मुंबई: बसस्टॉप उभ्या एका महिलेच्या अंगावर मेट्रोच्या कामाची क्रेन कोसळून तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे अंधेरीच्या गुंदवली परिसरात घडली. तसेच यात अजुन दोन जण जखमी झाले असुन काही रिक्षांचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक चौकशी सुरू आहे.मेट्रोच्या कामासाठी वापरली जाणारी क्रेन जोगेश्वरीवरून वांद्रेच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्गावर निघाली होती. त्यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भलीमोठी क्रेन खाली कोसळून तिचे दोन तुकडे झाले. हाच एक तुकडा गुंदवली बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या एका महिलेच्या अंगावर पडल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या महिलेचे नाव एफ पटेल असल्याचे समजत असून या अपघातात अजून दोघे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन रिक्षांचे देखील यात नुकसान झाले आहे. पहाटे सहा वाजता हा अपघात झाल्याची माहिती असुन या प्रकारानंतर क्रेनचालक घटनास्थळावरून पसार झाला. ज्याच्यावर पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 14:28 IST