धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकले; खाडीपुलावर चालणाऱ्या तरुणाचा नारळ लागून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:38 IST2025-09-29T10:38:28+5:302025-09-29T10:38:53+5:30
धावत्या लोकलमधून फेकलेला निर्माल्याचा नारळ डोक्याला लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकले; खाडीपुलावर चालणाऱ्या तरुणाचा नारळ लागून मृत्यू
पारोळ : धावत्या लोकलमधून फेकलेला निर्माल्याचा नारळ डोक्याला लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नायगाव येथे शनिवारी सकाळी घडली. संजय भोईर (वय २५, रा. पाणजू) असे मृताचे नाव आहे.
पाणजू बेटावरील गावात राहणारा संजय हा गोरेगाव येथील खासगी कंपनीत नोकरीला होता.
शनिवारी हवामान खराब असल्याने फेरीबोट विलंबाने सुरू असल्याने तो सकाळी साडेआठच्या सुमारास नायगाव भाईंदर रेल्वे खाडीपुलावरून कडेकडेने चालत जात होता. त्यावेळी धावत्या लोकलमधून एका प्रवाशाने निर्माल्यातील नारळ खाडीत फेकला. नारळ डोक्याला लागल्याने संजय गंभीर जखमी झाला.
ही माहिती तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्याच्या नातेवाइकांना सांगून त्याला त्वरित वसईच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.