वरळीत शिंदे - आदित्य ठाकरे आमने-सामने; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:55 IST2025-08-09T10:55:39+5:302025-08-09T10:55:47+5:30
कोळी बांधवांसोबत समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी शिंदे वरळी कोळीवाड्यातील बत्तेरी जेट्टी येथे पोहोचले. ते परत निघाले असताना प्रचंड गर्दीमुळे त्यांना पुढे जाता आले नाही. त्याचवेळी आदित्य त्यांच्यासमोर आले.

वरळीत शिंदे - आदित्य ठाकरे आमने-सामने; नेमकं काय घडलं?
मुंबई : नारळी पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील कोळीवाड्याला शुक्रवारी (दि. ८) भेट दिली. समुद्रात नारळ अर्पण करून शिंदे परतीच्या मार्गाला, तर ठाकरे समुद्राच्या दिशेने निघाले होते. मात्र, एका ठिकाणी ते आमने-सामने आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आदित्य यांनी जगभरातील पर्यटक वरळी कोळीवाड्यात येतात. त्यात काही लोकांना महत्त्व द्यायचे नसते, असा टोला लगावला. तर, भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री असताना केले त्यामुळे कोळीवाड्यातल्या लाडक्या बहिणी आणि भावांनी निमंत्रण दिले होते. त्यांच्या शब्दाला मान देऊन आलो होतो, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
कोळी बांधवांसोबत समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी शिंदे वरळी कोळीवाड्यातील बत्तेरी जेट्टी येथे पोहोचले. ते परत निघाले असताना प्रचंड गर्दीमुळे त्यांना पुढे जाता आले नाही. त्याचवेळी आदित्य त्यांच्यासमोर आले. दोघांमध्ये काही फुटांचे अंतर असूनही एकमेकांकडे पाहणे त्यांनी टाळले. यावेळी दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिस्थिती चिघळली. मात्र, पोलिसांनी शिंदेंना मार्ग मोकळा करून देत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळे केले.
कोळीवाड्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे
नारळी पौर्णिमेचा सगळीकडे उत्साह असून, आनंदाचे वातावरण आहे. उत्सवात सगळे सहभागी होतात. उत्सवाचा आनंद वाढवायचा असतो. काहीजण समोरून आले. तेही सणासाठीच आले होते. कोळीवाड्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत येथील कोळी बांधव जो निर्णय घेतील त्यापद्धतीने त्यांचा विकास करू. जसे लोकसभेत, विधानसभेत महायुतीचे सरकार आले तसेच महापालिकेतही आमचीच सत्ता येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कुठे बसायचे हा आमचा निर्णय आहे
आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना, शिंदे यांच्याकडे नव्हे तर काय गडबड झाली हे पाहत होतो. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मागच्या रांगेत बसण्यावरून काहीजण टीका करत असले तरी काैटुंबिक वातावरण असताना कुठे बसायचे हा आमचा निर्णय आहे. काल तिथे पारंपरिक काैटुंबिक वातावरण होते. आम्ही कुठे बसलो हे नाही तर निवडणूक आयोग त्यांच्या कार्यालयातून चालतो हे राहुल गांधींनी एक्सपोझ केल्याचे त्यांना झोंबले आहे. काहीजणांना धक्काबुक्की करून पुढे बसायचे असते, अशी टीकाही त्यांनी शिंदे यांचे नाव न घेता केली.