Join us

मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षण जाळीमुळे जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 16:34 IST

पोलिसांकडून तरुणाची चौकशी सुरू

मुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र संरक्षण जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला. या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी खळबळ माजली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. या तरुणानं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती. लक्ष्मण चव्हाण नावाच्या तरुणानं मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. हा तरुण प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. हा तरुण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गेला होता. त्याच्या हातात एक बॅनर होता. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, तोपर्यंत मंत्र्यांनी सरकारी निवासस्थानांमध्ये राहू नये, अशी या तरुणाची मागणी होती. या तरुणानं सहाव्या मजल्यावरून उडी मारल्यानं मंत्रालयात एकच घबराट पसरली.तरुणानं उडी मारल्यानंतर जवळपास अर्धा तास मंत्रालयात खळबळ माजली होती. राज्यभरातून विविध कामांसाठी आलेले लोक, मंत्रालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी हा प्रकार झाल्यानंतर एकच गर्दी केली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं तरुणाची सुटका केली. सध्या पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत. या तरुणाचं नाव लक्ष्मण चव्हाण असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. 

टॅग्स :मंत्रालयआत्महत्याशेतकरीदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री