भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 06:37 IST2026-01-12T06:37:24+5:302026-01-12T06:37:24+5:30
इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
मुंबई : शहरात येताना काही ठिकाणी 'आम्ही हे करून दाखवले, ते करून दाखवले', असे फलक दिसले; पण खिचडी घोटाळा करून दाखवला, मिठी नदीत पैसे खाल्ले, बॉडी बॅग आणि रस्त्यांच्या डांबरात भ्रष्टाचार केला, हेही त्या फलकांवर लिहायला हवे होते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. महापालिकेत असताना ते कामचोर होते आणि आता इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप-शिंदेसेना-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या महायुतीचा वचननामा रविवारी बीकेसी येथील एमसीए क्लबमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी असून, त्यानिमित्त वर्षभर शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उद्धवसेना आणि मनसेचा वचननामा पाहिल्यानंतर त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, मराठी किंवा हिंदुत्व यांचा साधा उल्लेखही नसल्याचे निदर्शनास आणून दिले. ठाकरे बंधूंना बाळासाहेबांचा विसर पडला आहे. त्यांचा वचननामा म्हणजे 'टोमणेनामा' आहे, तर आमचा विकासनामा आहे. त्यांनी मराठीसाठी केलेले एक तरी ठोस काम दाखवण्याचे आव्हान शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. महायुतीकडून बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.