Dadar Kabutar Khana News: दादर परिसरात कबुतरखाना बंद करण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही स्थानिक पातळीवर त्याला धाब्यावर बसवले जात असल्याचे समोर आले आहे. जैन मंदिराशेजारील एका इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे नव्याने कबुतरखाना सुरू करून तेथे दाण्याची पोती टाकली जात आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने कबुतरांचा थवा इमारतीवर जमा होत असून परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. यातच मराठी एकीकरण समितीने या आंदोलनात उडी घेतली असून, ठाकरे बंधूंना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कबुतरखाना वादावरून आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दादर पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. शहरात लागू असलेल्या पोलिस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. दादरच्या कबुतरखान्याबाबत मराठी एकीकरण समितीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आंदोलनाची हाक दिली. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखाना परिसरात १५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहावे
मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांनी सांगितले की, आम्ही कोणतेही आंदोलन करणार नाही. आम्ही फक्त पोलीस उपायुक्त यांना निवेदन देणार आहोत. जैन समाजाच्या लोकांनी कबुतरखान्याच्या समर्थनार्थ आंदोलन केलं, त्या आंदोलनात त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. चाकूने ताडपत्री फाडली तरी त्यांच्यावर कोणतेच गुन्हे दाखल केले नाही. एकीकडे आम्ही मराठी माणसाच्या हक्क करिता आंदोलन करतो तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात. आपण पारतंत्र्यात राहतो की काय असा वाटत आहे. मराठी एकीकरण समितीने स्थानिक रहिवाशांच्या प्रश्नांसाठी आणि या चळवळीत सहभागी होण्यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि आरोग्यविषयक संस्थांना दादरच्या कबुतरखाना येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पालिकेने हा कबुतरखाना पोलिसांच्या सुरक्षेत चारही बाजूने ताडपत्रीने झाकला. येथे कबुतरांना खाद्य घातल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला. कारवाईची मागणी पालिकेच्या या कारवाई विरोधात जैन समुदायाने आक्रमक होत तीव्र विरोध केला. गेल्या आठवड्यात दादरमधील कबुतरखान्यावर लावलेल्या ताडपत्रीमुळे रहिवाशांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली.