले नाही. मात्र निकालानंतर काही भाजपा नेत्यांनी मुंबईत भाजपाचा महापौर होईल अशी विधाने केले. मात्र गेली २५ वर्ष महापालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. मुंबईत महापौर शिवसेनेचाच असावा असं बाळासाहेब ठाकरे कायम म्हणायचे. आता शिंदेसेनेची भूमिका काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.5 / 10मुंबईचा महापौर शिवसेनेचा असावा असा सूर शिंदेसेनेत उमटू लागला आहे. नवीन नगरसेवकांनीही हीच मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जनशताब्दी वर्ष आहे त्यामुळे महापौर शिवसेनेचा व्हावा अशी त्यांची मागणी आहे. त्यातूनच अडीच अडीच वर्षाचा महापौर पदाचा फॉर्म्युला चर्चेत आला आहे.6 / 10आता भाजपा शिंदेसेनेचा महापौर खरेच बनवणार का असा प्रश्न पडला आहे. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, फोडून आणलेली माणसे टिकवण्याचं टेन्शन फोडणाऱ्याला जास्त असते. त्यामुळे मला टेन्शन नाही. एकदा फुटलेले लोक कधीही फुटू शकतात. सगळेच सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. शिंदेसेना फोडून भाजपा त्यांचा महापौर बनवणार असा दावा त्यांनी केला.7 / 10शिंदेसेनेचा महापौर कसा बनणार? - मुंबई महापालिकेच्या निकालात भाजपा ८९ तर शिंदेसेना २९ जागांवर विजयी झाली. या दोघांची एकत्रित बेरीज केली तर ही संख्या ११८ वर जाते. याठिकाणी सत्तास्थापनेसाठी ११४ हा बहुमताचा आकडा हवा. महापालिका निवडणुकीत नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी भाजपा आणि शिंदेसेना स्वतंत्र लढली होती. मात्र मुंबईत ठाकरे बंधू यांचा पराभव करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. मात्र बहुमतासाठी भाजपा शिंदेसेनेची गरज भासणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.8 / 10उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून, शिंदेसेनेला सोबत घेत भाजपाने निवडणूक लढवली परंतु प्रत्यक्ष निकालात भाजपाला हवे तेवढे यश मिळाले नाही. भाजपाला गेल्या वेळपेक्षा अवघ्या ७ जागा जास्त मिळाल्या. दुसरीकडे ५४ माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले असतानाही उद्धव ठाकरे यांनी ६५ नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यात यावेळी काँग्रेसही ठाकरेंसोबत नव्हती. त्यामुळे अद्यापही बहुतांश मतदार ठाकरेंसोबत आहेत याची जाणीव भाजपाला झाली. त्यात शिंदेशिवाय मुंबईवर महापौर बसवणेही भाजपासाठी कठीण झालंय आहे. 9 / 10त्यात अजित पवार महायुतीत आल्यापासून एकनाथ शिंदे यांना मर्यादित ठेवण्याचं काम भाजपाने केले आहे. महापालिकेत सोयीनुसार भाजपाने शिंदे आणि अजित पवारांना दूर केले. शिंदे नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र लढले. तिथे त्यांनी भाजपावर टीका केली नाही. पण पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार भाजपावर जोरदार बरसलेत. त्यामुळे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंच बरे असं भाजपाला कळलं. त्यामुळे शिंदेंना सोबत ठेवणे भाजपाची गरज बनली आहे.10 / 10विधानसभा निवडणुकीत भाजपाने १३२ जागांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिंदे नाराज झाले होते परंतु भाजपाने बहुमतासाठी लागणारा आकडा सहज गाठता येऊ शकतो त्यामुळे भाजपाने मुख्यमंत्रिपदावर माघार घेतली नाही. त्यावेळी मुख्यमंत्रिपद भाजपाला सोडावे लागले ही सल शिंदेंच्या मनात कायम आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांच्या माध्यमातून शिंदेंना डिवचण्याचं काम भाजपाने केले. मात्र मुंबई महापालिकेच्या निमित्ताने भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी एकनाथ शिंदेंना मिळाली आहे. त्यामुळे शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्समागे काय आहे याच्या विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.