मुंबईत महिला, मुली अजूनही असुरक्षितच! ‘पोलिस दीदी’मुळे अत्याचाराला फुटतेय वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:39 IST2025-07-25T13:39:14+5:302025-07-25T13:39:29+5:30
गेल्या सहा महिन्यांत महिलांसंबंधित साडेतीन हजार गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे.

मुंबईत महिला, मुली अजूनही असुरक्षितच! ‘पोलिस दीदी’मुळे अत्याचाराला फुटतेय वाचा
मुंबई : मुलुंडमध्ये १४ वर्षीय मुलीवर गेल्या वर्षभरापासून वडील, दोन सख्ख्या भावांसह चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे मुली घरातही असुरक्षित असल्याचे पुन्हा समोर आले. गेल्या सहा महिन्यांत महिलांसंबंधित साडेतीन हजार गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. यामध्ये बलात्काराच्या ६०२ गुन्ह्यांचा समावेश आहे.
मुलुंडच्या घटनेत गेल्यावर्षी याच मुलीवर परिसरातील चार तरुणांनी लैंगिक अत्याचार केले होते. त्यातून ती गर्भवती झाली. पोलिसांनी तिला बाल सुधारगृहात पाठवले. तिथे तिची प्रसूती झाली. या काळात सुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी तिची काळजी घेतली. यावेळी तिने जन्मदाते वडील, दोन सख्खे भाऊ आणि परिसरातील एका फेरीवाल्याने वर्षभर केलेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांत महिलांसंबंधित तीन हजार ५८२ गुन्हे दखल झाले असून त्यापैकी तीन हजार ३१९ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
अपहरणाचे ७२० गुन्हे
गेल्या सहा महिन्यांत अपहरणाचे ७२० गुन्हे दाखल झाले असून, ६६२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. गेल्यावर्षी ५९४ गुन्हे दाखल होते.
‘पोलिस दीदी’मुळे अत्याचाराला फुटतेय वाचा
विद्यार्थ्यांवरील शारीरिक अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून पोलिस दीदी उपक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत स्थानिक पोलिस प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श, अनोळखी व्यक्तीने आमिष दाखवल्यास पाठलाग केल्यास काय करावे? याबाबत प्रशिक्षित केले जाते. यामुळे अनेक घटनांना वाचा फुटण्यास मदत होत आहे.