तरुणांच्या हातात लाकडी, स्टील बेरिंग दांडिया; ऑनलाइन खरेदीकडे ओढा; कारागीरांना बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:59 IST2025-09-29T12:59:02+5:302025-09-29T12:59:25+5:30
नवरात्रोत्सवात दांडियाला रंगत चढली असून तरुणांच्या हातात लाकडी, स्टील बेरिंग दांडिया, फायबर, फॅन्सी लोकरच्या दांडिया दिसत आहेत.

तरुणांच्या हातात लाकडी, स्टील बेरिंग दांडिया; ऑनलाइन खरेदीकडे ओढा; कारागीरांना बसला फटका
महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवरात्रोत्सवात दांडियाला रंगत चढली असून तरुणांच्या हातात लाकडी, स्टील बेरिंग दांडिया, फायबर, फॅन्सी लोकरच्या दांडिया दिसत आहेत. दरम्यान, गेल्या पाच-सहा वर्षांत दांडियाऐवजी हाताने गरबा खेळणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने दांडिया विक्रीचे प्रमाण घटले आहे. तर, ऑनलाइन विक्रीमुळेही पारंपरिक दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होऊन उपजीविका कशी करावी, असे आव्हान उभे राहिले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक लाकडी दांडियासोबतच फायबर व स्टील दांडियांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. लाकडी दांडिया तयार करण्यासाठी हलक्या वजनाचे जंगली लाकूड किंवा बांबू वापरले जातात. रंगीत पॉलिश, मणी, घुंगरू, कापडी रिबन व मेटॅलिक पेपरने सजविले जातात. तर, पोकळ स्टेनलेस स्टीलचे पाइप्स कापून स्टील दांडिया तयार केल्या जातात. त्याच्या टोकांना रबर, प्लास्टिक कॅप, घुंगरू बसवून रंगीत फॉइल, मणी व एलईडी स्ट्रिप्सने आकर्षक सजावट केली जाते, अशी माहिती व्यापारी श्याम चव्हाण यांनी दिली.
दांडियाचा भाव काय?
साधी लाकडी ३५० रुपये (शंभर नग)
लाकडी बांधणी ५५ रुपये जोडी
तीन रंगी लाकडी ३० रुपये जोडी
स्टील बेरिंग ५० रुपये जोडी
स्टील पातळ २८ रुपये जोडी
स्टील जाडी ३५ रुपये जोडी
फायबर २६ रुपये जोडी
फॅन्सी लोकर ४० रुपये जोडी
‘दांडिया’ येतात कुठून?
व्यवसायातील बदलांविषयी दांडिया विक्रेते संजय चौहान म्हणाले, अहमदाबाद येथील गोध्रा येथे लाकडी ‘दांडिया’ बनविण्याचे अनेक मोठे कारखाने आहेत. वेगवेगळ्या डिझाइन्सच्या ‘दांडिया’वर रंगकाम व आकर्षक कलाकुसर करून मुंबईत माल पाठविण्यात येतो. जंगलातील लाकडापासून बनविलेल्या साध्या दांडिया धुळे येथून येतात. पूर्वीपेक्षा दांडियाची भाव प्रचंड प्रमाणात वाढले, तर विक्री ३० ते ३५ टक्क्यांनी घटली आहे. ऑनलाइनपेक्षा कमी भावात वस्तू देऊनही ग्राहकांना घरबसल्या वस्तू मिळत असल्याने त्याचा स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे.
१५० ते २५० रुपये किंमत
मुंबईमध्ये भुलेश्वर, धारावी, अँटॉप हिल, मालाड, कांदिवली येथे स्टीलपासून बेरिंग व सळईच्या दांडिया बनविण्याचे कारखाने आहेत. तर, घाटकोपर परिसरात काही गुजराती, राजस्थानी कुटुंबे हाताने सजविलेल्या लाकडी दांडिया बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या दांडिया एकमेकांवर आपटल्यास त्यातून विशेष ध्वनी निघतो. १५० ते २५० रुपयांपर्यंत किंमत असून, दांडिया खेळणारे हौशी कलाकार त्याचीच मागणी करतात, असे दुकानदार सुनील शर्मा सांगतात.