उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 20:42 IST2025-10-02T20:39:52+5:302025-10-02T20:42:00+5:30
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: हिंमत असेल तर तुम्ही माझ्या मराठी हात लावून बघाच. हात जागेवर ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: आमचे कुणाशी भांडण नाही. आतापर्यंत किती मारामाऱ्या झाल्या, आमच्या अंगावर येऊ नका. शिवसेनाप्रमुखांनी शिकवले आहे की, एकतर कुणाच्या अंगावर जायचे नाही, पण कुणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्हा कुणाचे उणे-धुणे काढायचे नाही, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
मुंबईतील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीपासून ते आशिया चषक स्पर्धेपर्यंत अनेक गोष्टींवर आपल्या खास ठाकरे शैलीत भाष्य केले. भाजपा, पंतप्रधान मोदी, महायुती, शिवसेना शिंदे गटावर शेलक्या शब्दांत टीका केली. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार का, यासंदर्भात राजकीय वर्तुळात बरीच मोठी चर्चा सुरू आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भाष्य केले.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे येणार का?
काही जणांची अपेक्षा आहे की, उद्धव ठाकरे आता पुढील कार्यक्रम काय देणार, आत्ता कोण म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, अरे मग ५ जुलैला काय केले होते आम्ही. तेव्हाच मी बोललेलो आहे की, आम्ही एकत्र आलो, ते एकत्र राहण्यासाठीच. इथे माझ्या मातृभाषेचा ऱ्हास होत असेल, तिथे मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही. मराठीवर हिंदीची सक्ती... मी जाहीरपणे परत सांगतो की, आमचा हिंदीला विरोध नाही. पण आमच्यावर सक्ती करायची नाही. जी भाषावार प्रांत रचना झाली, त्या प्रांत रचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक-एक प्रांत मिळाला. गुजराती लोकांना गुजरात मिळाले. बंगाली लोकांना बंगाल मिळाले. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. त्यानंतर राज्याला सरकार मिळाले. राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला राजधानी मिळाली नव्हती. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हिंमत असेल तर तुम्ही माझ्या मराठी हात लावून बघाच
मुंबई ही व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर खिशा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का, तर सगळ्या मराठी द्वेष्ट्यांना सांगत आहे की, हिंमत असेल तर तुम्ही माझ्या मराठी हात लावून बघाच. हात जागेवर ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.