कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 15:57 IST2025-08-23T15:45:23+5:302025-08-23T15:57:20+5:30
Mumbai Goa Vande Bharat Train 16 Coach: मागील काही कालावधीपासून मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे कोच वाढवण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. अखेरीस कोकणवासीयांची ही इच्छा पूर्ण होत आहे.

Mumbai Goa Vande Bharat Train 16 Coach: भाद्रपद महिना सुरू झाला असून, अवघ्या काही दिवसांनी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. अनेक चाकरमानी कोकणवासीय आपापल्या गावी पोहोचले आहेत. तर अजून हजारो जण गावी जाण्याच्या तयारीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वेने गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे.
गेल्या अनेक कालावधीपासून मुंबई ते मडगाव गोवा ‘वंदे भारत’ आठ डब्याची चालवण्यात येत होती. या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने, ऐन गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात येणार आहे.
आताच्या घडीला भारतीय रेल्वेची सर्वांत लोकप्रिय ट्रेन म्हणजे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस. देशातील अनेक मार्गांवर या ट्रेनची सेवा सुरू आहे. प्रवाशांचा या ट्रेनला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून काही मार्गांवरील ‘वंदे भारत’ ट्रेनच्या डब्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे.
यातच आता मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे डबे वाढवण्याचा निर्णयही रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. गणेशोत्सवात कोकणवासीयांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने ३८० हून जास्त विशेष गाड्या सोडल्याचे सांगितले जात आहे.
असे असले तरी अद्यापही अनेक गणेशभक्तांना रेल्वेचे आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे कोकणवासीयांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला ८ अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
जून २०२३ मध्ये कोकण रेल्वेवरील आणि गोवा राज्यातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरून धावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आरामदायी, वेगवान प्रवासाची अनुभूती मिळण्यास सुरुवात झाल्याने वंदे भारतला अधिक पसंती मिळू लागली.
या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त होऊन प्रतीक्षा यादी सुरू होते. प्रवाशांची मागणी अधिक असल्याने, या एक्सप्रेसला १६ किंवा २० कोच जोडण्याची मागणी केली जात होती. विशेषतः आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या हंगामात बहुतांश प्रवाशांना वंदे भारतचा प्रवास करता येत नव्हता, परंतु अनेक पायाभूत बाबींमुळे कोचची संख्या वाढवण्यावर मर्यादा येत होत्या.
गाडी क्रमांक २२२२९/२२२३० मुंबई - मडगाव गोवा वंदे भारत एक्स्प्रेसने सुरुवातीपासून सुमारे ९५ टक्के प्रवासी क्षमता राखली आहे. ८ कोचची वंदे भारत एक्सप्रेस सर्व प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरत होती. गणेश चतुर्थी उत्सवाच्या तीन दिवसांसाठी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने २२२२९/२२२३० मुंबई - गोवा वंदे भारत एक्सप्रेस १६ कोचच्या सेवेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
तात्पुरत्या कालावधीसाठी १६ कोचची वंदे भारत एक्सप्रेस केल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली. १६ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस २५, २७ आणि २९ ऑगस्ट रोजी मुंबई सीएसएमटीहून आणि २६, २८ आणि ३० ऑगस्ट रोजी मडगाव गोव्याहू धावणार आहे. या वाढलेल्या कोचचे आरक्षण लवकरच सुरू होणार आहे.
राज्यभरात वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढते आहे. मुंबई आणि मराठवाड्याला वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्यावर भर दिला आहे. यात जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसशी तिचे एकीकरण करण्याचा रेल्वे मंडळाने निर्णय घेतला आहे. या रेकची प्राथमिक देखभाल आता नांदेडला हलवण्यात आली.
मुंबईत देखभाल-दुरुस्ती मार्गिका उपलब्ध झाली असल्याने मुंबई-मडगाव गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा लांब रेक सामावून घेण्यासाठी जागा उपलब्ध झाली. त्यामुळे मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे कोच दुप्पट करण्याची मागणी प्रवासी, संघटना आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी लावून धरल्याचे म्हटले जात आहे.
कायस्वरुपी वाढीव कोचच्या मडगाव 'वंदे भारत' मधून प्रवास करण्यासाठी कोकणवासीयांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेकडे २० कोचच्या 'वंदे भारत'च्या देखभालीची सुविधा नाही. २० कोचच्या 'वंदे भारत' ट्रेनची देखभाल करण्यासाठी वाडीबंदर येथे 'वंदे भारत' डेपो उभारण्यात येत आहे. हे काम पूर्ण होण्यास किमान एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे, असे समजते.
मुंबई-कोकण रेल्वे अंतर वेगाने पार करणाऱ्या अगदी मोजक्या मेल-एक्सप्रेस आहेत. 'वंदे भारत'चा प्रवास आरामदायी आणि सुखद आहे. या मार्गावर धावणाऱ्या मडगाव जनशताब्दी आणि मडगाव तेजस या रेल्वेगाड्यांना १६ डबे आहेत. केवळ मुंबई-मडगाव वंदे भारतला ८ डबे आहेत. डबे कमी असल्याने अल्पावधीतच या गाडीचे आरक्षण पूर्ण होते. यामुळे अन्य गाड्यांच्या तुलनेत 'वंदे भारत'ला प्रवाशांची मागणी अधिक आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच सीएसएमटी (CSMT Mumbai) स्थानकाहून गोव्यातील मडगाव (Madgaon Goa) स्थानकापर्यंत ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नियमितपणे चालवली जाते. परंतु, आता कोकण रेल्वे मार्गावरील मान्सून वेळापत्रकामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी असतात.
कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू आहे. आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता मान्सून वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावते.