महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:58 IST2026-01-06T19:57:34+5:302026-01-06T19:58:21+5:30
ह्यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते. ह्यांना एकदाचा शिवटोला देऊयाच असं आवाहन अखिल चित्रे यांनी जनतेला केले.

महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियात बरेच व्हिडिओ व्हायरल असतात. त्यातच भाजपाच्या व्यासपीठावरून एका महिलेचा डान्स करणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. त्यावरून उद्धवसेनेचे संघटक अखिल चित्रे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आणि निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधत आमच्या महापुरूषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. हे करताना भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार या भाजपाच्या महाभागांना व्यासपीठावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहे याचेही भान नाही. आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? हे त्यांनी विचारले आहे.
तसेच ह्या कार्यक्रमाच्या आयोजक कोण? तर भाजपाच्या स्थानिक उमेदवार, संयोजक कोण तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपाने कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी. ही असली माणसं आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही भाजपाला? मुंबईकरांनो, आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही. ह्यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते. ह्यांना एकदाचा शिवटोला देऊयाच असं आवाहन अखिल चित्रे यांनी जनतेला केले.
हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना @BJP4Mumbai@AmeetSatam@ShelarAshish भाजपाच्या महाभागांना ह्याचंही भान नाही कि मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव… pic.twitter.com/tYGnHkAqUM
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 5, 2026
दरम्यान, हा व्हिडिओ उद्धवसेनेने ट्विट केल्यानंतर भाजपानेही यावर प्रतिक्रिया दिली. लोक आनंद व्यक्त करतात, त्यात गर्दीचा काय संबंध? आमच्या प्रचार आणि प्रसारात आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला असेल तर एवढे बोलायची गरज काय, शेवटी हा महिलांचा आनंद आहे त्यांनी तो व्यक्त केला असेल अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.