शिक्षणासोबतच करिअरची दिशा! सेंट झेविअर्सच्या Xynergy 2025 मधून विद्यार्थ्यांना मिळणार 'व्हिजन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:27 IST2025-12-04T19:26:26+5:302025-12-04T19:27:26+5:30
Xynergy 2025 : विद्यार्थ्यांना सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या विविध विभागांची, त्यांच्या अभ्यासक्रमांची आणि उच्च शिक्षणानंतरच्या नोकरीच्या संधींची माहिती उपलब्ध करून देण्यात येते.

शिक्षणासोबतच करिअरची दिशा! सेंट झेविअर्सच्या Xynergy 2025 मधून विद्यार्थ्यांना मिळणार 'व्हिजन'
मुंबईतीला सेंट झेविअर्स महाविद्यालयानेविद्यार्थी कनेक्ट उपक्रमाअंतर्गत सिनर्जी २०२५ आंतरविषयक प्रदर्शनाचं (Xynergy 2025- An Interdisciplinary Exhibition) आयोजन केलं आहे. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान हा कार्यक्रम असणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी आणि भविष्यातील करिअर मार्गांबद्दल सविस्तर माहिती देणं हा याचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना विविध विषय, करिअर करण्याची क्षेत्र, त्यांच्या मनातील प्रश्नांची अचूक उत्तर यावेळी दिली जाणार आहेत. शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन देखील मिळणार आहे.
सिनर्जीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी संशोधन, राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत महाविद्यालयीन जीवन, विज्ञान, मानवशास्त्र व वाणिज्य क्षेत्रातील करिअर मार्ग इत्यादी विषयांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. Unleashing Vision: Forging Connections अशी या Xynergy ची थीम आहे. मुलांच्या मनामध्ये सर्जनशीलता, सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
विद्यार्थ्यांना यामध्ये सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या विविध विभागांची, त्यांच्या अभ्यासक्रमांची आणि उच्च शिक्षणानंतरच्या नोकरीच्या संधींची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील मार्गदर्शकांशी संवाद साधण्यासाठी आणि ज्ञानात भर घालण्यासाठी एक मंच प्रदान करतो. यामध्ये विविध स्टॉल्स लावण्यात येतात. यामध्ये शैक्षणिक खेळ, प्रश्नमंजुषा आणि काही प्रात्यक्षिकं देखील दाखवण्यात येतात. या संपूर्ण प्रदर्शनामुळे भविष्यात कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, करिअर नेमकं कशामध्ये करावं याबाबत संभ्रमात असलेल्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांना भविष्यासाठी एक दिशा मिळेल.