शाळांची घंटा आज वाजणार का? स्थानिक प्रशासनच घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 03:00 IST2020-07-01T03:00:28+5:302020-07-01T03:00:43+5:30
नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन

शाळांची घंटा आज वाजणार का? स्थानिक प्रशासनच घेणार निर्णय
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार उद्या, १ जुलैपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. एक महिन्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, तिथेच शाळा सुरू होतील. पण शाळांत विद्यार्थ्यांची उपस्थिती किती राहील व स्थानिक प्रशासन काय निर्णय घेते, यावर सारे अवलंबून आहे.
मुंबई, नाशिक, सोलापूर, ठाणे, सांगली, वाशिम जिल्ह्यांतील शाळा सुरू होणार नाहीत. लातूरमध्ये १३७ शाळा सुरू करण्याची संमती आहे. पण प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत शिक्षणसंस्था सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. साताऱ्यात ३७२, कोल्हापूरमध्ये ७६०, अहमदनगरमध्ये ८५०, वर्धामध्ये १५७ शाळांनी संमतीपत्र आहे. पण अंमित निर्णय प्रशासनाने घ्यायचा आहे. .
नववी ते बारावी १ जुलैपासून, सहावी ते आठवी आॅगस्टमध्ये आणि पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पण प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा सुरू होऊ शकणार नाहीत. मधुमेह व रक्तदाब असलेल्या शिक्षकांना ३१ जुलैपर्यंत शाळेत न जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आमची संमती
शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले की, स्थानिक पातळीवर हरकत नसेल अडचणी नसतील तर आमची संमती आहे. शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याची अमलबजावणी करून स्थानिक प्रशासनाने काळजी घेऊन समंतीपत्र मिळाल्यास शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा.