Join us

१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:34 IST

1 / 12
Meenatai Thackeray Statue In Dadar Mumbai News: दादरमधील शिवाजी पार्क येथे दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळास्थळी जाऊन पाहणी केली.
2 / 12
सकाळी साडेनऊच्या दरम्यान युवासेनेचा एक कार्यकर्ता शिवाजी पार्क परिसरात फिरत असताना त्याला मीनाताई ठाकरेंचा पुतळा व चौथऱ्यावर ऑइलपेंटचा लाल रंग फेकल्याचे दिसले. त्याने शाखाप्रमुख अजित कदम यांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली.
3 / 12
कदम यांनी काही कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचून पाहणी केली. त्यांनी थिनरच्या सहाय्याने तो रंग पुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी खा. अनिल देसाई यांना दूरध्वनीवरून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. खा. देसाई यांनी शिवसैनिकांसह तिथे धाव घेतली. शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई करत लाल रंग पुसून काढला.
4 / 12
रात्री उशिरा शिवाजी पार्क पोलिसांनी उपेंद्र गुणाजी पावसकर याला अटक केली. तो दादर येथील खेड गल्ली येथे वास्तव्यास असून तो उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा चुलतभाऊ असल्याचे समजते. याआधीही त्याने उद्धव ठाकरेंच्या पोस्टरचीही विटंबना केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजते. या वादाचे यामागे काय कनेक्शन आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
5 / 12
सुमारे १८ वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हाही मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांनी काळे फासले होते. अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी आता मीनाताई ठाकरे पुतळ्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून ठाकरे गट विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे समजते.
6 / 12
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीनाताई ठाकरे पुतळ्याबाबत अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आता या पुतळ्याला काचेच्या तावदानाचे आवरण लावून बंदिस्त करण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून घेण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
7 / 12
पुतळ्याला विशिष्ट अशा न तुटणाऱ्या पारदर्शक काचेने बंदिस्त केले जाणार आहे. या पुतळ्याला असे आवरण बसवण्यात येणार होते, असेही समजते. पण ही घटना घडल्यामुळे हे काम आता तातडीने हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी पुतळ्याच्या आजूबाजूने छतही घालण्यात आले आहे.
8 / 12
शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात आधीच भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचे स्मृती स्मारक आहे. या स्मृती स्मारकामध्ये आचरेकरांचा पुतळा नसून बॅट, हेल्मेट, ग्लोज, बॉल, स्टम्प असे क्रिकेटचे साहित्य आहे. या स्मारकाप्रमाणेच मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याभोवती काच बसविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
9 / 12
दरम्यान, राज ठाकरे यांनी पोलिसांना येथील सीसीटीव्ही चेक करून २४ तासांमध्ये आरोपींना शोधून काढा, असे सांगितले होते. सकाळी घटना घडताच मुंबई पोलिसांनी तत्काळ पावले उचरत रात्रीपर्यंत आरोपीला अटकही केली.
10 / 12
तर, उद्धव यांनी बिहारप्रमाणेच महाराष्ट्र पेटविण्याचा हा डाव आहे. स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घेण्याची ज्याला शरम वाटते त्याने हे केले असावे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
11 / 12
कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला. स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. ज्याने कुणी हा प्रकार केला त्याला सोडले जाणार नाही, असे म्हटले होते.
12 / 12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देताना या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला होता. तसेच याला जास्त राजकीय रंग देणे, हे मला योग्य वाटत नाही, असे स्पष्ट केले होते.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDadar Stationदादर स्थानकBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे