यंदाचा ऑक्टोबर मान्सूनमुळे ‘हिट’ ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 15:43 IST2020-10-30T15:42:39+5:302020-10-30T15:43:01+5:30
Mumbai Monsoon : मुंबईसह महाराष्ट्रात जादा पावसाची नोंद

यंदाचा ऑक्टोबर मान्सूनमुळे ‘हिट’ ठरला
मुंबई : एव्हाना नागरिकांना ऑक्टोबर हिटमुळे घाम फुटलेला असतो. मात्र यंदाचे वर्ष त्यास अपवाद आहे. कारण यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीच्या पावसाचा प्रवास लांबल्याने मुंबईसह महाराष्ट्रात जादा पावसाची नोंद झाली आहे. विशेषत: दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशाचा पारा ओलांडते. मात्र यावर्षी कमाल तापमान ३५ च्याशी पुढे गेलेले नाही. एकंदर महाराष्ट्रात ७१ टक्के एवढया जादा तर मुंबई शहर आणि उपनगरात अनुक्रमे २३३, १०१ टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात ६९.८ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते. यावर्षी ही नोंद ११९.७ मिलीमीटर एवढी आहे. या महिन्यात ७१ टक्के एवढया जादा पावसाची नोंद झाली आहे. मुंबईचा विचार करता एव्हना ऑक्टोबर हिट मुंबईकरांना घाम फोडते. यंदा मात्र ऑक्टोबर हिटचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मुंबई शहरात २१६ मिमी पाऊस झाला असून, तो २३३ टक्के जादा आहे. तर उपनगरात १४१.२ मिमी पाऊस झाला असून, तो १०१ टक्के जादा आहे. कोकणसह गोव्यात २४१.६, मध्य महाराष्ट्रात १५५.६, मराठवाड्यात १०६.५ तर विदर्भात ४७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्हयांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, वाशिम, हिंगोली आणि लातूर जिल्हयात पावसाने सरासरी गाठली आहे. पालघर, धुळे, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा आणि गोंदिया ब-यापैकी पाऊस झाला आहे. तर नंदुरबार, बुलढाणा, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि चंदरपूर जिल्हयात पावसाची तूट आहे.
-----------------
जादा पाऊस टक्क्यांत
कोकण १२२
मध्य महाराष्ट्र ११७
मराठवाडा ५१
विदर्भात मात्र पावसाची तुट आहे : - १६