शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
By यदू जोशी | Updated: January 6, 2026 06:34 IST2026-01-06T06:33:43+5:302026-01-06T06:34:55+5:30
शरद पवार आणि अजित पवार एकत्र राहण्यासाठी एकत्र आले आहेत का? याबाबतची आणखी स्पष्टता महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच येईल.

शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार आज ८५ वर्षांचे आहेत. अस्तित्वाच्या पातळीवर त्यांचा पक्ष आज एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. पुतणे अजित पवार यांच्यासोबत ते जातील की, पुढच्या काळातही आपला पक्ष, सहकारी यांना सोबत ठेवून पुढे जातील, याबाबतची आणखी स्पष्टता महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच येईल.
लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला दमदार यश मिळाले, एकूण ४८ पैकी आठ खासदार जिंकले; पण साडेचार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला २८८ पैकी केवळ १० जागा मिळाल्या. ज्येष्ठांपैकी जयंत पाटील, वरिष्ठांपैकी जितेंद्र आव्हाड असे काही शिलेदार महायुतीच्या झंझावातातही टिकले.
नव्या पिढीपैकी रोहित पवार, रोहित पाटील यांनी पक्षाच्या दारुण पराभवानंतरही पक्षाकडे काही प्रमाणात का होईना पण तरुण नेतृत्व आहे, असा थोडा का होईना; पण विश्वास दिला; मात्र या दारुण पराभवाच्या धक्क्यातून शरद पवार यांचा पक्ष आजही सावरू शकलेला नाही. २०१९ मधील महायुतीच्या प्रयोगाचे शिल्पकार हे शरद पवारच होते. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर वर्षभरातच अजित पवारांनी भाजपला साथ देत काकांचे बोट सोडले. विधानसभा निवडणुकीत तब्बल ४१ आमदार निवडून आणत पुतण्याने काकांवर मात केली.
दोन प्रवाह आहेत की एकाच झाडाच्या दोन फांद्या?
नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षांचा दहाचा आकडादेखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पार करता आला नाही. त्या तुलनेने अजित पवारांच्या पक्षाने पाचपट चांगले यश मिळविले. नगरपरिषदेला काका-पुतणे एकत्र आले नव्हते; मात्र महापालिकेने हा चमत्कार घडवून आणला. आता तो महापालिकेपुरताच अपवाद आहे की, काकांचा पक्ष पुतण्याच्या पक्षाच्या मार्गावरूनच पुढे जाणार तेही पुढच्या काळात उलगडत जाईल. राष्ट्रवादीतील बंड हे काका-पुतण्याने ठरवून केलेले होते, असे अनेक जणांना आजही वाटते. ते दोघे वेगळे नाहीतच असा तर्कही अभ्यासक देतात.
त्याला बळ देणारा घटनाक्रम म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दोघांच्या पक्षात झालेली आघाडी. नद्यांचा संगम होतो आणि मग त्या एकाच प्रवाहात पुढे जातात. शरद पवार आणि अजित पवार हे मुळात खरेच दोन प्रवाह आहेत की, एकाच झाडाच्या दोन फांद्या? महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघांना एकत्र आणले आहे. उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या साक्षीने घोषणा केली होती, एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी... शरद पवार आणि अजित पवार एकत्र राहण्यासाठी एकत्र आले आहेत का? आगे आगे देखो होता है क्या!