Join us  

काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घ्या; काँग्रेस नेत्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 5:47 AM

मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

मुंबई : आरे येथील वृक्षतोडीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर, नाणार प्रकल्पासह विविध प्रकरणांतील आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी वाढत आहे. त्यात बुधवारी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकर्त्यांवरील केसेस मागे घेण्याची मागणी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या खातेधारकांच्या समस्यांवर तोडगा काढावा, भीमा कोरेगाव प्रकरणातील दलित आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांवरील केसेस मागे घेण्याच्या मागणीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत निवेदन सादर केले.

या शिष्टमंडळात गायकवाड यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार वर्षा गायकवाड, चरणसिंग सप्रा, भाई जगताप आदींचा समावेश होता. याबाबत गायकवाड म्हणाले की, मुंबई काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी मुंबईकरांच्या प्रश्नांवर, समस्यांवर आंदोलने करण्यात येतात. त्यात शेकोडो आंदोलनकर्ते सहभागी होतात. त्यांना अटक केली जाते. त्यांच्यावर केसेस दाखल होतात. ही आंदोलने मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, न्यायासाठी असतात. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांवरील केसेस मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पीएमसी बँकेचे १६ लाख खातेदारांची जमा रक्कम परत मिळायला हवी. त्यासाठी सरकारने लवकरात रिव्हायवल पॅकेज जाहीर करावे किंवा पीएमसी बँकेचे अन्य सशक्त बँकेमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणीही करण्यात आली.

टॅग्स :उद्धव ठाकरेकाँग्रेसमहाराष्ट्र सरकारआरेमेट्रोपीएमसी बँक