कमी वयाच्या मुलांनाही तिसऱ्या लाटेचा धोका

By अतुल कुलकर्णी | Published: May 7, 2021 05:30 AM2021-05-07T05:30:33+5:302021-05-07T05:31:48+5:30

डॉ. संजय ओक; स्टेरॉईडचा अतिवापर रुग्णांसाठी घातक

Younger children are also at risk of a third wave | कमी वयाच्या मुलांनाही तिसऱ्या लाटेचा धोका

कमी वयाच्या मुलांनाही तिसऱ्या लाटेचा धोका

googlenewsNext

अतुल कुलकर्णी

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट देशात येईल, महाराष्ट्रही त्यातून सुटणार नाही. दुसऱ्या लाटेत जेवढे मृत्यू झाले तेवढे तिसऱ्या लाटेत होऊ नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करावी लागेल. तिसरी लाट लहान वयाच्या मुलांसाठी घातक ठरू शकते. त्यादृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची विस्तृत माहिती राज्य सरकारला दिल्याचे टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत - यू ट्युब’साठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. संपूर्ण मुलाखत लोकमत यू ट्युबवर उपलब्ध आहे.

तिसरी लाट येण्याच्या आधीच कोविड हॉस्पिटल, बेड, तपासण्या आणि ऑक्सिजन यात मोठ्या प्रमाणावर वाढ करावी लागेल. बरे होणाऱ्या लोकांना कामावर जाताना ऑक्सिजनची गरज भासू शकते. त्यासाठी चौकाचौकांत ऑक्सिजन हब उभे करावे लागतील. तेथे जाऊन संबंधित काही वेळ ऑक्सिजन घेतील. तिसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची भीती आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याची उपचारपद्धती टास्क फोर्सने सुचविली आहे. त्यावर वेगाने काम सुरू झाले आहे, असे डॉ. ओक म्हणाले. 

गेल्या ३८ वर्षांच्या सेवेत कधीही न पाहिलेला आजार या दीड वर्षात मी पाहिला. बरे होणाऱ्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर स्टेरॉईड दिल्यामुळे त्यांच्या डोळ्याला बुरशी येणे, त्यातून डोळा निकामी होणे, प्रसंगी मृत्यू येण्यापर्यंत प्रकार घडले आहेत. रुग्णांना ९ दिवसांपेक्षा जास्त काळ स्टेरॉईड दिले असेल आणि रुग्ण मधुमेही असेल तर त्यांना हा काळ्या बुरशीचा आजार दिसत आहे. टास्क फोर्सने उपचाराचा प्रोटोकॉलच ठरवून दिला नाही, तर वेळोवेळी डॉक्टरांच्या बैठकाही घेतल्या आहेत. स्टेरॉईड मृत्यूच्या दारातील रुग्णाला परत आणू शकते. पण, चांगल्या रुग्णाला मृत्यूच्या दारात नेऊ शकते, हे लक्षात घेऊन स्टेरॉइडचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे.  दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्राचीही काळी बाजू आहे. सीटीस्कॅनचा अतिवापर घातक ठरत आहे. त्यामुळेच देशभरातल्या तज्ज्ञ रेडिओलॉजिस्टनी मिटिंग घेऊन राज्याच्या टास्क फोर्सला एक व्हाईट पेपर दिला आहे. ज्यात सीटीस्कॅनचा वापर आणि रुग्णांना दिला जाणारा स्कोअर लिहिला जाऊ नये इथपर्यंतच्या सूचना आहेत, असेही डॉ. ओक म्हणाले.

लसीकरणाचे ॲप अडचणीचे
मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची गरज आहे. मात्र सध्या त्यात नियोजनाचा अभाव आहे. केंद्र 
सरकारचे ॲप अडचणीचे आहे. मुंबई, चंद्रपूर, लातूरच्या लस घेणाऱ्या व्यक्तीला मध्य प्रदेशमधील लसीकरण केंद्राच्या माहितीची 
गरज नाही. या ॲपचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. प्रत्येक राज्याने आपापले ॲप बनविले पाहिजे. अन्यथा या ॲपमुळे लसीकरणाला खीळ बसू शकते, असे डॉ. ओक म्हणाले.

खासगी हॉस्पिटलला लसींचा मोठा साठा कसा मिळाला?
मुंबईमध्ये एका विशिष्ट खासगी हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणावर लसीचा साठा मिळतोच कसा, याची चौकशी झाली पाहिजे. एवढ्या मोठ्या मुंबईत सगळेच लोक त्या विशिष्ट खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस कशी घेऊ शकतील, असा सवाल त्यांनी केला.

लसीकरण केंद्रावर किती लसीचा साठा आहे आणि त्या केंद्रासाठी किती लोकांनी नावनोंदणी केली आहे, यात कसलाही ताळमेळ नाही. लस आहे तर नावनोंदणी नाही, नावनोंदणी आहे तर लस नाही. प्रत्येक राज्याने आपापले ॲप तयार केले तर हा विस्कळीतपणा सुटू शकतो.

nकोविड हॉस्पिटल, जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरण ठेवू नये.
nमोठ्या इमारती, सोसायट्यांमध्ये लसीकरण केले जाऊ शकते. 

Web Title: Younger children are also at risk of a third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.