ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 07:44 IST2025-12-17T07:43:52+5:302025-12-17T07:44:40+5:30
मनसे व उद्धवसेनेने आपापल्या पक्ष निरीक्षकांकडून प्रभागनिहाय अहवाल तयार केला आहे. यानुसार प्रभागात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, याचा आढावा घेण्यात आला.

ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
मुंबई: महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र मैदानात उतरणार असून, युतीची अधिकृत घोषणा, उमेदवारांची यादी व वचननामा एकत्रित जाहीर करण्याची शक्यता आहे. तर, शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित घेऊन हे बंधू एकत्रित शक्तिप्रदर्शन करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मनसे व उद्धवसेनेने आपापल्या पक्ष निरीक्षकांकडून प्रभागनिहाय अहवाल तयार केला आहे. यानुसार प्रभागात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार जागावाटपाची चर्चा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. तर, जाहीरनामा व प्रचारात कोणते मुद्दे यासाठी समिती नेमण्यात आली असून, स्वतः राज ठाकरे हे त्याकडे लक्ष देत आहेत. प्रचारादरम्यान घेण्यात येणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या सभांचेही नियोजन करण्यात येत आहे. युतीची अधिकृत घोषणा १८ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.
कुठे आले एकत्र ?
उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी पत्रपरिषदेत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक या महापलिकांसाठी राज व उद्धव एकत्र आले आहेत. ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ. मुंबईसह २९ महापलिकांसाठी आम्ही सज्ज आहेत. मराठी माणसांच्या अस्तित्वाच्या या लढाईत कोणत्याही पदावरच्या, वयाच्या माणसाने उतरायला हवे, असे म्हटले आहे.
येत्या आठवड्यात युतीची घोषणा
"उद्धव व राज यांच्या युतीची घोषणा येत्या आठवड्यात व्हायला हरकत नाही. नॉमिनेशन, विड्रॉल प्रक्रिया ३० तारखेला संपत आहे. दोघे एकत्र येतात तेव्हा काही तरी कार्यक्रम असेलच. जागावाटप, भूमिका असे काही ठरले असेल तर ते लवकरच जाहीर होईल."
- संजय राऊत, मुख्य प्रवक्ते, उद्धवसेना
आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
"बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्वासाठी सहा वर्षांची निवडणूक बंदी घालून मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला कोणी हिंदुत्व शिकवू नये. आम्ही उद्धवसेनेसोबत निवडणूक लढविणार आहोत. त्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. उद्धवसेना व मनसे युतीची औपचारिक घोषणा एक-दोन दिवसांत होईल."
- बाळा नांदगावकर, नेते, मनसे