येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 06:30 AM2020-08-02T06:30:39+5:302020-08-02T06:31:00+5:30

वाधवान यांना २६ एप्रिलला अटक केली होती. सीबीआयने आरोपींना अटक केल्यापासून ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे; पण सीबीआयने मुदतीनंतर ते दाखल केले.

Yes Bank scam: Bail of Wadhwan brothers rejected | येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला

येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला

googlenewsNext

मुंबई : येस बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. दिवान हाउसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) आणि आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स यांना एप्रिलमध्ये येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली. येस बँकेचा संस्थापक राणा कपूरही आरोपी आहे. सीबीआयने २५ जूनला डीएचएफएल, कपिल वाधवान, धीरज वाधवान, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स, येस बॅँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याची पत्नी, मुलीवर आरोपपत्र दाखल केले.

वाधवान यांना २६ एप्रिलला अटक केली होती. सीबीआयने आरोपींना अटक केल्यापासून ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे; पण सीबीआयने मुदतीनंतर ते दाखल केले. तसेच त्यांनी दाखल केलेले आरोपपत्र विशेष न्यायालयाने स्वीकारले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणेने मंजुरी घेतली नाही, असे वाधवान यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

आरोपपत्र वेळेत दाखल न केल्याने आरोपींची जामिनावर सुटका करावी, अशी विनंती वाधवान यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. मात्र, सीबीआयने सर्व आरोप फेटाळले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला.
डीएचएफएलकडून राणा कपूर याच्या मुलीच्या कंपनीत ट्रान्सफर करण्यात आलेल्या ६०० कोटी रुपयांची चौकशी सक्तवसुली संचालनालय करीत आहे. राणा कपूर, त्याची पत्नी व तीन मुली या प्रकरणी आरोपी आहेत. कर्जाची मोठी रक्कम मंजूर केल्याप्रकरणी कपूरला एकूण ४,३०० कोटी रुपयांची लाच मिळाली आहे. त्याचीही चौकशी ईडी आणि सीबीआय करीत आहे.

Web Title: Yes Bank scam: Bail of Wadhwan brothers rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.