Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक, अधिकारी लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 02:16 PM2023-05-01T14:16:18+5:302023-05-01T14:31:17+5:30

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराची पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराची पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यासमयी विधानसभा अध्यक्ष आणि या भागाचे आमदार राहुल नार्वेकर, राज्याचे पर्यटन, पर्यावरण तसेच मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल तसेच मुंबई मनपाचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मरीन ड्राईव्ह येथे दररोज हजारो मुंबईकर फेरफटका मारायला येतात, पण या तुलनेत याठिकाणी फक्त एकच स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाची साफसफाई आणि नीटनेटकेपणाची पाहणी केली.

तसेच या स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देशित केले. तसेच मरीन ड्राईव्ह जेट्टीकडील भाग हा सुंदर आणि सुशोभित करण्याबाबतही पालिका अधिकाऱ्यांना सुचित केले.

कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामाचा देखील याप्रसंगी आढावा घेतला. या मार्गाचे काम वर्षाखेरीस पूर्ण होणार असून त्यानंतर तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती यावेळी बोलताना दिली.

मुंबई हे सुंदर आणि सुशोभित करून ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळखले जावे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

मुंबईचा मरीन ड्राईव्ह परसर म्हणजे पर्यटकांचं आकर्षक ठिकाण असून गेट वे ऑफ इंडियाजवळील हा परिसर मॉर्निंग वॉकसाठीही प्रसिद्ध आहे.

त्यामुळेच, येथील परिसर कायम स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त करत अधिकाऱ्यांना निर्देशित केले