महापालिकेत विरोध करणारं कुणीच नसल्याने मुंबईतील उद्याने, मैदाने, भूखंड पुन्हा कंत्राटदाराकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:56 IST2025-09-23T11:55:53+5:302025-09-23T11:56:43+5:30
दोन वर्षांच्या देखभालीसाठी पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया सुरू

महापालिकेत विरोध करणारं कुणीच नसल्याने मुंबईतील उद्याने, मैदाने, भूखंड पुन्हा कंत्राटदाराकडे
मुंबई - मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील शेकडो उद्याने, खेळाची व मनोरंजन मैदाने तसेच विविध भूखंड देखभालीसाठी पुन्हा खासगी कंत्राटदारांना देण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेची घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप परिसरात सुमारे २५० उद्याने व मनोरंजन मैदाने आहेत. ती देखभालीसाठी यापूर्वीही कंत्राटदारांकडेच देण्यात आली होती. आता ऑक्टोबर २०२७ पर्यंत त्यांची देखभाल करण्यासाठी ती कंत्राटदारांना देण्यात येणार आहेत. उद्याने, मैदाने, मोकळे भूखंड खासगी कंत्राटदारांना देण्यास यापूर्वी महापालिका सभागृहात नगरसेवकांकडून तीव्र विरोध केला जात होता, मात्र मागील तीन वर्षांपासून पालिकेत नगरसेवक, विविध समित्या नाहीत. त्यामुळे याला विरोध होणार नसल्याने खासगी संस्थांनाच याचे कंत्राट दिले जाणार आहे.
महापौर, स्थायी समिती सदस्यांचा होता आक्षेप
मुंबईत मोठ्या प्रमाणावर उद्याने, मोकळे भूखंड, क्रीडांगणे व मनोरंजन मैदाने आहेत. नवीन विकास आराखड्यात यासाठी नियोजन केले आहे. यापूर्वी पालिका अशी उद्याने व भूखंड खासगी कंत्राटदारांकडे तीन वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी देत असे; मात्र या पद्धतीवर तत्कालीन महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते व स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतले. कंत्राटदार बेसुमार लाभ घेत असल्याचा आरोप झाल्यामुळे आता एक ते दोन वर्षांपुरते कंत्राट दिले जात आहे.
पश्चिम उपनगरातील उद्यानही देणार
अंधेरी पूर्व-पश्चिम, मालाड, गोरेगाव या पश्चिम उपनगरातील उद्याने, क्रीडांगणे व मनोरंजन मैदाने यासाठीचे भूखंडही खासगी कंत्राटदारांकडे देण्यात येणार आहेत.
२५० उद्याने
घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप परिसरात पालिकेची सुमारे २५० उद्याने व मनोरंजन मैदाने आहेत. ती यापूर्वीही कंत्राटदारांकडेच देण्यात आली होती. आता पुन्हा ऑक्टोबर २०२७ पर्यंत दोन वर्षांसाठी त्यांची देखभाल कंत्राटदारांना देण्यात येणार आहे.